पाकिस्तानी लष्कराचा माजी कॅप्टनच बनला बलुच बंडखोरांचा सेनाप्रमुख; रहमान गुलकडे बीएलएची कमान!

    16-Nov-2026   
Former Pakistani Captain Leads BLA
 
मुंबई (Former Pakistani Captain Leads BLA) : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सक्रिय असलेल्या बंडखोर संघटना बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) आपल्या नव्या सेनाप्रमुखाची नियुक्ती केली आहे. रहमान गुल याची या पदावर निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, रहमान गुल हा पाकिस्तानी लष्कराचा माजी कॅप्टन आहे. त्यामुळे ज्या पाकिस्तानी लष्करात त्याने सेवा बजावली, त्याच लष्कराविरोधात आता तो बीएलएचे नेतृत्व करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या नियुक्तीमुळे बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा यांसारख्या प्रांतांमधील बंडखोरीला आणखी बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दोन्ही प्रांतांमध्ये पाकिस्तान सरकार आधीच संघर्षाचा सामना करत आहे.
 
रहमान गुल उर्फ उस्ताद मुरी याने पाकिस्तानी लष्करात कॅप्टन म्हणून काम करताना वझिरीस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेविरोधातील लष्करी कारवायांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, नंतर त्याने लष्कराची नोकरी सोडून बीएलएमध्ये प्रवेश केला. लष्कर सोडल्यानंतरच्या १६ वर्षांच्या काळात विविध जबाबदाऱ्या सांभाळत तो संघटनेच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. बीएलएचा सेनाप्रमुख होण्यापूर्वी त्याने संघटनेच्या आत्मघातकी हल्ल्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या 'मजीद ब्रिगेड'चे नेतृत्वही केले आहे. (Former Pakistani Captain Leads BLA)
 
अशी माहिती आहे की, रहमान गुल २००२ मध्ये पाकिस्तानी लष्करात भरती झाला होता. त्याने 'फ्रंटियर फोर्स रेजिमेंट'मध्ये सुमारे आठ वर्षे सेवा बजावली. तो पाकिस्तान मिलिटरी अकादमीच्या १०९व्या लॉन्ग कोर्सचा विद्यार्थी होता. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख असीम मुनीर यांनीही याच रेजिमेंटच्या दुसऱ्या बटालियनमध्ये काम केले आहे.
 
पाकिस्तानी लष्करात कार्यरत असताना रहमान गुलने वझिरीस्तानमध्ये टीटीपीविरोधातील लष्करी मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. २०१० मध्ये लष्कर सोडण्यापूर्वी त्याची शेवटची नियुक्ती पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील कोटली येथे नियंत्रण रेषेवर (एलओसी) होती. लष्करातून बाहेर पडल्यानंतर त्याच वर्षी त्याने बीएलएमध्ये प्रवेश केला. (Former Pakistani Captain Leads BLA)





ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर