कुंभारांचे अन् ‘प्रजापतीं’चे क्रीडाविश्व!

    16-Nov-2026
Kumhar Prajapati Sports Legacy
 
 मातीच्या गोळ्याला आकार देणार्‍या कुंभाराच्या बोटांत सर्जनशीलतेचा वारसा असतो, तर त्याच मातीच्या आखाड्यात घाम गाळणार्‍या पैलवानांच्या बाहूंमध्ये जिद्दीचे बळ! मातीशी असलेले हे नाते कुंभार आणि प्रजापती समाजाने आपल्या कर्तृत्वातून क्रीडांगणापर्यंत नेले. या श्रमसंस्कृतीचा आणि वनवासी क्रीडावीरांच्या योगदानाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
दिवाळीचा आनंद, मातीच्या पणत्यांचा प्रकाश आणि बालगोपाळांनी बांधलेले मातीचे किल्ले, यातील उत्साह आपल्याला थेट देवदिवाळीपर्यंत (कार्तिक पौर्णिमा) अनुभवता येतो. या दिवसांमध्ये पुण्याच्या संभाजी बागेत रंगणारे भव्य मातीच्या किल्ल्यांचे प्रदर्शन असो किंवा घराघरांसमोर साकारलेले किल्ले असोत; लहान मुलांच्या या सर्जनशीलतेला आणि उंबरठ्यावर तेवणार्‍या पणत्यांना कुंभारवाड्याच्या अफाट श्रमांचा व कलाकुसरीचा आधार असतोच. संत गोरा कुंभार यांच्यासारख्या संतांनी माती, चाक आणि भक्तीचे जे अद्वैत दर्शन महाराष्ट्राला घडवले, त्याच परंपरेशी घट्ट नाळ जोडून या समाजाने भारतीय क्रीडाविश्वालाही अनेक लखलखीत हिरे दिले आहेत.
 
यावेळेस आणखी एक अत्यंत योगायोगाचा आणि अभिमानास्पद मुद्दा म्हणजे, दि. १५ नोव्हेंबर, भगवान बिरसा मुंडा यांची जयंती! आपल्या मातीशी आणि जंगलाशी एकरूप झालेल्या वनवासी समाजाचे आराध्य दैवत आणि ‘धरतीआबा’ म्हणून ओळखले जाणारे भगवान बिरसा मुंडा यांनी, अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण देशात ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा होतो. या निमित्ताने मातीशी इमान राखणार्‍या कुंभार समाजाच्या योगदानासोबतच, देशाच्या क्रीडाविश्वात योगदान देणार्‍या वनवासी व आदिवासी क्रीडावीरांचे कौतुक करण्याचा हा सुवर्णयोग आहे.
 
कुंभारांचे चाक आणि लाल मातीचा आखाडा
 
कुंभाराचा व्यवसाय हा मुळातच प्रचंड शारीरिक कष्टाचा. माती तुडवणे, मळणे, चाकावर जड गोळा फिरवणे आणि आव्याची कामे करणे (मातीची भांडी, कौले पक्की करण्यासाठी भट्टी रचणे व भाजणे), यामुळे हाताचे स्नायू नैसर्गिकरीत्याच पोलादी होतात. याच शिदोरीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात, विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरच्या तालमींमध्ये कुंभार समाजातील अनेक तरुणांनी कुस्तीचे आखाडे गाजवले. महाराष्ट्राच्या कुस्ती-संस्कृतीत तांबड्या मातीच्या तालमींचे स्थान अनन्यसाधारण! लाल मातीत कुंभार समाजातील अनेक मल्लांनी आपले कर्तृत्व गाजवून, कुस्तीचा वारसा जपला. मात्र, हा क्रीडावारसा केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून, महाराष्ट्रेतर कुंभार समाजानेही कुस्ती व इतर खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
 
माटी कहे...
 
महाराष्ट्रात जसे मातीची भांडी बनवणार्‍या समाजाला ‘कुंभार’ म्हणतात, तसेच भारतात या समाजाला विविध नावांनी ओळखले जाते.
 
माटी कहे कुम्हार से, तू या रौंदे मोहे|
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूंगी तोहे॥
 
संत कबीरदासांच्या या प्रसिद्ध ‘दोह्या’त असणारा कुंभार समाजाचा उल्लेख भारतभर सर्वश्रुतच. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा अशा उत्तरेकडील राज्यांमध्ये यांना, ‘कुम्हार’ किंवा ‘प्रजापती’ म्हणून ओळखले जाते. गुजरातमध्ये ’कुंभार’ किंवा ’प्रजापती’, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये ‘कुंभकार’ किंवा ‘पाल’, ओडिशामध्ये ‘कुंभार’ किंवा ‘कुंभकार’, तर कर्नाटकमध्ये ‘कुंबारा’ म्हणून हा समाज प्रसिद्ध आहे. तामिळमध्ये मातीची भांडी या समाजाला ‘कुलावर’ किंवा ‘वेल्लार’, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये ‘कुम्मारा’ म्हटले जाते. केरळममध्ये ‘कुशवन’ किंवा ‘कुंबारा’ संबोधले जाते. असा हा समाज देशात मोठ्या प्रमाणावर संघटित आहे.
 
महाराष्ट्रात तालीम संस्कृती हे एक जीवनव्रत आहे. कुंभार समाजातील मल्लांनी तालमीतील शिस्त आणि कठोर परिश्रमांच्या जोरावरच, कुस्तीच्या मैदानात स्वतंत्र ओळख निर्माण केली. कुस्तीत जेव्हा ‘पै. कुंभार’ अशी हाक पुकारली जाते, तेव्हा त्यामागे पिढ्यान्पिढ्यांची साधना आणि लाल मातीशी असलेले घट्ट नात्याचे यथार्थ दर्शन होते. स्थानिक दंगलींपासून ते ‘महाराष्ट्र केसरी’च्या आखाड्यांपर्यंत, ‘कुंबारी’ तरुणांनी छाप सोडली आहे.
 
उत्तर भारतातील ‘प्रजापती’ची धडक
 
महाराष्ट्राबाहेर, विशेषतः हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात, कुंभार समाज प्रामुख्याने ‘प्रजापती’ किंवा ‘वर्मा’ नावाने ओळखला जातो. हरियाणाचे भिवानी, रोहतक, झज्जर आणि उत्तर प्रदेशातील बागपत-मुझफ्फरनगर हे भाग, भारतीय कुस्तीचे मुख्य केंद्रच. येथे ‘दंगल’ संस्कृतीत ‘प्रजापती’ समाजातील मल्लांचा मोठाच सहभाग आहे.
 
प्रियांशी प्रजापती (कुस्ती) : उत्तर भारताच्या कुस्ती वर्तुळात, प्रियांशी प्रजापती हे नाव आज अत्यंत आदराने घेतले जाते. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील आखाड्यांमधून घडलेल्या प्रियांशीने, ‘ज्युनिअर एशियन कुस्ती चॅम्पियनशिप’ आणि अल्बानिया व बल्गेरिया येथे झालेल्या ‘ज्युनिअर वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिप’मध्ये भारतासाठी पदकांची कमाई केली.
 

स्थानिक दंगलींमधील पहिलवान : हरियाणा आणि पंजाबच्या खेड्यापाड्यांत भरणार्‍या पारंपरिक दंगलींमध्ये, ‘प्रजापती’ समाजातील पहिलवान आजही प्रतिस्पर्ध्यांना ‘अस्मान’ दाखवतात. उत्तर भारतात कुस्ती हा केवळ एका विशिष्ट घटकाचा खेळ नसून, सर्व श्रमजीवी समाजाचा श्वासच आहे. ‘प्रजापती’ समाजाने हाच श्वास समर्थपणे जपला आहे.
 
आंतरराष्ट्रीय पटलावरील ठसा : कुस्तीबरोबरच, ‘अ‍ॅथलेटिक्स’सारख्या कठीण क्रीडाप्रकारातही या समाजाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय विक्रम नोंदवले आहेत.
 
मुनिता प्रजापती (रेस वॉकिंग) : ‘अ‍ॅथलेटिक्स’मधील ‘रेस वॉकिंग’ या क्रीडाप्रकारात मुनिता प्रजापतीने राष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदके जिंकून, विक्रम प्रस्थापित केले आहेत. मध्य प्रदेश आणि पंजाबमधील उच्च दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रांमधून घडलेल्या मुनिताच्या कुटुंबाची पार्श्वभूमी मातीशी आणि कष्टकरी संस्कृतीशीच जोडलेली आहे. मुनिताने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय-स्तरावर उज्ज्वल केले.
 
दोन संस्कृतींमधील क्रीडाबंध : महाराष्ट्रातील कुंभार पहिलवान आणि उत्तर भारतातील प्रजापती क्रीडापटू यांच्यात एक सूक्ष्म फरक आणि सुंदर साम्य आढळते. महाराष्ट्रात पहिलवानाचे मूळ आडनाव आखाड्यात थेट पुकारले जाते, तर उत्तर भारतात खेळाडू सहसा प्रजापती/वर्मा या नावासोबतच गावाचे नाव लावून ओळखले जातात.
 
पारंपरिक माती ते ‘मॉडर्न मॅट’ : महाराष्ट्रातील मल्ल हे बहुतांशी पारंपरिक लाल मातीच्या तालमींमधूनच पुढे आले आहेत, तर हरियाणा-पंजाबमधील प्रजापती समाजाची नवी पिढी ‘साई क्रीडा केंद्रे’ आणि ‘मॅट’ कुस्तीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरराष्ट्रीय-स्तरावर झेप घेत आहे.
 
आडनावांची विविधता आणि क्रीडा वारसा : केवळ आडनावावरून एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची निश्चित जात सांगणे कठीण असते हे जरी मान्य केले; तरी लोकसाहित्यात आणि सामाजिक परंपरेत मातीशी जोडलेली काही महान नावे व त्यांचे कर्तृत्व या समाजाला निश्चितच प्रेरणा देणारे ठरते.
 
