आपण जिथे कुठे असू, तिथे समाजहिताची आणि देशनिष्ठेची कामे करायला हवीत, या जाणिवेने कार्य करणार्या अॅड. जयश्री प्रबोध जयवंत यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
९०च्या दशकात कम्युनिस्टांनी पालघरमधील तलासरीच्या ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या वसतिगृहावर आणि इतर व्यवस्थेवर क्रूर आणि अत्यंत निर्घृण हल्ला केला. या हल्ल्यात अप्पा जोशी आणि त्यांच्या पत्नी वसुधा गंभीर जखमी झाल्या. ‘कल्याण आश्रमा’च्या सेवाभावी समाजशील विचारकार्यावर आघात करायचा कम्युनिस्टांनी एक भ्याड प्रयत्न केला होता. त्यांना वाटले, असे करून आपण आदिवासींसाठी ‘कल्याण आश्रमा’चे चालणारे सेवाभावी काम बंद पाडू. पण, ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे विचारकार्य हे कोणत्याही वास्तूवर किंवा दगडमातीच्या भिंतीवर, वस्तूवर अवलंबून नाही की, ज्यांची तोडफोड केली म्हणून विचारच संपतील! उलट, या हल्ल्याचे परिणाम पाहून जोशी दाम्पत्याची कन्या जयश्री यांच्यामध्ये जिद्द निर्माण झाली की, अन्याय करणारा कितीही मोठा असू दे, अन्यायाविरोधात आवाज उठवायचाच! देश-समाजाच्या हिताचे काम करताना प्राण पणाला लागले तरी बेहत्तर; पण माघार घ्यायची नाही! आज त्याच जयश्री म्हणजे, अॅड. जयश्री प्रबोध जयवंत. ठाणे-भिवंडी परिसरातील नामवंत वकील. जी वकील न्यायासाठी कधीच तडजोड करत नाही आणि निष्पापांना न्याय मिळवून देण्यासाठी अखंड कार्यरत असते.
अॅड. जयश्री या सध्या ‘अधिवक्ता परिषदे’च्या ठाणे जिल्ह्याच्या ‘आऊट रिच’ विभागाच्या उपाध्यक्ष आहेत. धर्म, समाज आणि देशावर आघात करणार्या घटनांवर न्याय अपेक्षित असतो. या न्यायासाठी त्या लढतात. त्यांनी पूर्वाश्रमी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ आणि ‘सहकार भारती’, तसेच ‘संस्कार भारती’च्या विविध जबाबदार्याही पार पाडल्या आहेत. हे देश-समाजासाठी समर्पणाचे संस्कार त्यांना आई-बाबांकडूनच मिळाले. पुढे पती प्रबोध जयवंत हेसुद्धा ‘हम चार दिन रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे माँ’ अशा विचारांचे. याचमुळे की काय, २०१८ साली भिवंडीमध्ये चार वर्षांच्या बालिकेवर निर्घृण अत्याचार झाला आणि तिचा खून करण्यात आला, त्यावेळी त्या बालिकेच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्यासाठी, तिच्या न्यायासाठी आंदोलन उभे करणे, ते कोर्टात त्या निष्पाप दुर्दैवी जीवाची बाजू मांडणे, यासाठी अॅड. जयश्री पुढे होत्या. त्यामुळेच त्या चिमुरडीवर अत्याचार करणार्या नराधमाला नऊ महिन्यांत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच ‘लव्ह जिहाद’मध्ये बळी पडलेल्या मुली-महिलांना न्याय मिळवून देण्यासाठीही त्या नेहमीच अग्रेसर असतात. महिला वकील म्हणून घरगुती हिंसाचार, तसेच घटस्फोटाचे खटले तर नेहमीच त्यांना हाताळावे लागतात. त्याविषयी अॅड. जयश्री म्हणतात की, "घटस्फोट मिळवून देण्यापेक्षा पती-पत्नींचा समन्वय घडवून ते पुन्हा एकोप्याने नांदतील, यासाठी काम करायला हवे.” यामुळेच त्यांच्याकडे घटस्फोटाची प्रकरणे घेऊन आलेली अनेक दाम्पत्ये आज पुन्हा एकत्र सुखाने नांदत आहेत. कारण, वकिली व्यवसायाचा उपयोग समाजासाठी करायचा, हा वसाच त्यांनी घेतला आहे. अशा सेवाभावी आणि समाजशील अॅड. जयश्री यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.
देवरूखचे महादेव (अप्पा) जोशी आणि वसुधा या दाम्पत्यांना तीन मुली. त्यांपैकी एक जयश्री. अप्पा हे संघाचे स्वयंसेवक. संघ समर्पित जगणे. त्यामुळेच तलासरी या आदिवासीबहुल भागात ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या वसतिगृहामध्ये व्यवस्थापक म्हणून ते जबाबदारी सांभाळू लागले. सोबत व्यवस्थापिका म्हणून वसुधा होत्या. जोशी कुटुंब अत्यंत नीतिमान आणि धैर्यशील. वसतिगृहातील मुलांसोबतच जयश्री या शाळेत जाऊ लागल्या. तिथे भौतिक साधनांची सुबत्ता नव्हती. मात्र, ‘सब समाज को साथ लिये’ म्हणत, समाजाच्या उत्थानासाठीचे संस्कार मिळत होते. इथेच तर जयश्री यांना आबा भेटले. आबा म्हणजे ऋषितुल्य माधवराव काणे. जयश्री म्हणतात, "आबा म्हणजे ‘आ’ आणि ‘बा’; त्यातला ‘आ’ म्हणजे आई आणि ‘बा’ म्हणजे बाबा. तर, आई आणि बाबांचे वात्सल्य, संस्कार देणारे आबा.” आबांच्या विचारकार्याच्या प्रेरणेचा ठसा जयश्री यांच्या मनावर कायमचा कोरला गेला. तसेच तत्कालीन खासदार चिंतामण वनगा हे वसतिगृहाचे माजी विद्यार्थी. त्यांचे विचार, समाजकार्याची शैली पाहून जयश्री यांना वाटे, आपणही यांच्यासाखे वकील व्हावे. पुढे आबांचे प्रोत्साहन आणि राम कापसे यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी ही इच्छा प्रत्यक्षात पूर्ण केली. त्या वकिलीचे शिक्षण घेऊ लागल्या.
दरम्यान, त्यांचा विवाह प्रबोध जयवंत या समविचारी तरुणाशी झाला. सासर अगदी संस्कार-विचारांनी समृद्ध. त्यामुळेच सासरी आल्यावर त्यांनी त्यांचे राष्ट्र-समाजहिताचे काम सुरूच ठेवले. ‘अधिवक्ता परिषदे’च्या माध्यमातून त्या काम करू लागल्या. जयश्री म्हणतात, "शोषित, दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहणार आहे. धर्मासाठी-समाजासाठी न्यायाचा आवाज उठवतच राहणार.” तर, अशा समाजशील, धर्मशील अॅड. जयश्री प्रबोध जयवंत यांना त्यांच्या विचारकार्यासाठी शुभेच्छा!