ज्ञानवाटेवरचा शब्दसाधक!

    16-Nov-2026   
 
Vinay Kshirsagar Spiritual Literary Journey
 
कॉर्पोरेट क्षेत्रातील आर्थिक व्यवस्थापनापासून प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेच्या शोधापर्यंतचा प्रवास पुस्तकांच्या माध्यमातून उलगडणारे विनय क्षीरसागर यांच्याविषयी...
 
विनय यांचा जन्म पुण्यातला. त्यांचे शालेय शिक्षण मुलुंडच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ‘बीएससी’चे शिक्षण झाल्यावर, त्यांनी ‘सीए’ची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण होताच, त्यांना नोकरीची संधी चालून आली. १९८४मध्ये नोकरी मिळाल्यापासून, त्यानंतरची २४ वर्षे त्यांनी दोन कंपनीत ‘चीफ फायनान्शिअल ऑफिसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. सध्या एका कंपनीत ते ’मॅनेजिग डायरेक्टर’ पदावर मागील दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. विनय यांचे वडील सुधाकर हे एका बँकेत नोकरीला, तर आई ललिता गृहिणी. त्यांना एक बहीणही आहे. १९८९ मध्ये विनय यांची लग्नगाठ सविता यांच्याशी बांधली गेली. सविता ‘फिजिओथेरपिस्ट’ आहेत. त्यांचे स्वत:चे एक लिनिक आहे. त्यांचा मुलगा ओमकार यानेही वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत, ‘सीए’ म्हणूनच ‘करिअर’ केले.
 
विनय यांना लहानपणापासूनच बॅडमिंटनची आवड. त्यामुळे त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतही सहभाग घेतला, त्यांना उत्तम पोहताही येते. रुईयामधील ग्रंथालयात पुस्तकांचा खजिना आहे. त्यामुळे विनय यांच्या वाचनात अनेक पुस्तके आली. वाचन अधिक असल्याने, त्यांनी आपल्या क्षेत्राशी संबंधित दोन पुस्तकेही लिहिली. त्यातील पहिले पुस्तक ‘इंडियन रुपी आणि डॉलर फोरकास्ट’ हे ‘विकास प्रकाशन’ने २०१५ मध्ये प्रकाशित केले. २०१८ मध्ये ‘आयएनआर व यूएसडी फोरकास्ट अ‍ॅण्ड रिस्क मॅनेजमेंट अ‍ॅण्ड स्टेटर्जी’ पुस्तक लिहिले. हे पुस्तक ‘करिअर पाईंट पब्लिकेशन’ने प्रकाशित केले.
 
विनय यांच्या घरी आध्यात्मिक परंपरा होती. त्यांचे आजोबा शंकर संस्कृतमधील ‘जगन्नाथशेठ शिष्यवृत्ती’ विजेते. त्यांनी गावातील मंदिर बांधण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला आणि मंदिर त्यांनी गावासाठी अर्पण केले. यातूनच त्यांना आध्यात्मिक पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. विनय ‘कोविड’ काळात ‘श्रीविष्णू सहस्रनाम’ पठण करत होते. त्याच काळात ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांच्या आवाजातील ‘विष्णू सहस्रनाम’ ऐकण्याचा योगही त्यांना आला. किशोरी यांच्या अत्यंत शुद्ध स्वरांनी त्यांच्या मनावर विलक्षण किमया केली. त्या शब्दामधील कंपने थेट त्यांच्या हदयाला भिडू लागली. त्या शब्दब्रह्माच्या नादामुळे, त्यांची दिवसाची सुरुवात प्रसन्न होऊ लागली. प्रत्येक नामाबद्दल एक आकर्षण निर्माण झाले. या स्त्रोत्राच्या प्रत्येक शब्दात काहीतरी गूढ दडले आहे, याची जाणीव त्यांना झाली.
 
पुढे ‘महाभारता’मधील ज्ञान कोणतीही लिखित लिपी नसताना, आपल्यापर्यंत कसे पोहोचले, याच उत्सुकतेने ते भारताचा प्राचीन इतिहास आणि विज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. त्यांनी त्यावर सखोल वाचन केले. त्यांनी त्यांची एक सहकारी साक्षी डहाणूकर यांच्या मदतीने, दर आठवड्याला एकेका नामाबद्दलची माहिती गोळा करून, ती संकलित करण्याचेही काम सुरू केले. विनय सायंकाळी कामावरून आल्यावर वाचन आणि संकलन करण्याचे काम करत. प्रत्येक दिवशी त्यांना नवीन माहिती मिळे आणि आधी लिहिलेल्या भागात सुधारणा होई. त्यातूनच ‘द सेकंड सेक्रेड ज्वेल ऑफ महाभारत श्रीविष्णू सहस्रनाम’ या पुस्तकाची निर्मिती झाली. हे पुस्तक ‘स्टोरी मिरर’ प्रकाशनाने प्रकाशित केले.
 
या पुस्तकांतील संकलन विनय क्षीरसागर आणि साक्षी डहाणूकर यांचे असून, हे पुस्तक ‘स्टोरी मिरर’, ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘गुगल प्ले बुक्स’ येथे ‘ई-बुक्स’ स्वरूपात उपलब्ध आहे. हे इंग्रजी पुस्तक असून, त्यात २ लाख ४६ हजार शब्द आहेत. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती पुढील आठवड्यात प्रसिद्ध होत आहे. त्यामध्ये २ लाख २ हजार शब्दांचा मजकूर आहे.
 
या ग्रंथाचा उद्देश अध्यात्माला विज्ञानाच्या चौकटीत बंदिस्त करणे किंवा प्राचीन ग्रंथांवर आधुनिक वैज्ञानिक चौकटी लादणे, हा नाही. त्याऐवजी तो व्यापक प्रश्न विचारतो की, आधुनिक युगाच्या बौद्धिक जिज्ञासेने प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरांकडे पुन्हा पाहताना, त्यांची आध्यात्मिक खोली आणि सांस्कृतिक अस्मिता अबाधित ठेवता येईल का? यासाठी ‘विष्णू सहस्रनाम’ हा विलक्षण विषय आहे. कारण, त्यातील सहस्रनामांमध्ये ईश्वर, चेतना, निसर्ग, धर्म, अस्तित्व आणि जीवनाच्या अंतिम अर्थाचा शोधाविषयीच्या, असंख्य संकल्पना सामावलेल्या आहेत.
 
या पुस्तकाचा प्रवास भीष्म पितामहांच्या बाणांच्या शय्येपासून सुरू होतो आणि हजारो वर्षांच्या भारतीय वैचारिक इतिहासातून पुढे जात, आधुनिक जगात अभ्यासल्या जाणार्‍या प्रश्नांपर्यंत पोहोचतो. चेतना, आकलन, स्मरणशक्ती, ध्वनी, एकाग्रता आणि मानवी कल्याण याविषयीचे प्रश्न विचारतो. ‘विष्णू सहस्रनामा’चे खरे महत्त्व केवळ त्यात विष्णूची एक हजार नावे आहेत एवढ्यातच नसून, त्या सर्व नामांनी मिळून साकारलेल्या विशाल तत्त्वज्ञानविश्वात आहे; हे दाखविण्याचा प्रयत्न विनय यांनी केला आहे.
 
याच पुस्तकाचे मराठीमध्ये भावार्थ रूपांतर त्यांच्या पत्नी सविता यांनी केले असून, ते पुण्यातील नामवंत कंपनी ‘बुकगंगा’ यांनी नुकतेच प्रकाशित केले आहे. त्याचे नाव ‘श्रीविष्णू सहस्रनाम महाभारतातील एक अमूल्यरत्न’ हे पुस्तक ‘बुकगंगा’, तसेच ‘अ‍ॅमेझॉन’ वेबसाईट, तसेच ‘ई-बुक’ स्वरूपात उपलब्ध आहे. विनय यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!




संबंधित मजकूर