मुंबई, (Thane Bhiwandi Kalyan Metro Line 5) : ठाणे, भिवंडी आणि कल्याणमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मेट्रो मार्गिका ५ ने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कशेळी येथील मेट्रो डेपोमध्ये पहिल्या मेट्रो ट्रेनचे आगमन झाले आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिका ५ प्रवासी सेवेसाठी सज्ज करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली असून, या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिकेच्या संचालनात कशेळी डेपोची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. मेट्रो गाड्यांची सुरक्षित उभारणी, नियमित तपासणी, चाचण्या आणि देखभालीची जबाबदारी या डेपोमार्फत पार पाडली जाणार आहे. डेपोचे बांधकाम सुरू असतानाच मेट्रो गाड्यांच्या आगमनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणीही पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये गाड्यांमधील डबे चढविण्या-उतरविण्यासाठी स्वतंत्र फलाट तसेच तात्पुरत्या तपासणी सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे पहिल्या मेट्रो ट्रेनचे स्वागत आणि तिची प्राथमिक तपासणी करण्यासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध झाली आहे.(Thane Bhiwandi Kalyan Metro Line 5)
सुमारे २७ हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेल्या या डेपोमध्ये जवळपास ३० मेट्रो ट्रेन संच सामावण्याची क्षमता असेल. याशिवाय पाच तपासणी मार्गिका, चार कार्यशाळा मार्गिका, स्वतंत्र चाचणी मार्ग आणि मेट्रो गाड्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष सुविधा उभारण्यात येत आहेत. या आधुनिक सुविधांमुळे मेट्रो गाड्यांची नियमित देखभाल करणे, तांत्रिक त्रुटींचे वेळेत निराकरण करणे आणि प्रवासी सेवेसाठी गाड्यांची कार्यक्षमता कायम राखणे शक्य होणार आहे.
कशेळी डेपोमध्ये पहिल्या मेट्रो ट्रेनचे आगमन हा केवळ पायाभूत सुविधा उभारणीतील टप्पा नसून, ठाणे-भिवंडी-कल्याण परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने झालेली महत्त्वपूर्ण प्रगती आहे. मेट्रो मार्गिका ५ कार्यान्वित झाल्यानंतर या परिसरातील वाढत्या प्रवासी वाहतुकीला पर्यायी आणि आधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.(Thane Bhiwandi Kalyan Metro Line 5)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.