संविधानातील मूल्यांची ओळख समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी आणि महिलांना त्यांच्या हक्कांसह कर्तव्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने ‘समता परिषद, मुंबई’च्या महिला विभागाच्या वतीने ‘संविधान प्रश्नमंजूषा’ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आणि ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. संविधानाच्या ‘अमृतमहोत्सवी’ वर्षानिमित्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील ७५ ठिकाणी झालेल्या या स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. लावणीसम्राज्ञी आणि सिनेअभिनेत्री मेघा घाडगे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याचा हा वृत्तांत...
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. मात्र, या अधिकारांची जाणीव असण्याबरोबरच त्यांचा योग्य वापर आणि त्यासोबत येणार्या कर्तव्यांचे भान असणेही तितकेच महत्त्वाचे. महिलांना संविधानातील तरतुदी, मूलभूत अधिकार आणि लोकशाही मूल्यांची माहिती असली पाहिजे. संविधानाचा अभ्यास केवळ परीक्षेपुरता मर्यादित न राहता, त्यातील विचार दैनंदिन जीवनाचा भाग व्हावेत, अशी भूमिका या उपक्रमातून मांडण्यात आली. यावेळी बोलताना मेघा घाडगे यांनी संविधानविषयक जागरूकतेबरोबरच, कला आणि समाजप्रबोधन यांच्यातील संबंधांवर भाष्य केले. "कलाकार विविध कलामाध्यमांतून समाजासमोर विचार मांडत असतात. या प्रक्रियेत काही चुका होऊ शकतात. मात्र, प्रत्येक वेळी त्या जाणीवपूर्वक केलेल्या असतातच, असे नाही. त्यामुळे कलाकारांच्या सादरीकरणाकडे पाहताना त्यामागील आशय, भूमिका आणि उद्देश समजून घेणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
"छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांचे विचार आणि कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यात कलेचे योगदान महत्त्वाचे आहे. विशेषतः मराठी कला आणि सांस्कृतिक माध्यमांतून महापुरुषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविता येतात. कलाकारांनी आपल्या कलेचा उपयोग समाजाला दिशा देणारे विचार मांडण्यासाठी करावा. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची प्रगती साधताना विचारवंत वृत्ती विकसित करावी, स्वतःमधील कलागुण ओळखून त्यांना वाव द्यावा आणि आपले छंद जोपासावेत,” असे आवाहनही यावेळी मेघा घाडगे यांनी केले. ‘समता परिषद, मुंबई’च्या सामाजिक कार्यात सहभागी होता आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. ‘शैलजा गिरकर फाऊंडेशन’च्या विश्वस्त आणि ‘महिला विकास ट्रस्ट’च्या प्रमुख क्रांती गिरकर-कुंदर यांनी महिलांचा सामाजिक उपक्रमांमधील सहभाग आणि त्यातून निर्माण होणार्या नेतृत्व क्षमतेचे महत्त्व अधोरेखित केले. "वंचित आणि गरजू समाजघटकांना विविध क्षेत्रांत पुढे येण्यासाठी संधी मिळणे आवश्यक आहे. शिक्षण, कला, क्रीडा आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत ‘समता परिषद, मुंबई’च्या माध्यमातून काम केले जात आहे. गुणवंत खेळाडूंना जागतिकस्तरावर संधी मिळवून देण्यापासून ते गरजू घटकांना प्रगतीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यापर्यंत विविध उपक्रम राबविले जात आहेत,” असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
"महिलांना संविधानातील अधिकार आणि कर्तव्यांची माहिती असणे, ही सामाजिक परिवर्तनाची महत्त्वाची पायरी आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आली पाहिजेत. महिलांना या मूल्यांची समज निर्माण झाल्यास, त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबातील वातावरणावर आणि पुढील पिढीच्या जडणघडणीवर होऊ शकतो. महिलांनी सामाजिक विषयांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. त्यांना केवळ उपक्रमांचे लाभार्थी न ठेवता, सामाजिक बदलाच्या प्रक्रियेतील सक्रिय घटक बनविणे गरजेचे आहे,” असे क्रांती गिरकर-कुंदर यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्या हस्ते मेघा घाडगे यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत मनीषा घाडगे यांनी प्रथम, मैथिली कदम यांनी द्वितीय, तर प्रतिभा साळवे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तिन्ही विजेत्यांना पैठणी साडी देऊन गौरविण्यात आले. विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धांमधून अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या महिलांना आपले ज्ञान सादर करण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या माध्यमातून संविधानातील तरतुदी, नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही व्यवस्थेविषयी महिलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याच कार्यक्रमात आयोजित ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत मानसी कदम, रोशनी बारे, साक्षी गाडे आणि वैष्णवी गुरव यांनी सहभाग घेतला. महिलांच्या ज्ञानाला चालना देणार्या प्रश्नमंजूषेबरोबरच मनोरंजन आणि कलागुणांना वाव देणार्या स्पर्धेचाही समावेश करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे महिलांना एकत्र येण्याची, आपले कौशल्य दाखविण्याची आणि सामाजिक संवाद वाढविण्याची संधी मिळते.
कार्यक्रमाला ‘समता परिषद, मुंबई’च्या महिलाप्रमुख योजना ठोकळे, शिक्षण समिती सदस्या व मनपा प्रतिनिधी अंकिता शिर्के, उमेदा पडेलकर, मयुरी पवार, सुधा सुनील पवार आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू सरिता कदम आणि सामाजिक कार्यकर्ते सागर देवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता शिर्के आणि शिरीष कुंदर यांनी केले उपस्थित मान्यवर, स्पर्धक आणि माता-भगिनींचे क्रांती गिरकर-कुंदर यांनी आभार मानले.
महिलांची जागरूकता समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची
महिलांना संविधानाची माहिती असणे, ही केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रगतीची बाब नसून संपूर्ण समाजाच्या जडणघडणीशी संबंधित आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. महिलांनी हे अधिकार समजून घेतानाच, आपल्या कर्तव्यांचेही भान ठेवले पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही संविधानातील मूल्ये घराघरांत पोहोचली पाहिजेत. महिलांची सामाजिक विषयांतील जागरूकता वाढल्यास कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीला दिशा मिळेल. त्यामुळे संविधानविषयक प्रबोधनाचे असे उपक्रम सातत्याने राबविणे आवश्यक आहे.
-विजय(भाई) गिरकर, अध्यक्ष, समता परिषद, मुंबई
लेखक- संजय बाविस्कर