फुटीरतावाद, दहशतवाद, अस्थिरता आणि विविध आंतरराष्ट्रीय कारस्थानांच्या सावटाखाली गेली अनेक दशके राहिलेल्या मणिपूरमध्ये विकासाची नवी पहाट घडविणे, हे मोठे आव्हान आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्य सोडून मोठ्या शहरांकडे जाण्याऐवजी, आपल्या मातीशी नाळ जोडून राहणार्या आणि मणिपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य समर्पित करणार्या व्यक्ती विरळाच! डॉ. थंगजम धबाली सिंह हे त्यांपैकीच एक. अवघ्या २० हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेल्या एका छोट्या प्रयोगशाळेचे रूपांतर त्यांनी आरोग्यसेवा, पर्यटन, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक परिवर्तनाचा व्यापक वटवृक्ष उभारण्यात केले. विशेषतः मणिपूरच्या युवापिढीला व्यसनांच्या विळख्यापासून दूर ठेवून, त्यांच्या हाताला रोजगार, मनात सकारात्मकता आणि जीवनाला नवी दिशा देण्याचे त्यांचे प्रयत्न मोलाचे आहेत. आरोग्यसेवेपासून राष्ट्रहिताच्या व्यापक जाणिवेपर्यंत विस्तारलेल्या त्यांच्या या कार्याचा गौरव करणारा ‘वन इंडिया पुरस्कार २०२६’ म्हणजे, केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, मणिपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना दिलेली कृतज्ञतापूर्ण मानवंदनाच होय.
माणसाची ओळख त्याच्या व्यवसायाने होत नाही; तर त्याच्या विचारांनी, ध्येयाने आणि समाजासाठी केलेल्या कार्याने घडते. मणिपूरमधील आरोग्यसेवा, पर्यटन, रोजगारनिर्मिती आणि भारत-जपान मैत्री या क्षेत्रांत मोलाचे योगदान देणारे डॉ. थंगजम धबाली सिंह हे याचे ज्वलंत उदाहरण. डॉटर म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अनेक संस्थांच्या उभारणीपर्यंत आणि मणिपूरच्या सर्वांगीण विकासाच्या व्यापक उपक्रमांपर्यंत पोहोचला आहे. समाजकार्याचा गौरव करणारा ‘वन इंडिया पुरस्कार २०२६’ त्यांना प्रदान करताना, ‘माय होम इंडिया’ परिवाराला विशेष आनंद होत आहे.
२० हजार रुपयांपासून सुरू झालेली क्रांती
डॉ. सिंह यांची उद्योजकीय वाटचाल १९८३ मध्ये सुरू झाली. त्याकाळात मणिपूरमध्ये आधुनिक वैद्यकीय तपासणी सुविधांची प्रचंड कमतरता होती. साध्या तपासणीसाठीही रुग्णांना राज्याबाहेर जावे लागे. ही वेदना ओळखून, त्यांनी अवघ्या २० हजार रुपयांच्या भांडवलावर एक छोटी लिनिकल प्रयोगशाळा सुरू केली. परिस्थिती इतकी बिकट होती की, सूक्ष्मदर्शक यंत्रही भाड्याने घ्यावे लागले. पण, नवे काही उभारण्याचा आत्मविश्वास आणि आपल्या माणसांची सेवा करण्याचा निश्चय त्यांच्या पाठीशी होता.
तीच छोटी प्रयोगशाळा पुढे ‘बबीना समूहा’च्या आरोग्यसेवा उपक्रमांचा पाया ठरली. आज ‘बबीना समूहा’ची प्रयोगशाळा पूर्वोत्तर भारतातील आघाडीच्या ‘पॅथॉलॉजी’ प्रयोगशाळांपैकी एक मानली जाते. दर्जेदार आरोग्यसेवा केवळ मोठ्या महानगरांपुरती मर्यादित न राहता, दुर्गम भागांतील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे, हा डॉ. सिंह यांचा ठाम दृष्टिकोन आहे. मणिपूरमध्ये कर्करोग उपचाराच्या सुविधा विकसित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे हजारो रुग्णांना उपचारासाठी दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागेनाशी झाली. रुग्णालये आणि प्रयोगशाळा उभारण्याबरोबरच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हेही त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे अंग आहे.
गरजेतून जन्माला आलेले आतिथ्य
आरोग्यसेवेतून पर्यटन आणि आतिथ्यसेवेकडे वळण्यामागेही समाजाची गरजच होती. वैद्यकीय चर्चासत्रे आणि कार्यशाळांसाठी बाहेरून येणार्या तज्ज्ञांच्या निवासासाठी मणिपूरमध्ये दर्जेदार हॉटेलांची कमतरता त्यांच्या लक्षात आली. पाटण्याहून आलेल्या एका ‘यूरोलॉजिस्ट’ने रात्री वीज आणि मूलभूत सुविधांच्या अभावाबद्दल व्यक्त केलेली खंत डॉ. सिंह यांच्या मनाला लागून राहिली. त्याच अनुभवातून त्यांनी कुटुंबीयांसह राज्यात दर्जेदार आतिथ्य सुविधा उभारण्याचा संकल्प केला.
