ऊर्जा आत्मनिर्भरतेतूनच सशक्त भारताची निर्मिती; एनटीपीसीचे संचालक गुरदीप सिंह यांचे प्रतिपादन!

    16-Nov-2026   
India Energy Self Reliance Vision
 
मुंबई (India Energy Self Reliance Vision) : भारताने ऊर्जा आयात करणारा देश ही ओळख मागे सोडून ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. भविष्यात भारताने ऊर्जेची निर्यात करणारा देश बनण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन एनटीपीसीचे संचालक गुरदीप सिंह यांनी केले. स्वदेशी शोध संस्थानच्या वतीने आयोजित श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी स्मृती राष्ट्रीय चर्चासत्र २.० च्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
 
ऊर्जा सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी आणि सामरिक स्वायत्तता या बाबींचा विश्वासार्ह, परवडणाऱ्या आणि स्वच्छ ऊर्जेशी जवळचा संबंध आहे. विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरता अत्यंत आवश्यक आहे. (India Energy Self Reliance Vision)
 
भारताच्या ऊर्जा क्षेत्राचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, देशाची वीज निर्मिती क्षमता २०१५-१६ मध्ये ३०६ गिगावॅट होती. सप्टेंबर २०२६ पर्यंत ती वाढून ५५९ गिगावॅट झाली आहे. याच काळात सौरऊर्जा निर्मिती क्षमतेतही मोठी वाढ झाली असून, ती ६.७६ गिगावॅटवरून १७१.०५ गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे.
 
ऊर्जेसाठी भारताचे आयातीवरील अवलंबित्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, २०२५-२६ या आर्थिक वर्षात देशाचे ऊर्जा आयातीवरील खर्चाचे बिल सुमारे २१२ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचले. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन क्षमता मजबूत करणे, ऊर्जेच्या विविध स्रोतांचा विकास करणे आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारावरील अवलंबित्व घटविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. (India Energy Self Reliance Vision)
 
भारताची वाढती सौर उपकरण निर्मिती क्षमता, पीएम सूर्य घर योजना तसेच आधुनिक वीज वितरण जाळी आणि बॅटरी साठवणूक प्रणाली विकसित करण्याचे महत्त्वही त्यांनी विशद केले. भविष्यातील ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी कोळसा, सौरऊर्जा, पवनऊर्जा, जैवऊर्जा आणि अणुऊर्जा यांचा समतोल वापर असलेली ऊर्जा व्यवस्था विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. (India Energy Self Reliance Vision)
 
दोन दिवसीय या राष्ट्रीय चर्चासत्रात शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संशोधक सहभागी झाले होते. ऊर्जा सुरक्षा, अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, जैवऊर्जा, स्वदेशी उत्पादन, कृषी शाश्वतता आणि धोरणात्मक उपाययोजना अशा विविध विषयांवर यावेळी विचारमंथन करण्यात आले.
 
ऊर्जा संवर्धन, तांत्रिक नवकल्पना, स्वदेशी उत्पादन आणि जनसहभाग या बाबी भारताच्या आर्थिक व सामरिक आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनल्या पाहिजेत, असा निष्कर्ष या चर्चासत्रातील विचारमंथनातून पुढे आला. ‘सशक्त भारत घडवायचा असेल, तर तो ऊर्जा आत्मनिर्भर भारतही असला पाहिजे’, हा ठाम राष्ट्रीय संदेश देत या चर्चासत्राची सांगता झाली. (India Energy Self Reliance Vision)




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर