मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर वन्यजीव अभयारण्याला लाभलेला जंगल आणि जलाशयाचा समृद्ध अधिवास वन्यजीव व पक्षी संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे (wildlife sanctuary yavatmal). या अधिवासाचे अधिक प्रभावी संवर्धन करण्यासाठी एकसंध व्यवस्थापन यंत्रणा आणि स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज भारतीय वन्यजीव संस्थानच्या (डब्लूआयआय) अहवालातून अधोरेखित झाली आहे (wildlife sanctuary yavatmal). या अभयारण्याच्या व्यवस्थापनात अधिक समन्वय आणण्याची शिफारस डब्लूआयआयने केली आहे. (wildlife sanctuary yavatmal)
भारतीय वन्यजीव संस्थेने देशातील ४३८ राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांचे २०२०-२५ या कालावधीसाठी व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन (Management Effectiveness Evaluation) केले आहे. या अहवालात महाराष्ट्रातील इसापूर वन्यजीव अभयारण्याच्या व्यवस्थापनासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. इसापूर अभयारण्याची निर्मिती १९९५ मध्ये पुसद आणि हिंगोली वनविभागांतील क्षेत्र एकत्र करून करण्यात आली. त्यामध्ये सिंचन विभागाच्या ६३७.३४ हेक्टर जमिनीचाही समावेश करण्यात आला. अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ ३ हजार ७८९.६९ हेक्टर आहे. दोन वेगवेगळ्या वनविभागांतील क्षेत्रांचा समावेश असल्याने या अभयारण्याच्या व्यवस्थापनासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखणे महत्त्वाचे ठरते.
या अभयारण्याच्या व्यवस्थापनात एकसंध प्रशासकीय यंत्रणा उभारण्याची आवश्यकता डब्लूआयआयने अधोरेखित केली आहे. अभयारण्याच्या निर्मितीमध्ये दोन वनविभागांतील क्षेत्रांचा समावेश असल्याने त्याच्या संवर्धनासाठी एकाच यंत्रणेकडे स्पष्ट जबाबदारी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सिंचन विभागाच्या जमिनीचाही अभयारण्यात समावेश असल्याने वन आणि जलसंपदा विभागांमध्ये समन्वय राखण्याची संधी आहे. अशा एकात्मिक व्यवस्थापनातून वनक्षेत्राबरोबरच जलाशयाशी संबंधित जैवविविधतेचेही अधिक प्रभावीपणे संवर्धन करता येऊ शकते. इसापूर अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जंगल आणि इसापूर जलाशयाचा एकत्रित अधिवास. पैनगंगा नदीच्या परिसरातील या क्षेत्राला वन्यजीवांसह जलचर आणि पाणपक्ष्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्व आहे. त्यामुळे या अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा राबवताना जंगल आणि जलाशय या दोन्ही परिसंस्थांचा एकत्रित विचार होणे गरजेचे आहे. जलाशयातील मासेमारी, पक्ष्यांचा अधिवास, जलचरांचे संरक्षण आणि मानवी हस्तक्षेपाचे नियोजन या बाबींसाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि जनजागृतीच्या माध्यमातूनही या अधिवासाच्या संवर्धनाला चालना देता येऊ शकते.
संवर्धनाअभावी अभयारण्याची दुरवस्था
इसापूर वन्यजीव अभयारण्यात अभयारण्यात वन्यजीव आणि पक्ष्यांचे दर्शन तुलनेने कमी होत असून, पक्षी संरक्षणासाठी आवश्यक व्यवस्थापन आणि जनजागृती वाढवण्याची गरज आहे. जलाशयात नियमित होणाऱ्या मासेमारीदरम्यान वापरली जाणारी खराब झालेली जाळी पक्ष्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. अशा जाळ्यांमध्ये अडकून शेकडो पक्षी मृत झाल्याचे आम्ही पाहिले आहे. याशिवाय वृक्षतोड, अतिक्रमण, गुरे चराई आणि शिकारीसारख्या प्रकारांवरही प्रभावी नियंत्रण असणे आवश्यक आहे. अभयारण्यात प्रशिक्षित कर्मचारीवर्ग उपलब्ध करून दिल्यास वन्यजीव संरक्षणाबरोबरच स्थानिक पातळीवर जनजागृतीचे कामही अधिक प्रभावीपणे करता येईल. - डाॅ. जयंत वडतकर, पक्षीतज्ज्ञ, अध्यक्ष-महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना
संरक्षण व्यवस्थेला बळ देण्याची संधी
अभयारण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याची आवश्यकता डब्लूआयआयने नोंदवली आहे. तसेच गस्तीच्या चौक्या आणि संरक्षणात्मक पायाभूत सुविधा विकसित करण्याची शिफारस केली आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यास वन्यजीवांचे नियमित निरीक्षण, अवैध शिकारीवर नियंत्रण, अधिवासाचे संरक्षण आणि वन्यजीवांशी संबंधित घटनांना तातडीने प्रतिसाद देणे शक्य होईल. स्वतंत्र आणि प्रशिक्षित कर्मचारीवर्गामुळे अभयारण्याच्या व्यवस्थापनाला अधिक व्यावसायिक स्वरूप देता येईल.
प्रभावी अंमलबजावणीची गरज
इसापूर अभयारण्यासाठी २०१९-२० ते २०२८-२९ या कालावधीचा मंजूर व्यवस्थापन आराखडा अस्तित्वात आहे. त्यामुळे या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, निधी आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. डब्लूआयआयने सुचविलेल्या एकसंध व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून या आराखड्याचे पुनरावलोकन करून जंगल, जलाशय आणि पक्ष्यांच्या अधिवासाच्या संवर्धनाला प्राधान्य देता येऊ शकते. इसापूर अभयारण्याच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांचा विचार करता, सक्षम व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे क्षेत्र पक्षी आणि वन्यजीव संवर्धनाचे अधिक प्रभावी केंद्र म्हणून विकसित करण्याची संधी आहे.