२००९ मध्ये ‘लासिक हॉटेल’ सुरू झाले. वाढती गरज लक्षात घेऊन पुढे सुमारे १७१ खोल्यांचे ‘द लासिक ग्रॅण्ड’ उभारण्यात आले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून ‘हॉटेल इम्फाल’ आणि ‘सेंधिरा रिसॉर्ट’ यांसारख्या मालमत्तांच्या व्यवस्थापनातही ‘बबीना समूहा’ने महत्त्वाची भूमिका बजावली. या उपक्रमांनी मणिपूरच्या पर्यटनाला नवी चालना देण्याबरोबरच स्थानिक रोजगार आणि आर्थिक उलाढालीला मोठा हातभार लावला.
इतिहासाचे जतन आणि शांततेचा संदेश
डॉ. सिंह यांच्या कार्याचा आणखी एक तेजस्वी पैलू म्हणजे, इतिहासाचे जतन आणि आंतरराष्ट्रीय मैत्री. १९४४ मध्ये इम्फाळ आणि कोहिमा परिसरात दुसर्या महायुद्धातील भीषण संघर्ष झाला. या युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी आणि मणिपूरच्या इतिहासातील हा अध्याय पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ‘मणिपूर टूरिझम फोरम’च्या माध्यमातून पुढाकार घेतला. ‘सेकंड वर्ल्ड वॉर इम्फाळ कॅम्पेन फाऊंडेशन’च्या सहकार्याने युद्धाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांची ओळख आणि स्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या अथक प्रयत्नांतूनच ‘इम्फाळ पीस म्युझियम’ उभे राहिले. संग्रहालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत मणिपूर सरकारशी संवाद साधण्यात आला. जपानी दूतावास, ब्रिटिश उच्चायोग आणि ऑस्ट्रेलियन प्रतिनिधींनीही या उपक्रमाला मनापासून सहकार्य केले. जपानच्या ‘निप्पॉन फाऊंडेशन’ने प्रकल्पाला अर्थसाहाय्य दिले. हे संग्रहालय केवळ युद्धाचा इतिहास सांगत नाही; तर मानवी संवेदना, शांतता आणि सामायिक वारशाचा संदेशही देते. भारत-जपानमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठीच्या योगदानाबद्दल जपान सरकारने २०२० मध्ये डॉ. सिंह यांना ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अॅण्ड सिल्व्हर रेज’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला.
समाजाप्रति ऋणानुबंध
‘बबीना समूहा’च्या ‘सामाजिक दायित्व’ उपक्रमांतूनही आरोग्य आणि समाजकल्याणाला प्राधान्य दिले जाते. गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची वेळेवर ओळख व्हावी, यासाठी आयोजित तपासणी कार्यक्रमांत पाच हजारांहून अधिक महिलांची तपासणी आजपर्यंत झाली आहे. ‘हेपेटायटिस बी’, ‘हेपेटायटिस सी’ आणि ‘एचआयव्ही-एड्स’च्या तपासणीसाठी मोफत व सवलतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्थानिक ‘फुटबॉल लब’ आणि ‘क्रीडा अकादमीं’ना मदत, बालगृहे व वृद्धाश्रमांना सहकार्य आणि दिव्यांग व्यक्तींसाठी उपक्रम, अशा विविध माध्यमांतून त्यांचा सामाजिक सहभाग अविरत सुरू आहे.
युवकांना आपल्याच राज्यात सन्मानाचा रोजगार आणि उज्ज्वल भविष्याच्या संधी मिळाल्या, तर ते बेरोजगारी आणि व्यसनांसारख्या आव्हानांपासून दूर राहतील, असा डॉ. सिंह यांचा ठाम विश्वास आहे. आरोग्य, हॉटेल, पर्यटन आणि प्रशिक्षण क्षेत्रांतून त्यांनी स्थानिक तरुणांसाठी नवे मार्ग खुले केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचे कामही त्यांच्या उपक्रमांतून सातत्याने सुरू आहे.
एका छोट्या प्रयोगशाळेतून सुरू झालेला हा प्रवास आज आरोग्यसेवा, पर्यटन, रोजगार, सामाजिक दायित्व आणि आंतरराष्ट्रीय मैत्रीपर्यंत विस्तारला आहे. एक समर्पित व्यक्ती आणि संस्था समाजपरिवर्तनाची किती भक्कम पायाभरणी करू शकते, हे डॉ. थंगजम धबाली सिंह यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
फुटीरता, दहशतवाद, देशद्रोही कारवाया, हिंदू समाजाला पलायन करायला प्रवृत्त करणारी सगळी आंतरराष्ट्रीय कारस्थाने, यांचे गेली सात दशके केंद्र असलेल्या मणिपूरमधील विशेषतः युवापिढीला व्यसनापासून दूर करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून, त्यांच्यात देशभक्ती आणि सकारात्मकता निर्माण करण्याच्या डॉ. थंगजम धबाली सिंह यांच्या या योगदानाचा गौरव करणारा ‘वन इंडिया पुरस्कार’ म्हणजे मणिपूरच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना दिलेली कृतज्ञतापूर्ण मानवंदनाच होय.
लेखक- सुनील देवधर