भवितव्य अभयारण्यांचे - भाग 3: नक्षलमुक्त प्राणहिताला संवर्धनाची प्रतीक्षा

    16-Nov-2026
gadchiroli conservation
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नक्षलमुक्त झालेल्या गडचिरोलीतील प्राणहितासह घोषित झालेल्या इतर अभयारण्याचे व्यवस्थापन आता वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टिकोनातून होण्याची गरज आहे (gadchiroli conservation). ताडोबा ते छत्तीसगडमधील वन्यजीव भ्रमणमार्गांमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या प्राणहिता अभयारण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रशासकीय सुसूत्रतेकरिता वनपरिक्षेत्रांची पुनर्बांधणी हे त्यापुढील महत्त्वाचे आव्हान आहे. (gadchiroli conservation)
 
 
प्राणहिता वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्राच्या पूर्व टोकाला, गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि अहेरी तालुक्यांमध्ये वसलेले महत्त्वाचे वन्यजीव अधिवास क्षेत्र आहे. या अभयारण्याची अधिसूचना २७ ऑगस्ट २०१४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. मात्र, अधिसूचनेनंतरही त्याचे व्यवस्थापन प्रादेशिक वनविभाग करत आहे. वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिरोंचा प्रादेशिक वन विभागाने या अभयारण्याचा ताबा वन्यजीव विभागाकडे देण्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे वरिष्ठ स्तरावर पाठवली आहेत. हे अभयारण्य ४२० चौ.किमी क्षेत्रावर पसरलेले आहे. सद्यपरिस्थितीत अभयारण्याचे क्षेत्र हे प्रादेशिक वन विभागाच्या चार वनपरिक्षेत्रांमध्ये विभागलेले आहे. ज्यामुळे हे क्षेत्र प्रादेशिक विभागाकडून वन्यजीव विभागाकडे वर्ग केले जात असताना त्याचे तुकड्यांमध्ये विभाजन होत आहे. त्यामुळे विखुरल्या क्षेत्राचे व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी अभयारण्याच्या दृष्टीने येथील वनपरिक्षेत्रांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. ही पुनर्रचना करुन त्यासंदर्भातील कागदपत्रे सिरोंचा वनविभागाने वरिष्ठ स्तरावर पाठवली आहेत.
 
यापूर्वी या संपूर्ण परिसर नक्षल प्रभावाखाली होता. मात्र, आता हा परिसर नक्षलमुक्त झाला आहे. त्यामुळे येथील व्यवस्थापन वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाच्या अनुषंगाने होणे गरजेचे आहे. कारण, नक्षल आणि पारंपारिक शिकार पद्धतीमुळे प्राणहितासह गडचिरोलीच्या वनक्षेत्रातील तृणभक्षी प्राण्यांची घनता कमी झाली आहे. प्राणहितामध्ये देखील काहीसे असेच असून येथील तृणभक्षी प्राण्यांची घनता वाढविणे आवश्यक आहे. याशिवाय 'डब्लूआयआय'च्या अभ्यासानुसार याठिकाणी पाळीव गुरांची घनता प्रतिचौरस किलोमीटरला २८.६१ इतकी नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच वन्य तृणभक्षकांच्या अधिवासावर पाळीव गुरांच्या चराईचा मोठा दबाव असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचे व्यवस्थापन वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने होणे आवश्यक आहे.
 
तृणभक्षी वाढविण्याची गरज
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून छत्तीसगडमधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्पापर्यंतच्या व्याघ्र भ्रमणमार्गाच्या या भागात प्राणहिता वन्यजीव अभयारण्य देखील महत्त्वाचा दुवा आहे. ताडोबा आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रातील वाढलेला मानव-व्याघ्र संघर्ष थोपविण्यासाठी कन्हाळगावसह घोडाझरी, प्राणहिता वन्यजीव अभयारण्याचे हस्तांतरण वन्यजीव विभागाकडे होणे आवश्यक आहे. जेणेकरून वाघांच्या हालचाली सुकर पद्धतीने होतील. त्यासाठी प्राणहितामधील तृणभक्षी प्राण्यांची घनता वाढवणे आणि अधिवासाचे पुनरुज्जीवन करणे देखील गरजेचे आहे. - दिनेश काटे, अध्यक्ष - हॅबिटॅट काॅन्झर्वेशन सोसायटी
अभयारण्याचे वैशिष्ट्य

- या अभयारण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमावर्ती प्रदेशातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या पट्ट्यात आहे.
- या अभयारण्याचा परिसर तेलंगणातील प्राणहिता वन्यजीव अभयारण्य आणि छत्तीसगडमधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित वन्यजीव भ्रमणक्षेत्राचा भाग आहे.

- या अभयारण्याच्या परिसरात कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्रासह इतर वनक्षेत्रेही आहेत. त्यामुळे मोठ्या वन्यप्राण्यांच्या हालचाली आणि अधिवासांच्या परस्परसंबंधांच्या दृष्टीने या प्रदेशाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

- नदीखोरे, पानझडी जंगले आणि विविध प्रकारच्या नैसर्गिक अधिवासांमुळे येथे वन्यजीवांना अनुकूल परिस्थिती उपलब्ध होते.





संबंधित मजकूर