महाराष्ट्रातील गवताळ परिसंस्था आणि शुष्क काटेरी वनक्षेत्रांच्या संवर्धनाकडे आजही तुलनेने दुर्लक्ष होत असताना, माणदेशातील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी स्थानिक पातळीवर पुढाकार घेण्यात आला आहे. भारतीय लांडगा, पट्टेरी तरस, खोकड यांसारख्या वन्यजीवांचे अधिवास जपण्यासह माळरानांचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण, संशोधन आणि स्थानिक समुदायांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने ‘माणदेश इकोलॉजिकल अॅण्ड वाईल्डलाईफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली आहे. ‘लांडगामित्र’ उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना संवर्धनाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याबरोबरच निसर्गसंवर्धनातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे.
माणदेश म्हटले की, डोळ्यांसमोर येतात विस्तीर्ण माळराने, शुष्क काटेरी वनक्षेत्रे, रखरखीत डोंगररांगा आणि दुष्काळी परिस्थिती. मात्र, या रुक्ष भासणार्या प्रदेशात जैवविविधतेचा समृद्ध खजिना दडलेला आहे. भारतीय लांडगा, पट्टेरी तरस, खोकड यांसारख्या वन्यजीवांसह विविध पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पतींचे अस्तित्व या परिसंस्थांशी जोडलेले आहे. माळरानांकडे अनेकदा पडीक जमीन म्हणून पाहिले जात असल्याने, या अधिवासांचे पर्यावरणीय महत्त्व दुर्लक्षित राहते. हीच बाब लक्षात घेऊन माणदेशाच्या नैसर्गिक वारशाच्या संरक्षणासाठी ‘माणदेश इकोलॉजिकल अॅण्ड वाईल्डलाईफ सोसायटी’ (MEWS) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संशोधन, अधिवास संरक्षण आणि लोकसहभागातून माणदेशातील जैवविविधतेला नवी ओळख मिळवून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. ‘पक्षी सप्ताहा’च्या सांगता दिनाचे आणि महान पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १२ नोव्हेंबर रोजी दहिवडी येथे संस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडला. ‘कोल्हापूर वनवृत्ता’च्या मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी अन्नाबथुला यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन झाले. यावेळी सातार्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि ‘माणगंगा भ्रमण सेवा’ संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ घोंगडे उपस्थित होते. संस्थेचा लोगो, ब्रीदवाक्य आणि ध्येय-धोरणांचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
माळरानांचे पर्यावरणीय महत्त्व
गवताळ प्रदेश आणि शुष्क काटेरी वनक्षेत्रे या स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक परिसंस्था आहेत. मात्र, जंगलांच्या तुलनेत त्यांना संवर्धनाच्या चर्चेत अनेकदा दुय्यम स्थान मिळते. माणदेशातील माळरानांवरही हेच संकट आहे. भारतीय लांडगा, पट्टेरी तरस आणि खोकड यांसारख्या वन्यजीवांसाठी हे महत्त्वाचे अधिवास आहेत. त्याचबरोबर गवताळ प्रदेशातील पक्षी, कीटक आणि सरपटणार्या प्राण्यांच्या अस्तित्वासाठीही या परिसंस्थांचे जतन आवश्यक आहे. माळरानांचे संवर्धन करताना केवळ वन्यजीवांचे संरक्षण करून चालणार नाही, तर त्यांच्या संपूर्ण अधिवासाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. गवताळ प्रदेशांचे स्वरूप टिकवणे, शुष्क काटेरी वनांचे संरक्षण, पाणवठ्यांचे जतन आणि वन्यजीवांच्या अधिवासांचे ‘मॅपिंग’ अशा विविध स्तरांवर काम करण्याचे संस्थेचे नियोजन आहे.
किरकसालच्या अनुभवातून संवर्धनाचा विस्तार
संस्थेचे अध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक चिन्मय प्रकाश सावंत यांनी संस्थेच्या उद्दिष्टांची माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील किरकसाल गावातून लोकसहभागाच्या माध्यमातून सुरू झालेल्या संवर्धनाच्या प्रयत्नांना व्यापक स्वरूप देण्याचा संस्थेचा मानस आहे. स्थानिकांचे पारंपरिक ज्ञान, शास्त्रीय संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून, माण आणि खटाव तालुक्यांसह संपूर्ण माणदेशात संवर्धनाचे काम केले जाणार आहे.
