मुंबई (Simdega Minor Tribal Girl Case) : झारखंडच्या सिमडेगा येथील काँग्रेसच्या आमदारांविरोधात १४ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीने लैंगिक शोषण, शारीरिक छळ आणि धमकावल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद झारखंडने कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात यावी तसेच दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिषदेने केली आहे.
काँग्रेस आणि तिच्याशी संलग्न विद्यार्थी संघटना एनएसयूआयशी संबंधित महिलांच्या छळाची प्रकरणे सातत्याने समोर येत असून, त्यातून महिला सन्मानाबाबत काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांमधील वास्तव उघड होत असल्याचे परिषदेने म्हटले. २०१८ मध्ये एनएसयूआयचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज खान यांच्यावर एका महिला कार्यकर्तीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तर, दिल्ली विद्यापीठातील रामानुजन महाविद्यालयात एनएसयूआयचा पदाधिकारी अनस खान याला विद्यार्थिनींशी संबंधित गंभीर प्रकरणात महाविद्यालय प्रशासनाने निलंबित केले आहे.(Simdega Minor Tribal Girl Case)
दुसरीकडे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थिनींच्या तक्रारींशी संबंधित असलेल्या डॉ. बिमोल अकोइजाम यांच्यावर काँग्रेसने मणिपूरच्या प्रदेश निवडणूक व प्रचार समित्यांचे सदस्य तसेच जाहीरनामा समितीचे सह-अध्यक्ष अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. महिलांच्या छळाची प्रकरणे सातत्याने समोर येत असताना काँग्रेसचा महिला सन्मानाचा मुद्दा केवळ वक्तव्यांपुरताच मर्यादित असल्याचे दिसून येते, अशी टीका परिषदेने केली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी म्हणाले, “झारखंडमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीशी संबंधित लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहेत. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे. काँग्रेस नेतृत्वाने या प्रकरणांमधील आपली जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अभाविप सातत्याने आवाज उठवत राहील.”(Simdega Minor Tribal Girl Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक