मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाचे (Tarali Pumped Storage Project) काम राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (NBWL) अनिवार्य पूर्वपरवानगी न घेताच सुरू असल्याचे तब्बल दीड वर्षानंतर वन विभागाच्या निदर्शनास आले आहे (Tarali Pumped Storage Project). याप्रकरणी पाटण वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रकल्पाच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, प्रकल्पस्थळी सुरू असलेली सर्व कामे तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. (Tarali Pumped Storage Project)
विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी नसतानाही काम सुरू असल्याची बाब मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी यापूर्वीच निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पंतप्रधान कार्यालय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता वन विभागाने या प्रकरणी नोटीस बजावली आहे. पाटण वन विभागाने बजावलेल्या नोटिशीनुसार, प्रकल्पासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (National Board for Wildlife) पूर्वपरवानगी अद्याप प्राप्त झालेली नसतानाही प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे. ही बाब वन विभागाच्या तपासणीदरम्यान निदर्शनास आली. त्यामुळे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ आणि महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम, १९६४ मधील तरतुदींचा संदर्भ देत ही नोटीस बजावण्यात आली आहे.
वन विभागाने प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेली सर्व प्रकारची कामे सक्षम प्राधिकरण आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची रीतसर पूर्वपरवानगी मिळेपर्यंत तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, प्रकल्पाचे काम कोणत्या अधिकाराखाली आणि कशाच्या आधारावर सुरू करण्यात आले, याचा लेखी खुलासा करण्यास सांगितले आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत हा खुलासा पाटण वनपरिक्षेत्र कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.याशिवाय, प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात वृक्षतोड करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे का, याची माहितीही वन विभागाने मागवली आहे. वृक्षतोडीची एकूण संख्या, त्यासंबंधीचे मूळ किंवा साक्षांकित परवानगीपत्र, तसेच प्रकल्पाशी संबंधित इतर सर्व वैधानिक मंजुरींची कागदपत्रे आणि नकाशे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विहित तीन दिवसांच्या मुदतीत समाधानकारक खुलासा आणि आवश्यक परवानगीची कागदपत्रे सादर न केल्यास किंवा परवानगी नसतानाही काम सुरू ठेवल्याचे आढळल्यास वन कायद्यानुसार कठोर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वन विभागाने दिला आहे. पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. नलवडे यांनी ही नोटीस बजावली आहे.
नेमका काय आहे प्रकल्प?
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात १,५०० मेगावॅट क्षमतेचा तारळी पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. निवडे, तोंडोशी, कळंबे आणि जळू या चार गावांमधील सुमारे १५०.७४ हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. तारळी धरणाचा विद्यमान जलाशय आणि नव्याने बांधण्यात येणारा उर्ध्व जलाशय यांच्यामध्ये पाण्याचे पुनर्चक्रण करून विजेची निर्मिती करणे, हे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. प्रकल्पाची प्रस्तावित क्षमता १,५०० मेगावॅट असून साठवण क्षमता ९,००० मेगावॅट-तास आहे. हा प्रकल्प जरी खासगी जागेवर सुरू असला तरी राज्य वन विभागाच्या माहितीनुसार, प्रकल्पाचे क्षेत्र कोयना वन्यजीव अभयारण्याच्या अधिसूचित तसेच मानल्या जाणाऱ्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात (Deemed ESZ) येते. कोयना अभयारण्य हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे.