मुंबई (Mohan Bhagwat Advocates Addiction Free Living) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जोधपूर प्रांतात आयोजित चार दिवसीय ‘मरु निनाद २०२६’ घोषशिबिराच्या समारोपप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नशामुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने प्रसन्न राहू शकते. संस्कारवान व्यक्तीच देशासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करू शकते. दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारी व्यक्ती समाजाला जोडण्याचे काम करते, असे प्रतिपादन त्यांनी केले. संगीताचे महत्त्व केवळ संगीताच्या मैफलीपुरते मर्यादित नसून रणांगणावरही संगीताची महत्त्वपूर्ण भूमिका असते. आपले स्वतःचे रणसंगीतही असले पाहिजे, कारण संगीतामुळे स्वाभिमानाची भावना जागृत होते, असेही ते म्हणाले.
जोधपूरच्या लूणी येथील शिकारपूरा परिसरातील श्री राजाराम आश्रमाच्या विशाल प्रांगणात ‘मरु निनाद २०२६’ घोषशिबिराचा समारोप सोहळा पार पडला. या सोहळ्याला १५ हजारांहून अधिक स्वयंसेवक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक याप्रसंगी म्हणाले, आतापर्यंत आपण घोषवादनाचे सादरीकरण पाहिले; मात्र या वादनामागे संस्कार आणि शिस्त दडलेली आहे. हीच शिस्त सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त करते. आपल्या देशात रणसंगीताची प्राचीन परंपरा आहे. भगवद्गीतेतही त्याचे वर्णन आढळते. पणव, पांचजन्य आणि शंख आदी वाद्यांचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. विविध एकलगीते, संगीत आणि घोषवादनाच्या माध्यमातून संघाने संगीताची स्वतंत्र परंपरा विकसित केली आहे. आता भारतीय संगीतामध्ये रणसंगीताचाही समावेश झाला आहे. (Mohan Bhagwat Advocates Addiction Free Living)
संघाचे संगीतकार हे व्यावसायिक संगीतकार नाहीत. संगीत ही एक कला असून त्यामध्ये भारतीय जीवनपद्धती, जीवनसंस्कार आणि जीवनमूल्ये सामावलेली आहेत. सुंदर गीतांमधून विशिष्ट वातावरणनिर्मिती होते आणि त्यातून भावनाही जागृत होतात, असे त्यांनी सांगितले. संघामध्ये वैयक्तिक वादनाला महत्त्व नसून सर्वजण मिळून सामूहिक वादन करतात. अशा प्रकारे एकत्रित वादन करताना सर्वांची मनेही एकमेकांशी जोडली जातात. एकाच ठिकाणी एकत्र येणे, एकत्र राहणे आणि सर्वांनी मिळून काहीतरी श्रेष्ठ कार्य करणे, हीच संघाची कार्यपद्धती आहे. संगीताचे उत्तम समीक्षक हे त्याचे तज्ज्ञ नसून श्रोते असतात, असेही डॉ. भागवत यांनी नमूद केले. (Mohan Bhagwat Advocates Addiction Free Living)
समारोप सोहळ्याची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या स्वयंसेवक घोषवादकांनी विविध रचनांचे सुरेल आणि शिस्तबद्ध सादरीकरण केले. जोधपूर प्रांताचे संघचालक हरदयाल वर्मा यांनी शिबिराचा अहवाल सादर केला तसेच मंचावरील मान्यवरांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले महेशाराम मेघवाल यांनी सर्वांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तर मेजर जनरल अर्जुन सिंह राठोड यांनी स्वयंसेवकांच्या घोषवादनाचे कौतुक केले. या घोषसंगीतामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्याचे त्यांनी सांगितले. स्वयंसेवक घोषवादकांचे सादरीकरण एखाद्या पूर्ण प्रशिक्षित सैन्यदलाच्या तुकडीच्या वादनासारखे असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. (Mohan Bhagwat Advocates Addiction Free Living)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक