आज शिक्षणातून माणूस घडतो आहे की बाजारपेठेला आवश्यक पैसा कमावणारा ग्राहक, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. प्रवेश परीक्षांतील गैरप्रकार, गुणांच्या मागे धावणारे पालक आणि यशाची पैशाशी जोडली गेलेली व्याख्या या सगळ्यांचा परस्परसंबंध आहे. शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपातून समाजाच्या बदलत्या चेहर्याचा मागोवा घेणारा हा लेख...
देशातील विविध प्रवेश परीक्षा आणि पात्रता परीक्षांमधील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी, नंदन निलेकणी यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. गेली काही वर्षे आपण माहिती तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर गुंतलो आहोत. त्याचा जितका लाभ होतो आहे, तितकाच गैरवापरही होत आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तीच्या सूचना निश्चितच या प्रकाराला आळा घालू शकतील, यात शंका नाही. शेवटी देशातील विविध परीक्षांमधील पेपर फुटणे, ही देशासाठी नामुष्कीचीच बाब. तसेच, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्यासारखेच आहे. परीक्षांमधील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी नेमलेल्या ‘टास्क फोर्स’च्या सूचना, निश्चितपणे याला आळा घालतील. त्यामुळे त्यांचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. मात्र, अशाप्रकारे परीक्षांमधील वाढते गैरप्रकार घडण्याच्या गोष्टी शिक्षणाचाच पराभव आहे.
नंदन निलेकणी यांच्या शिफारशीमध्ये प्रश्नपेढी विकसित करणे, परीक्षेच्या वेळी तंत्रज्ञानाच्या मदतीने, प्रश्नपेढीतून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका विकसित केली जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका ऐनवेळी तयार होऊन, विद्यार्थ्यांना ती उपलब्ध करुन दिली जाईल. त्यामुळे ती फुटणार नाही. प्रत्येक प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी समानच असेल. यातून विश्वासार्हता वाढेल. परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिकाही ‘डिजिटल’ स्वरूपात उपलब्ध होतील. त्यामुळे वाहतुकीत गैरप्रकार घडणार नाही. अर्थात, त्यांनी सूचवलेले अनेक पर्याय निश्चित महत्त्वाचे आहेतच. यातून काही प्रमाणात आळा बसेल. मात्र, त्यामुळे गैरप्रकार घडणारच नाहीत, असे सांगणे कठीण. हे सर्व माणूसच करणार असाल्याने, अंमलबजावणी हे एक मोठेच आव्हान ठरणार आहे.
आपल्या भोवती घडणार्या विविध घटना, माणसांच्या लोभी आणि स्वार्थी प्रवृत्तीतूनच जन्माला येतात. माणसाच्या जडणघडणीसाठी शिक्षणातून योग्य पावले पडली असती, तर देशाचे कितीतरी प्रश्न सुटले असते. मात्र, आज शिक्षणासारखे पवित्र क्षेत्रच भ्रष्टाचाराने बरबटलेले असेल; तर त्यातून समृद्ध, नीतिमान, सुसंस्कृत विद्यार्थी कसा घडणार? त्यामुळे समाजातील भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल, तर केवळ कडक कायदे आणि शिक्षा अधिक कडक करण्याने फारतर माणसांना धाक बसेल. ती वाट परिवर्तनाची ठरणार नाही. शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे. त्यामुळे शिक्षणातून होणारे परिवर्तन शाश्वत असते. त्यामुळेच कायद्याच्या धाकापेक्षा माणसांची मने अधिक स्वच्छ करण्यासाठी, प्रयत्न करण्याची गरज आहे. शिक्षण त्याचीच वाट आहे. ती वाटच अस्वच्छ असेल, तर अशा शिक्षणातून समाजाला मिळणारी फळेही अस्वच्छ असतील. आपण समाजात वाईट घडणार्या घटनांसाठी, कोणाला तरी जबाबदार धरून केवळ फांद्या छाटून फारसा उपयोग होणार नाही. त्यासाठी झाड निरोगी होण्यासाठी पावले पडायला हवीत.
मुळात कोणताही माणूस वाईट नसतो. मात्र, तरीसुद्धा समाजात वाईट वागण्याची वृत्ती का वाढते? माणसांचा वाईट वागण्याकडे झुकणारा आलेख योग्य वेळी सावरता येण्याची नितांत गरज आहे. चांगले काय, वाईट काय, याचा विवेक त्यांच्या मनात रुजावा; यासाठी शिक्षणातून प्रयत्न होण्याची नितांत गरज आहे. शिक्षण म्हणजे, केवळ अक्षरांची साक्षरता नाही, तर माणूसपण विकसित करताना त्याच्या मनात मूल्य रुजवणे म्हणजे शिक्षण. शिक्षणातून काय शिकवायचे, हे ठरवण्यासाठी अभ्यासक्रम विकसित केला जातो. तो विकसित करताना तत्कालीन समाज व राष्ट्रासमोरच्या समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीने, प्रयत्न होतात. अभ्यासक्रम तयार करताना गाभाभूत घटक, जीवनकौशल्य, मूल्य आणि २१व्या शतकातील कौशल्यांचा विचार अनिवार्यच. तसे आजवर प्रयत्न झाले, तरी समाज व्यवस्थेत मूल्यांचा प्रश्न निर्माण होतोच आहे. आपल्याकडे १९९६ साली मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि शिक्षणमंत्री सुधीर जोशी असताना, राज्य सरकारने स्वतंत्र मूल्यशिक्षणाच्या तासिकांचा विचार केला होता. मात्र, अशाने ती मूल्ये रुजतीलच असे नाही. शेवटी पाठ्यपुस्तकातील घटक, पाठ, कवितांचा विचार करून, त्याद्वारेच त्यांची पेरणी अपेक्षित आहे. जगणे आणि मूल्ये यांचे एक नाते आहे. त्यातून आपण मूल्ये स्वतंत्रपणे बाहेर काढू शकत नाही.
आपल्याला उद्याचा समाज नेमका कसा हवा, ते धोरणकर्ते ठरवतात. त्यामधून समाज आपल्याला हवा तसा निर्माण करण्याचे काम शिक्षण करते. आज आपल्या भोवतीचे समाजाचे असलेले चित्रात, श्रीमंतीची भूक असलेलाच समाज मोठा आहे. पैसाच ‘सर्वस्व’ झाला आहे. इतका मोठा समाज जर केवळ पैसासाठी शिक्षणाचा विचार करत असेल, तर भूतकाळातील शिक्षणातूनच याची पेरणी झालेली असावी. त्याचाच परिणाम आता समोर येत आहे. आज त्याला आळा घातला नाही, तर उद्याचे भविष्य अधिक अंधारमय असेल.
काही दशकांपूर्वी चीननेही शिक्षणातून प्रत्येक मुलाच्या हाताला काम मिळेल, असे धोरण आखले होते. त्यातून मुलांच्या हाताला काम मिळाले; पण काही नकारात्मक परिणामही समोर आले. तेव्हाच पैसा हे ‘सर्वस्व’ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेवटी माणूस म्हणून उभे राहण्यासाठी पैसा हवा असला, तरी त्याला जगण्यासाठी आनंद, सुख, समाधानही हवे असते. ते पैशाने विकत घेता येत नाही. आनंदाचा निर्देशांक हरवतो म्हटल्यावर, त्यांनी धोरणाचा पुनर्विचार करण्यास सुरुवात केली. आज आपण त्याच दिशेने प्रवास करत आहोत. समाजातील मोठा वर्ग पैशाच्या भोवती केंद्रित आहे. उन्नती, प्रगती म्हणजे केवळ पैशाने श्रीमंत होणे नाही, हा विचार रुजवण्याची नितांत गरज आहे. मुळात प्रगतीची व्याख्याच समजावून देण्याची वेळ आली आहे. प्रतिष्ठा म्हणजे नेमके काय, त्याची वर्तमानातील व्याख्याच बदलावी लागेल. कारण, पैशाची श्रीमंती म्हणजेच प्रतिष्ठा असेल, तर लोक त्यामागेच धावतील. आज शिक्षणातून त्यासाठीची स्पर्धा निर्माण झाली आहे. पैसा मिळून देणारे अभ्यासक्रम बाजारात जीवघेणी स्पर्धा निर्माण करत आहेत. अधिक पैसा असलेल्या प्रवेश परीक्षांचे पेपर फुटत आहेत. त्यासाठी लोक वाममार्गाने प्रयत्न करत आहेत. जेथे पैसा, तेथेच असे प्रकार घडतात. कारण, पैसा आहे म्हणून प्रतिष्ठा आहे; पैसा आहे म्हणून सुख-समाधान आहे, असेच लोक मानू लागले आहेत. पैसा हे माणसांचे इंद्रिय झाले असून, ते मजबूत असल्याशिवाय उरलेली पाच इंद्रिये उत्तमरीतीने चालूच शकत नाही, असेच चित्र आहे. त्यामुळे पैसा मिळवण्यासाठी माणसे हवे ते करू लागली आहेत. त्यामुळे शिक्षणातूनच चांगले पेरण्याची गरज आहे.
पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणापेक्षा मार्कांची गरज आहे. शाळांच्या जाहिराती पाहिल्या, तर सहजपणे लक्षात येते की, आम्ही मार्क मिळवून देतो. डॉटर, इंजिनिअरचा कारखाना... आम्ही मुलांचे भविष्य घडवतो...” यातील भविष्य म्हणजे फक्त ‘मार्क’.शाळांनी आपल्या मूलभूत उद्दिष्टांपासूनच दूर जाण्याचा अनुसरलेला मार्ग अधिक धोयाचा. आम्ही माणूस घडवतो, अशी जाहिरात अपवादानेही दिसत नाही. शिक्षणाचे ध्येय जर माणूस घडवणे असेल, तर आपण त्या दिशेने कधी जाणार? आपल्या पाल्याच्या मार्गाचा विचार करण्याची वेळ आली आहे. ‘जीवनात तू काहीच नाही झाला तरी चालेल; पण चांगला माणूस हो’ हे सांगणारेच पालक आता हवे आहेत. आपण त्या दिशेने न जाता, केवळ ‘पैसा एके पैसा’ म्हणून चालणार असू; तर समाज आणि राष्ट्र कधीच भ्रष्टाचारमुक्त होणार नाही. जो समाज भ्रष्टाचारात रुतलेला असतो, तेथे परिवर्तनाची अपेक्षाच धुसर असते. आपल्या शिक्षणात जे वाईट घडते आहे, त्याला शिक्षण कारणीभूत आहेच; पण त्याचबरोबर समाजातील इतर बदलांचे परिणामही त्यासोबत आहे.
अलीकडे समाजात मोठ्या प्रमाणावर विभक्त कुटुंबपद्धती रुजते आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कुटुंबसंस्था छोट्या बनत आहेत. शहरातील वाढत्या खर्चामुळे पती-पत्नी, मुले शहरात आणि आजी-आजोबा गावी, असे विभाजन झाले. आई-बाबा नोकरी करणार, मुले शाळेत जाणार. वडील जेव्हा घरी येणार, तेव्हा मुले झोपलेली असणार. वडील नोकरीला जाणार, तेव्हा मुले उठलेली असणार. त्यामुळे घरात संवादाचाच अभाव आहे. मुलांच्या मनातील भावनांसाठी फक्त दूरदर्शनसंच घरात असतो. या एका खोयानेच मुलांचा घात केला आहे. मुलांवर ज्याकाळात संस्कार व्हायला हवेत, तेव्हा त्यांच्यासोबत कोणीच नाही. त्यांच्या मानसिक, भावनिक जडणघडणीसाठी घरात कोणी नाही. चांगले काय, वाईट काय, हे सांगणारीच व्यवस्था अस्तित्वात नाही. कधीकाळी आजी-आजोबा नावाचे विद्यापीठ प्रत्येक घरात असे. त्या विद्यापीठातूनच राम-कृष्णाच्या गोष्टी कानावर जात. विविध संतांचे अभंग, ओव्या कानी पडत. कीर्तन, प्रवचन आणि व्याख्याने कानी पडत. आता सारेच हरवले आहे. आजी-आजोबांच्या गोष्टीतूनच, संस्कारांची पेरणी व्हायची. आज ही विद्यापीठेच हरवली आहेत. त्यामुळेच समाजात प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे आपण तंत्रज्ञानाचा उपयोगाने मात करण्याचा प्रयत्न केला; तरी तंत्रज्ञानाचा उपयोग करणारा माणूसच आहे. आपण जोवर माणसांमध्ये मूल्यांची पेरणी करत नाही, तोवर भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणे कठीणच!
- संदीप वाकचौरे