मुंबई (NIA Arrests Drug Trafficking Kingpin) : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा सूत्रधार नूरुल इस्लाम याला अटक केली. आसाममधील सिलचर येथून त्याला अटक करण्यात आली. नूरुल इस्लाम म्यानमारमधून अमली पदार्थांची तस्करी करून देशातील विविध राज्यांमध्ये त्यांचा पुरवठा करत असल्याचा आरोप आहे. सीमापारून अमली पदार्थ भारतात आणल्यानंतर विविध राज्यांमध्ये त्यांचे वितरण करण्यासाठी त्याने मोठे तस्करीचे जाळे उभारले होते.
एनआयएच्या माहितीनुसार, मे २०२५ मध्ये मिझोरामच्या चम्फाई जिल्ह्यात सुमारे ३०.७२ कोटी रुपये किमतीच्या २३६.३३ किलो मेथॅम्फेटामाइन या अमली पदार्थाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाच्या तपासादरम्यान नूरुल इस्लामला अटक करण्यात आली. अटकेच्या वेळी त्याच्याकडून मोबाइल फोन, मेमरी कार्डसह अनेक डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तपासात नूरुल इस्लाम हाच या तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. म्यानमारमधून भारताच्या मुख्य भूभागात अमली पदार्थ आणण्यासाठी आणि त्यांचा विविध राज्यांमध्ये पुरवठा करण्यासाठी त्याने आंतरराज्यीय तस्करीचे जाळे उभारले होते. (NIA Arrests Drug Trafficking Kingpin)
या प्रकरणाचा तपास मूळतः मिझोराममधील डुंगटलंग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर अंतर्गत सुरू झाला होता. त्यानंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. याप्रकरणी मिझोराममधील दोन, त्रिपुरातील दोन आणि आसाममधील एका अशा एकूण पाच आरोपींविरोधात यापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या तस्करीच्या कटात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींची ओळख पटविणे आणि संपूर्ण तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करणे या उद्देशाने एनआयएकडून पुढील तपास सुरू आहे. (NIA Arrests Drug Trafficking Kingpin)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक