पुण्यातील निगडीसारख्या गजबजलेल्या शहरी परिसरात घरामागील एका छोट्याशा मोकळ्या जागेत आठ वर्षांच्या अर्पितला दुर्मीळ भारतीय निळा दयाळ या स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन झाले. पक्षीनिरीक्षणाची आवड असलेल्या अर्पितसाठी हा केवळ अनपेक्षित पाहुणा नव्हता, तर शहरांमधील छोट्या हिरव्या जागांचे वन्यजीवांच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित करणारा अविस्मरणीय अनुभव होता.
नमस्कार मित्रांनो!
माझे नाव अर्पित. मी पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेत इयत्ता तिसरीत शिकतो. मला पक्षीनिरीक्षण आणि निसर्गाचा अभ्यास करण्याची खूप आवड आहे. गेल्या दोन वर्षांत वडिलांसोबत अनेक ठिकाणी फिरताना मी ‘ई-बर्ड’ या संकेतस्थळावर तब्बल ४१८ पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत.
मी पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात राहतो. आमचे बैठे घर असून, घराच्या मागच्या बाजूला एक छोटीशी मोकळी जागा आहे. तिथे आजीने लावलेले चाफ्याचे झाड आणि नैसर्गिकरीत्या वाढलेली काही झुडपे आहेत. या जागेत लोकांनी बराच कचरा टाकलेला असला, तरी पक्ष्यांसाठी ती एक छोटीशी आश्रयाची जागा ठरली आहे. माझ्या घराच्या खिडकीतून आतापर्यंत मला २० ते २८ प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले आहेत.
दुपारच्या वेळी घरातील सगळेजण झोपतात. मात्र, मला काही झोप येत नाही. अशा वेळी खिडकीतून बाहेर डोकावत पक्ष्यांचे निरीक्षण करणे आणि त्यांच्या गमतीजमती पाहणे, हा माझा आवडता छंद आहे. दि. १४ ऑक्टोबरचा दिवसही असाच होता. त्या दिवशी घरी मी आणि बाबा दोघेच होतो. आई, आजी, आजोबा आणि माझा लहान भाऊ इंदोरला गेले होते. दुपारचे साधारण ४.३० वाजले होते. नेहमीप्रमाणे मला झोप येत नव्हती. सहज खिडकीतून बाहेर पाहिले आणि झुडपांमध्ये एक वेगळाच पक्षी दिसला. त्याचे पोट तांबूस रंगाचे, शरीर निळसर आणि डोळ्यांवर ठळक पांढरी भुवई होती.
तो होता 'Indian Blue Robin'! अर्थात, भारतीय निळा दयाळ हा पक्षी अतिशय लाजाळू असल्यामुळे त्याचे छायाचित्र टिपण्याची संधी मला सोडायची नव्हती. पण अडचण अशी होती की, बाबा गाढ झोपले होते! मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, झोपेतच ते म्हणाले, "अरे, तो टिकेलचा निळा माशीमार (Tickell's Blue Flycatcher) असेल.'Blue Robin' आपल्या भागात कुठे मिळतो?” बाबांनी मला मर्लिन पवरही पक्ष्याची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला दिसलेला पक्षी वेगळाच असल्याची खात्री होती. त्यामुळे मी त्यांना पुन्हापुन्हा उठवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्यांना उठवलेच! आम्ही दोघे कॅमेरा घेऊन घराच्या मागच्या बाजूला गेलो. तोपर्यंत बराच वेळ झाला होता आणि प्रकाशही कमी झाला होता. तरीही, आम्हाला तो पक्षी पुन्हा दिसला. आम्ही त्याची काही छायाचित्रे टिपली आणि ती ‘पुणे बर्डिंग कम्युनिटी’ या पक्षिमित्रांच्या समूहावर पाठवली. छायाचित्रे पाहिल्यानंतर बाबांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तो खरोखरच भारतीय निळा दयाळ होता. वेळेत न उठल्यामुळे या अनपेक्षित पाहुण्याचे चांगले फोटो काढता आले नाहीत, याची त्यांना हळहळ वाटत होती.
भारतीय निळा दयाळ हा जंगलाच्या जमिनीवर पालापाचोळ्यात खाद्य शोधणारा, अतिशय लाजाळू पक्षी आहे. हिमालयातील उंच जंगलांमध्ये त्याचे प्रजनन होते. हिवाळ्यात तो प्रामुख्याने पश्चिम घाट आणि दक्षिण भारतातील जंगलांकडे स्थलांतर करतो. या प्रवासादरम्यान काही पक्षी पुण्यासारख्या भागांतही काहीकाळ विसावा घेतात. स्थलांतराच्या मार्गावर काहीकाळासाठी थांबणार्या अशा पक्ष्यांना " Passage Migrants' म्हणजे, ‘प्रवासी थांबा घेणारे पक्षी’ असे म्हणतात. पुणे परिसरात ताम्हिणी घाटातून या पक्ष्याच्या तुरळक नोंदी आहेत. मात्र, शहरातील दाट वस्तीच्या परिसरात, जवळपास मोठे जंगल नसताना, आमच्या घरामागील छोट्याशा मोकळ्या जागेत त्याचे दर्शन होणे, ही आमच्यासाठी खूपच खास घटना होती.
दुसर्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो. आदल्या दिवशी पुरेशा प्रकाशाअभावी चांगली छायाचित्रे टिपता आली नव्हती. त्यामुळे आज ही संधी दवडायची नव्हती. हा अनपेक्षित पाहुणा पाहण्यासाठी आमचे काही पक्षिमित्रही घरी आले होते. यावेळी मात्र त्याने आम्हाला अगदी छान छायाचित्रे काढण्याची संधी दिली. विशेष म्हणजे, याच वेळी आम्हाला मुंगूस आई आणि तिचे पिलू यांची जोडीही पहिल्यांदाच पाहायला मिळाली. सकाळी ८ वाजता मला नाईलाजाने शाळेत जावे लागले. कारण, त्या दिवशी माझी परीक्षाही होती. मात्र, ११ वाजता घरी परतल्यावर शाळेची बॅग ठेवून मी पुन्हा खिडकीत जाऊन बसलो. दुपारी तो रॉबिन पुन्हा दिसला. संध्याकाळपर्यंत अनेक पक्षिमित्र त्याला पाहण्यासाठी आणि त्याची छायाचित्रे टिपण्यासाठी घरी आले.
आमच्यापैकी अनेकांसाठी हा पक्षी ‘लाइफर’ ठरला होता. म्हणजेच, आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेला पक्षी! एका पक्षिमित्राने तर सांगितले की, मागच्याच आठवड्यात या पक्ष्याला पाहण्यासाठी ते तीन हजार रुपये खर्च करून ताम्हिणी घाटातील एका खास "Hide' मध्ये गेले होते. मात्र, तिथेही त्यांना हा पक्षी दिसला नव्हता. आणि इथे तर तो आमच्या घराच्या खिडकीतूनच दर्शन देत होता. त्याचा आवाजही मी ‘रेकॉर्ड’ करून ठेवला आहे. तिसर्या दिवशीही काही पक्षिमित्र त्याला पाहण्यासाठी आले. मात्र, त्या दिवशी तो कुठेच दिसला नाही. कदाचित, आपला पुढचा स्थलांतराचा प्रवास सुरू करण्यासाठी तो निघून गेला असावा. या तीन दिवसांच्या अनुभवाने मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली. आपल्या शहरांमध्ये असलेल्या छोट्या-छोट्या मोकळ्या जागा, झाडे आणि झुडपांचे महत्त्व खूप मोठे आहे. मोठे जंगल नसले, तरी अशा जागा अनेक पक्षी, प्राणी आणि कीटकांना अन्न, निवारा आणि विसाव्याची संधी देत असतात. आपल्या नकळत या छोट्या जागा वन्यजीवांसाठी महत्त्वाचे अधिवास ठरत असतात. म्हणूनच, शहरांमधील झाडे, झुडपे आणि मोकळ्या जागा जपणे गरजेचे आहे. कारण, निसर्गातील एखादा अनपेक्षित पाहुणा कधी आपल्या घराच्या खिडकीतून डोकावेल, हे सांगता येत नाही.
कधीकधी निसर्ग आपल्याला शोधावा लागत नाही; तोच एखाद्या अनपेक्षित पाहुण्याच्या रूपाने आपल्या घरी येतो.
अर्पित चौधरी
(हा लेख अर्पितने आपले वडील अक्षय चौधरी यांच्या मदतीने लिहिला आहे.)
८७९३४०१०१२