
मुंबई (Siddhivinayak Temple Special Pujas) : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने भाविकांसाठी चार नव्या विशेष पूजांचा प्रारंभ केला आहे. यामुळे मंदिरात उपलब्ध असलेल्या धार्मिक सेवांच्या व्याप्तीत आणखी वाढ झाली आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या पूजांमध्ये सहस्रनाम महाप्रसाद पूजा, सहस्रनाम आशीर्वचन महापूजा, शृंगारिका पूजा आणि अथर्वशीर्ष हवन यांचा समावेश आहे. या विशेष पूजा करावयाच्या असलेल्या किंवा त्यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी मंदिरातील पूजा नोंदणी कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे भाविकांना भगवान श्रीगणेशाच्या चरणी विशेष पूजा-अर्चना आणि भक्तिसेवा अर्पण करण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.(Siddhivinayak Temple Special Pujas)
सहस्रनाम महाप्रसाद पूजेमध्ये भगवान श्रीगणेशाच्या चांदीच्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करण्यात येते. त्यानंतर अभिषेक आणि श्रीगणेशाच्या एक हजार नामांचा जप करीत पुष्पार्चन केले जाते. भाविकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, विशेष नवसपूर्ती व्हावी तसेच आरोग्य, समृद्धी आणि कुटुंबाचे कल्याण व्हावे, या भावनेतून ही पूजा केली जाते. पूजेनंतर मंदिरातील पुरोहितांकडून भाविक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आशीर्वाद दिले जातात. तसेच पाच कुटुंबीयांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते.
सहस्रनाम आशीर्वचन महापूजेमध्ये अथर्वशीर्षाचे १२१ आवर्तन करीत अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर सहस्रनाम पुष्पार्चन केले जाते. या पूजेअंतर्गत १० कुटुंबीयांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. तर शृंगारिका पूजेमध्ये भगवान श्रीगणेशाला रेशमी वस्त्रे, केळीचे खांब, सुगंधी फुले, फुलांचे हार आणि अन्य पूजासाहित्य अर्पण करून मूर्तीचा आकर्षक शृंगार करण्यात येतो. या पूजेसाठी नोंदणी केलेल्या भाविकांना सकाळच्या आरतीसाठी निमंत्रित केले जाते. त्यानंतर त्यांना मंदिरातर्फे आशीर्वाद दिले जातात.(Siddhivinayak Temple Special Pujas)