माळरानांकडे केवळ पडीक जमीन म्हणून न पाहता, त्यांचे पर्यावरणीय महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय लांडग्यासह गवताळ अधिवासांवर अवलंबून असलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे जतन महत्त्वाचे आहे. यासाठी स्थानिक समुदायांना संवर्धन प्रक्रियेचा सक्रिय भागीदार बनवण्यावर भर राहील.
नद्या, जलस्रोत आणि स्थानिक जैवविविधतेचे जतन
माणदेशातील जैवविविधतेचे संवर्धन केवळ वन्यजीवांपुरते मर्यादित राहणार नाही. माणगंगा नदीसह स्थानिक नद्या, तलाव, पाणवठे आणि पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण करण्यावरही संस्था भर देणार आहे. नदी स्वच्छता, जलस्रोतांचे पुनर्भरण, नदीकाठच्या परिसंस्थांचे संवर्धन आणि जलचर प्रजातींसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करणे, अशा उपक्रमांचा संस्थेच्या कार्य आराखड्यात समावेश आहे. त्याचबरोबर स्थानिक वनस्पती, औषधी वनस्पती आणि गवताळ प्रदेशांच्या पुनरुज्जीवनासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
‘लांडगामित्र’ घडवणार स्थानिक वन्यजीव रक्षक
स्थानिक नागरिकांचे ज्ञान आणि सहभाग संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. याच विचारातून संस्थेने ‘लांडगामित्र’ हा उपक्रम प्रस्तावित केला आहे. याअंतर्गत स्थानिक युवकांना वन्यजीव निरीक्षण, प्रजातींची ओळख, वन्यजीवांच्या हालचालींच्या नोंदी आणि महत्त्वपूर्ण घटनांचे दस्तऐवजीकरण करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षित युवकांना आवश्यक साधनसामग्री आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन वन्यजीव निरीक्षणाच्या कामात सहभागी केले जाईल. वन्यजीवदर्शनाच्या नोंदी, अधिवासातील बदल आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांची माहिती संकलित करण्यासाठी हे युवक महत्त्वाची भूमिका बजावतील. वन विभाग आणि स्थानिक समुदाय यांच्यात समन्वय साधण्याचे कामही या माध्यमातून केले जाणार आहे.
संवर्धनातून रोजगारनिर्मिती
निसर्गसंवर्धन आणि स्थानिक समुदायांचे आर्थिक सक्षमीकरण यांची सांगड घालण्याचे उद्दिष्टही संस्थेने ठेवले आहे. निसर्गपर्यटन आणि कृषिपर्यटनाला चालना देऊन स्थानिक युवक, महिला आणि ग्रामस्थांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. युवकांना ‘निसर्ग मार्गदर्शक’ म्हणून प्रशिक्षण देणे, महिलांसाठी पर्यावरणपूरक स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, अशा उपक्रमांचे नियोजन आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये पर्यावरण शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी निसर्ग अभ्यास सहली आणि युवकांसाठी प्रशिक्षण शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत.
वन विभागाकडून सहकार्याची ग्वाही
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी अन्नाबथुला यांनी माणदेशातील गवताळ परिसंस्थांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले. माळरानप्रधान प्रदेशातही वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था अस्तित्वात असून, त्यांचे जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वन विभाग आणि स्थानिक समुदाय यांच्यात समन्वय साधण्यासाठी अशा संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. माण तालुक्यासारख्या दुष्काळप्रवण भागात पर्यावरणसंवर्धनासाठी संस्था स्थापन होणे आणि तरुणांचा सक्रिय सहभाग वाढणे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. किरकसालमधून सुरू झालेले संवर्धनाचे कार्य देशपातळीवर पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना संस्थेला वन विभागाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
संस्थेचे सचिव डॉ. सुजित जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ‘माणदेशातील लांडगे, गवताळ परिसंस्था व सहजीवन’ या विषयावर सादरीकरण करण्यात आले. उपाध्यक्ष डॉ. प्रवीण चव्हाण यांनी माणदेशातील पक्षिवैविध्य, तर अर्णव गंधे यांनी वन्यजीवन आणि निसर्गसंवर्धनाविषयी मनोगत व्यक्त केले. माणदेशातील जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण, अधिवासांचे संरक्षण, स्थानिक युवकांचे प्रशिक्षण आणि समुदायांचे सक्षमीकरण या माध्यमांतून संवर्धनाची चळवळ उभी करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. माळरानांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलून या नैसर्गिक अधिवासांचे महत्त्व अधोरेखित करणे, हे या उपक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट ठरणार आहे.
चिन्मय सावंत
९७०२००१४३७