खाशाबा जाधव - कुंभारांचे प्रेरणास्थान : स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ‘ऑलिम्पिक’ पदक जिंकून देणार्‍या स्वर्गवासी खाशाबा जाधव, हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुयातील गोवे गावचे. त्यांनी १९५२च्या ‘हेलसिंकी ऑलिम्पिक’मध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. शेती आणि कुस्तीची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या खाशाबांनी, खर्‍या अर्थाने लाल मातीचा सुगंध सातासमुद्रापार पोहोचवला. महाराष्ट्रामध्ये ‘जाधव’ हे आडनाव मराठा समाजासोबतच, कुंभार आणि इतर अनेक समाजांमध्ये आढळते. ‘कुस्ती’ हा खेळ लाल मातीशी जोडला असल्याने आणि कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय ‘मृत्तिका कला’ असल्याने आदराने या दोन्ही गोष्टींचा प्रतीकात्मक संबंध जोडला जातो. खाशाबा जाधव हे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे भूषण आहेत. विविध सामाजिक संघटना, आपल्या समाजातील तरुणांना व पहिलवानांना प्रेरणा देण्यासाठी खाशाबा जाधवांचेच स्मरण करतात.
 
राहुल आवारे (आधुनिक कुस्तीतील तारा) : खाशाबांच्या या परंपरेला आधुनिक काळात तितयाच ताकदीने पुढे नेण्याचे कार्य, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याने केले आहे. २०१८च्या ‘गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा’ स्पर्धेत सुवर्णपदक आणि २०१९च्या जागतिक ‘कुस्ती अजिंयपद’ स्पर्धेत कांस्यपदक पटकावून, राहुलने जागतिक मंचावर ‘तिरंगा’ डौलाने फडकवला. ‘शिवछत्रपती’ आणि ‘अर्जुन’ पुरस्काराने सन्मानित झालेला राहुल आवारे हादेखील या मातीतूनच घडलेला क्रीडापटू.

प्रवीण कुंभार (क्रिकेटमधील फिरकी) : क्रिकेटच्या खेळपट्टीवर फिरकीची जादू दाखवणारे प्रवीण कुंभार हे नाव, महाराष्ट्राच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आदराने घेतले जाते. महाराष्ट्र राज्य आणि रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करताना, या फिरकी गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीची जादू अनेकदा दाखवली. क्रीडा वर्तुळात आणि खेळाडूंच्या संदर्भात ही पार्श्वभूमी आदराने चर्चिली जाते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा क्रिकेटच्या अधिकृत आकडेवारीमध्ये खेळाडूंची कामगिरी आणि जन्मठिकाण नोंदवले जाते, जात नोंदवली जात नाही; परंतु सामाजिक गौरवासाठी अशा कर्तृत्ववान खेळाडूंचा संदर्भ आवर्जून दिला जातो.
 
याशिवाय, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात ‘कबड्डी’सारख्या रांगड्या खेळातही, कुंभार समाजातील अनेक खेळाडूंनी मैदान गाजवले आहे.
 
जल, जंगल आणि जमीन : भगवान बिरसा मुंडा आणि वनवासी क्रीडाविश्व
 
वनवासी-संस्कृती आणि क्रीडा क्षेत्राचे योगदान पाहता, भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा सांगणार्‍या वनवासी समाजाने नेहमीच खेळाला जीवनशैली मानले. धनुर्विद्या, धावणे, कुस्ती, खो-खो, कबड्डी आणि चालण्याच्या नैसर्गिक क्षमतेमुळे झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा आणि महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यांमधून, अनेक प्रतिभावान खेळाडू आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘तिरंगा’ उंचावत आहेत. मातीशी थेट नाळ जोडलेली ही दोन्ही अंगे (संत गोरा कुंभारांचा समाज आणि बिरसा मुंडांचा वनवासी समाज) भारतीय क्रीडासंस्कृतीचा खर्‍या अर्थाने कणा आहेत.
 
जाता जाता...
 
चाकावर फिरणार्‍या मातीला जसा कुंभार आतून हाताचा आधार देऊन सुंदर आकार देतो, तसेच या क्रीडापटूंनी आपल्या अथक परिश्रमातून स्वतःच्या आयुष्याला आणि देशाच्या क्रीडा इतिहासाला एक सुंदर आकार दिला आहे.
 
देवदिवाळीचा प्रकाश, किल्ल्यांवरची माती आणि दि. १५ नोव्हेंबरच्या ‘जनजातीय गौरवदिनी’ भगवान बिरसा मुंडा यांना स्मरून हा लेख, मातीशी इमान राखणार्‍या सर्व ‘मातीच्या कारागिरांना’ आणि आदिवासी क्रीडावीरांना समर्पित करत, या सर्वांना क्रीडाविश्वाचा मानाचा मुजरा!
 
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)




संबंधित मजकूर