
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते सतीश कोचरेकर उपस्थित होते.
घनवट म्हणाले की, रामायण हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. मात्र, चित्रपटात मूळ कथानकापेक्षा वेगळे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. रावणाला गरिबांना सोन्याची घरे देणारा आणि शोषितांचा तारणहार म्हणून रंगवण्यात आले आहे. तसेच महिलांच्या सन्मानाचा रक्षक म्हणून त्याचे चित्रण करण्यात आले आहे. प्रत्यक्षात रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते. त्यामुळे अशा प्रकारे रावणाचे उदात्तीकरण करणे आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटात शूर्पणखा केवळ श्रीरामाकडे विवाहाचा प्रस्ताव घेऊन आली होती आणि त्यावरून लक्ष्मणाने तिचे नाक कापले, असे दाखवण्यात आले आहे. या प्रसंगानंतर माता सीता लक्ष्मणाला स्त्रीच्या रूपाचा भंग करण्याचा अधिकार नसल्याचे सुनावते, तर प्रभू श्रीराम खर-दूषण यांच्याकडे लक्ष्मणाच्या कृतीबद्दल क्षमायाचना करताना दाखवले आहेत. मूळ रामायणात असे प्रसंग नसताना स्त्रीवादी विचारधारेचा प्रचार करण्यासाठी ते चित्रपटात समाविष्ट केल्याचा आरोप समितीने केला.
तसेच खर-दूषण आणि त्यांच्या १४ हजार राक्षसांशी युद्ध करताना श्रीराम व लक्ष्मण राक्षसांच्या सैन्यापासून पळताना दाखवले आहेत. दुसरीकडे रावणाला हजारो सैनिकांसमोर शस्त्रांशिवाय लढताना दाखवून त्याचे सामर्थ्य वाढवून दाखवण्यात आले आहे. यामुळे प्रभू श्रीरामांचा अवमान होत असल्याचे घनवट यांनी म्हटले.
लक्ष्मणाच्या व्यक्तिरेखेचे अवमूल्यन केल्याचा आरोप
चित्रपटात लक्ष्मणाला सतत उद्धट, संतापी आणि विनोदी पात्राप्रमाणे संवाद साधताना दाखवण्यात आले आहे. श्रीराम, भगवान परशुराम आणि ऋषी-मुनींशी तो उपरोधिक भाषेत बोलताना दिसतो. तसेच विश्वामित्र आणि अगस्त्य ऋषींकडे अस्त्रविद्या मागताना दाखवले आहे. मात्र, वाल्मिकी रामायणानुसार विश्वामित्रांनी श्रीराम आणि लक्ष्मण दोघांनाही बला-अतिबला विद्या दिली होती. त्यामुळे लक्ष्मणाच्या निष्ठावान आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाचे जाणीवपूर्वक अवमूल्यन केल्याचा आरोप समितीने केला.
याशिवाय, माता सीता चित्रपटात इतर राक्षसांशी स्वतः युद्ध करताना दाखवली आहे; मात्र रावणाकडून अपहरण होताना ती प्रतिकार करत नसल्याचे दाखवण्यात आले आहे. सीता स्वयंवराच्या प्रसंगात रावणाचा उल्लेख किंवा चित्रण नसल्याबद्दलही समितीने आक्षेप घेतला. मूळ रामायणानुसार रावणाला शिवधनुष्य उचलता आले नव्हते. हा प्रसंग वगळल्यामुळे श्रीरामाच्या सामर्थ्यापुढे रावण कमी पडल्याचे दाखवणे टाळण्यात आल्याचा आरोप घनवट यांनी केला.
सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले की, रामायणात जसे प्रसंग आहेत, तसेच चित्रण होणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक प्रसंगांत मूळ कथानक बदलण्यात आले आहे. धार्मिक ग्रंथांवर आधारित चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने त्यांचा सखोल अभ्यास करायला हवा. इतर धर्मांच्या भावना दुखावल्या गेल्यास चित्रपटांमध्ये बदल केले जातात किंवा बंदी घातली जाते; मग हिंदूंच्या धार्मिक भावनांबाबत सेन्सॉर बोर्ड असंवेदनशील का आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चित्रपटाच्या आगामी दुसऱ्या भागातही अशाच प्रकारे रामायणातील प्रसंगांची मोडतोड झाल्यास देशभरातील हिंदू संघटनांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून विरोध करण्यात येईल, असा इशारा वर्तक यांनी दिला. दुसरा भाग प्रदर्शित करण्यापूर्वी हिंदू संत आणि रामायणाचे अभ्यासक यांना तो दाखवण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच रामभक्त सरकारनेही प्रभू श्रीरामांचा अवमान करणाऱ्या अशा चित्रपटांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करण्यात आले.(Hindu Janajagruti Samiti Ramayana Movie Protest)