कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई! लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार!

    16-Nov-2026   
 Kulgam Terrorists Encounter Operation
 
मुंबई (Kulgam Terrorists Encounter Operation) : काश्मीरमधील कुलगाम येथे सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये लष्करचा वरिष्ठ कमांडर दहशतवादी लतीफ भट याचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. बुधवारी कुलगाम येथे सीआरपीएफच्या सुरक्षा चौकीवर झालेल्या हल्ल्यात लतीफ भटचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
 
कुलगाम जिल्ह्यात सीआरपीएफच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू आहे. बुधवारी दुपारी सुमारे २ वाजून १५ मिनिटांनी दोन दहशतवाद्यांनी स्वयंचलित शस्त्रांनी सीआरपीएफच्या नाक्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. कुलगाममधील नौपोरा अखरन परिसरात ही घटना घडली. हा परिसर श्रीनगरपासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर असून, कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. (Kulgam Terrorists Encounter Operation)
 
मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या ४६व्या बटालियनचे पथक नौपोरा अखरन परिसरात नियमित कर्तव्यावर तैनात होते. याचवेळी पायी आलेल्या दोन दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी तातडीने मोर्चा सांभाळत प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात जखमी झालेल्या तिन्ही जवानांना अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Kulgam Terrorists Encounter Operation)
 
जखमी जवानांमध्ये हेड कॉन्स्टेबल सोमवीर सिंह, कॉन्स्टेबल राकेश दास आणि कॉन्स्टेबल संतोष चंद्रू यांचा समावेश आहे. संतोष चंद्रू हे पश्चिम बंगालचे रहिवासी असून, त्यांच्या पोटात आणि मणक्याजवळ गोळ्या लागल्या आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आसामचे रहिवासी असलेल्या कॉन्स्टेबल राकेश दास यांच्या पायाला गोळी लागली, तर हेड कॉन्स्टेबल सोमवीर सिंह यांच्या डाव्या हाताला गोळी लागली. सोमवीर आणि राकेश यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. संतोष चंद्रू यांना पुढील उपचारांसाठी विमानाने श्रीनगर येथील ९२ बेस रुग्णालयात हलवण्यात आले.
 
काश्मीरमध्ये फरार दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू असतानाच, दहशतवाद्यांचे पोस्टर लावल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत कुलगाममध्ये हल्ला झाला. श्रीनगरमधील लाल चौकासह प्रमुख ठिकाणी रविवारी लष्कर-ए-तोयबाचा स्थानिक दहशतवादी मोहम्मद लतीफ भट याच्यासह चार वाँटेड दहशतवाद्यांची पोस्टर लावण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी कुलगाममधील अखरन येथे सुरक्षा दलांच्या नाक्यावर झालेल्या गोळीबारात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले. (Kulgam Terrorists Encounter Operation)





ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर