मुंबई (Chinmoy Krishna Das Prison Transfer) : बांगलादेशातील हिंदू संत आणि ‘सनातनी जागरण जोते’चे प्रवक्ते चिन्मय कृष्ण दास यांची १६ नोव्हेंबर रोजी चट्टोग्राम मध्यवर्ती कारागृहातून कडक सुरक्षाव्यवस्थेत ढाका येथील केरानिगंज मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र, अचानक करण्यात आलेल्या या बदलामुळे त्यांच्या वकिलांनी चिंता व्यक्त केली असून, त्यांच्या प्रकृतीला आणि जीवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे.
“आमचे आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण ब्रह्मचारी यांची अचानक चट्टोग्राम मध्यवर्ती कारागृहातून ढाका येथे बदली करण्यात आली. ते संन्यासी, ब्रह्मचारी, कट्टर शाकाहारी आणि वैष्णव संप्रदायाचे अनुयायी आहेत. स्वतःच्या हाताने स्वयंपाक केल्याशिवाय ते अन्नग्रहण करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या अचानक बदलीबाबत मला चिंता वाटत आहे,” असे त्यांचे वकील अपूर्व कुमार भट्टाचार्य यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.(Chinmoy Krishna Das Prison Transfer)
ते पुढे म्हणाले, “चट्टोग्राम कारागृहात रांगानाथन ब्रह्मचारी नावाचा सहआरोपी त्यांना मदत करीत होता. त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही तोच करीत असे. त्यामुळे कारागृहातील जवळपास दोन वर्षांच्या वास्तव्यात अन्नाच्या बाबतीत त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.” दरम्यान, रांगानाथ दास ब्रह्मचारी यांची बदली करण्यात आलेली नसून ते अद्याप चट्टोग्राम मध्यवर्ती कारागृहातच बंदिस्त आहेत.
भट्टाचार्य यांनी चिन्मय कृष्ण दास यांच्या प्रकृतीविषयीही गंभीर चिंता व्यक्त केली. “चिन्मय कृष्ण दास यांना यकृताचा गंभीर आजार आहे. त्यामुळे ते कोणतेही अन्न खाऊ शकत नाहीत. ढाका मध्यवर्ती कारागृहात त्यांच्या आहाराची विशेष व्यवस्था उपलब्ध नसल्याने सध्या त्यांना केवळ फळांवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती मला वाटते,” असे ते म्हणाले. मात्र दरम्यान, कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक इक्बाल हुसेन यांनी ‘द डेली स्टार’शी बोलताना; या बदलीमागे कोणतेही विशेष कारण नसून, कारागृह व्यवस्थापनाच्या नियमित प्रक्रियेचा तो एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Chinmoy Krishna Das Prison Transfer)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक