कोकणच्या रानवाटांवर सहज आढळणारी; पण औषधी, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचा मोठा वारसा जपणारी ‘मुरुडशेंग’ ही वनस्पती अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाळगुटीपासून पारंपरिक उपचारांपर्यंत आणि गणपतीच्या माटीसाठी लागणार्या दोरांपासून आदिवासींच्या दैनंदिन जीवनापर्यंत तिचा वापर रूढ आहे. सह्याद्रीच्या कुशीत वाढणार्या या बहुगुणी वनस्पतीची ओळख करून देणारा हा लेख...
सह्याद्रीच्या पाऊलवाटा नेहमीच आपल्या वेगळेपणाची ओळख करून देत असतात. या पाऊलवाटांवर औषधी वनस्पती अन् त्यासोबत अनुभवलेल्या काही गोष्टी कायम स्मरणात राहतात. अशाच सह्याद्रीच्या पाऊलवाटेवर मला ओळख झाली ती मुरुडशेंगेची!
‘मुरुडशेंग’! नाव ऐकून थोडे वेगळे वाटते; पण या एका वनस्पतीमुळे काय-काय गोष्टी घडू शकतात हे कळले की, आयुष्यभर तिला संग्रही ठेवण्याचा मोह प्रत्येकालाच होईल. अशी ही वनस्पती वनस्पती-शास्त्रीयदृष्ट्या "Helicteres isora' या नावाने ओळखली जाते. भारत, चीन, ऑस्ट्रेलिया या देशांत ती प्रामुख्याने आढळते. ‘स्टरयूलिसी’ कुळातील या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.जगभरातल्या ‘हेलिटोरस’च्या ६० प्रजातींतील केवळ दोन जाती आपल्या भारतात आढळतात. प्राचीन काळापासून या वनस्पतीचा वापर आपल्याकडे केला जातोय. विशेषतः बाळगुटीत तिला विशेष असे स्थान दिले गेले आहे. भारतातल्या बर्याच जंगलांमध्ये ती पाहायला मिळते. कोकणातल्या बहुतांश रानवाटांवर साधारण चार ते पाच मीटर उंचीची रचना असलेल्या या झाडाला लंबगोलाकार पाने असतात. धामण वृक्षाप्रमाणेच या वनस्पतीच्या पानांची रचना पाहायला मिळते. दातासारख्या असणार्या पानाच्या एकाआड एक फांद्यांवर पाच-सहा फुलांचे लालभडक गुच्छ सहजच लक्ष वेधून घेतात. कधीकधी फुले एकटीसुद्धा दिसतात. वर्षाऋतूच्या शेवटाला साधारण सप्टेंबर ते जानेवारी या महिन्यात फुलणार्या या फुलांचे हे सौंदर्य काही वेगळेच असते. फुलांकडे पाहात असताना, पाच लाल पाकळ्यांतून येणारा केसरदलाचा दंडक कधी झुकलेला, तर कधी फुलांना सरळ करतो की काय, असे वाटते. फुलांचा लाल भडक रंग कायम राहत नाही. तो पुढे निळसर होत जातो. यासोबतच वनस्पतीच्या शेंगेच वेगळेपण दिसून येते.
‘मुरुड’ पडलेली शेंग सुरुवातीला हिरवट असते. सुकल्यानंतर ती काळी होते. शेंगेच्या ‘मुरुड’ असणार्या घड्यांमुळे वनस्पतीला ‘मुरुडशेंग’ हे नाव पडले. वनस्पतीच्या खोडाची किंवा कोणत्याही अंगाची छाटणी केली, तरीही नव्या फुटव्यातून ती पुन्हा जन्म घेते. कोकणातल्या जांभ्या खडकाळ जमिनीत घट्ट मुळे रोवून उभे राहण्याची ताकद वनस्पतीमध्ये दिसून येते.
संस्कृतमध्ये ‘मूरवा’, ‘आवर्तनी’ म्हणून खास ओळख असलेली वनस्पती कोकणात ‘केवण’ म्हणून नावारूपास आली. कोकणी माणसाच्या लाकूडफाट्याला तिचे दोर उपयोगात आले. एवढेच नव्हे, तर गणपतीत माटी बांधायची झाली; तर ती केवणीच्या दोरांचीच ही पद्धत रूढ झाली. आदिवासी पाड्यांत मुरुडशेंगा पाण्यात उकळून आजही पोटदुखीसाठी वापरल्या जातात. यासोबतच ते वनस्पतीच्या सालींचा उपयोग पूर्वापार धागे काढण्यासाठी करत आहेत. पूर्वी या झाडाच्या खोडापासून मिळणारा कोळसा बंदुकीच्या दारूसाठी वापरण्यात येत होता. मुरुडशेंगेचा उपयोग केवळ औषधी उपचारांपुरता मर्यादित नसून, विविध घरगुती आणि पारंपरिक उपचारांमध्येही केला जातो. ही शेंग शीतल गुणधर्माची असल्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तिचा पारंपरिक वापर केला जातो. कानदुखी किंवा खरूज यांसारख्या समस्यांमध्ये मुरुडशेंगेची ‘पेस्ट’ लावण्याची पद्धतही काही ठिकाणी प्रचलित आहे. तसेच कृमिनाशक म्हणून आणि पचनक्रियेला मदत करण्यासाठी तिचा उपयोग केला जात असल्याचे उल्लेख आढळतात.
पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही वनस्पती महत्त्वाची भूमिका बजावते. ती लहान कीटक आणि पक्ष्यांना निवारा उपलब्ध करून देते. याखेरीज जनावरांच्या चार्यासाठी कोवळ्या पानांचा वापर भारतात अनेक जंगल क्षेत्रात करण्यात येतो. परागीभवनासाठी आकर्षिल्या जाणार्या विविध कीटकांमुळे परिसरातील जैवविविधता वाढण्यास आणि नैसर्गिक परिसंस्थेचा समतोल राखण्यास मदत होते. कोकणात सर्पदंशात कोवळ्या फळांचा वापर केला जातो. लहान मुलांच्या अतिसार आणि बद्धकोष्ठतेत रामबाण औषध म्हणून ही वनस्पती नावारूपास आली. म्हणूनच की काय, बिहारमधील आदिवासी पाड्यांत आजही ‘ताबीज’ म्हणून वनस्पतीच्या बिया धारण केल्या जातात. त्या मुलाचे कुपोषण बरे करतात, अशी आजही त्या लोकांची धारणा आहे. उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी अजूनही जनावरांच्या जखमा बर्या करण्यासाठी मुरुडशेंगेच्या मुळाचा अर्क दिला जातो. काही ठिकाणी तर कुत्रा चावल्यावर हा अर्क वेदना कमी होण्यासाठी दिला जातो. असे नानाविध उपयोग असलेली ‘आजीबाईच्या बटव्या’तील ही एक महत्त्वाची प्राचीन वनस्पती आहे. २१व्या शतकात वावरताना आजही ग्रामीण भागातील आजी आपल्या बटव्यातून मुरुडशेंग काढून तिचा एक वळसा लहान बाळाला भरवते. त्याने बाळाची मुरड थांबते.
परेश गुरव
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) वनस्पतिशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
७४४८३७६९९७