१२ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या सायबर सुरक्षा ऑडिटमुळे यंत्रणा होणार अत्याधुनिक

    17-Nov-2026   

Mumbai CCTV Cybersecurity Audit
 
मुंबई, (Mumbai CCTV Cybersecurity Audit): देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सुरक्षेला अधिक बळकट आणि अभेद्य करण्यासाठी प्रशासनाने शहरातील १२ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या जाळ्याचे व्यापक तांत्रिक आणि सायबर सुरक्षा ऑडिट करण्याची मोहीम हाती घेणार आहे. यामुळे मुंबईची देखरेख यंत्रणा केवळ अद्ययावतच होणार नाही, तर सायबर हल्ल्यांपासूनही पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे. या मुळे आता मुंबईच्या सुरक्षा जाळ्यात केवळ उच्च दर्जाचे आणि सुरक्षित तंत्रज्ञान असलेले कॅमेरेच कार्यरत राहतील. या ऑडिटच्या माध्यमातून जुन्या किंवा कमकुवत सॉफ्टवेअर असलेल्या कॅमेर्‍यांची जागा आता पूर्णपणे सुरक्षित आणि स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक उपकरणांनी घेतली जाणार आहे. यामुळे ’मेक इन इंडिया’ मोहिमेलाही मोठे बळ मिळणार आहे.
 
मुंबई पोलीस आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी रेल्वे स्थानके, विमानतळ, बंदरे आणि मुख्य चौकांमधील कॅमेरे जोडलेले आहेत. या सर्व कॅमेर्‍यांच्या सॉफ्टवेअर आणि डेटा प्रवाहाची कसून तपासणी होणार असल्यामुळे संवेदनशील माहिती लीक होण्याचा धोका कायमचा टळणार आहे. या ऑडिटमुळे शहरातील बंद पडलेले किंवा तांत्रिक बिघाड झालेले कॅमेरेही तातडीने दुरुस्त होऊन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी पोलिसांना या अद्ययावत यंत्रणेची मोठी मदत होणार आहे. प्रशासनाच्या या दूरदृष्टीच्या निर्णयाचे सुरक्षा तज्ज्ञ आणि नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.(Mumbai CCTV Cybersecurity Audit)
 
सीसीटीव्ही ऑडिटचा निर्णय का घ्यावा लागला
 
मुंबईच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या काही कॅमेर्‍यांमध्ये ’मेड इन इंडिया’ नावाखाली चिनी बनावटीचे हार्डवेअर आणि चिपसेट वापरले गेल्याची शंका गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली होती. अशा विदेशी चिपसेटमध्ये छुपे ’बॅकडोअर’ (तांत्रिक फटी) असण्याची शक्यता असते, ज्याद्वारे हॅकर्सना या कॅमेर्‍यांचा थेट ताबा मिळू शकतो. यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानके, विमानतळ आणि सरकारी कार्यालये यांसारख्या अतिसंवेदनशील ठिकाणांचे थेट चित्रीकरण परदेशी सर्व्हरवर जाण्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका पोहोचण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. शिवाय, सायबर हल्ल्याद्वारे संपूर्ण यंत्रणा ऐनवेळी बंद पाडली जाण्याचीही भीती होती. या संभाव्य धोक्यांना मुळापासून नष्ट करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या नव्या सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी या संपूर्ण जाळ्याचे सायबर ऑडिट करणे अनिवार्य ठरले आहे.(Mumbai CCTV Cybersecurity Audit)
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर