मुंबई मेट्रोतून शाही पाहुण्यांचा प्रवास! प्रिन्स विल्यम, केट यांनी अनुभवली ‘ॲक्वा लाईन’ची सफर

अर्थशॉट पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विधान भवन ते बीकेसी प्रवास;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत


Prince William Kate Mumbai Metro
 
मुंबई, (Prince William Kate Mumbai Metro) :ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स राजकुमार विल्यम आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स राजकुमारी केट यांनी आपल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यादरम्यान सोमवार,दि.१६ नोव्हेंबर रोजी मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनमधून प्रवास केला. २०२६च्या प्रतिष्ठित अर्थशॉट पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आलेल्या या शाही दाम्पत्याने विधान भवन ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) असा मेट्रो प्रवास करत मुंबईच्या आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अनुभव घेतला. त्यांच्या या प्रवासामुळे मुंबई मेट्रोच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली.
 
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या शाही प्रवासाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. ‘ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो मार्गिका-३ वर ब्रिटनच्या राजघराण्यातील मान्यवरांचे स्वागत करणे हा आमच्यासाठी सन्मान असल्याचे एमएमआरसीएलने म्हटले आहे. विधान भवन ते बीकेसीदरम्यानचा हा प्रवास आधुनिक भारतातील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, वेगवान आणि सुलभ प्रवासाचे दर्शन घडवणारा ठरल्याचेही महामंडळाने नमूद केले.(Prince William Kate Mumbai Metro)
 
मेट्रो प्रवासादरम्यान प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट एकमेकांशी संवाद साधताना दिसले. यावेळी केट यांनी निळ्या रंगाचा आकर्षक मिडी ड्रेस परिधान केला होता, तर प्रिन्स विल्यम पांढऱ्या शर्टसह फॉर्मल सिंगल-ब्रेस्टेड सूटमध्ये दिसले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या शाही दाम्पत्याचे मुंबईत स्वागत केले. ‘आमच्या मुंबईत आपले स्वागत आहे! तुम्ही मुंबईकरांप्रमाणे मुंबईचा अनुभव घेण्यासाठी मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनमधून प्रवास करण्याची निवड केली, याचा मला विशेष आनंद आहे. या शहराचा वेग, आरामदायी प्रवास आणि कधीही न थांबणारी उत्साही ऊर्जा तुम्हाला अनुभवायला मिळाली असेल, अशी आशा आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.(Prince William Kate Mumbai Metro)
 
दरम्यान, प्रिन्स विल्यम यांनी स्थापन केलेला अर्थशॉट पुरस्कार पर्यावरणासमोरील गंभीर आव्हानांवर उपाय शोधणाऱ्या उपक्रमांना गौरविण्यासाठी दिला जातो. हवामान बदल, वायुप्रदूषण, कचरा व्यवस्थापन, महासागरांचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण अशा क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण उपायांना या पुरस्कारातून प्रोत्साहन दिले जाते. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या शाही दाम्पत्याच्या मेट्रो प्रवासाने शाश्वत सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वही अधोरेखित केले आहे.(Prince William Kate Mumbai Metro)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर