सोनिया गांधी यांनी अलीकडेच त्यांचे आत्मचरित्र लिहिले. आत्मचरित्रात माणूस स्वतःशी प्रामाणिक असतो, असे म्हणतात. पण, सोनियांच्या बाबतीत हा समज बाजूलाच ठेवावा लागेल. त्यांच्या आत्मचरित्रातील तारखांच्या घोटाळ्यांची, बाबरी पडताना ओघळलेल्या अश्रूंची चर्चा सर्वदूर असतानाच, गोध्रा हत्याकांडाविषयीचा त्यांनी केलेला उल्लेख वादाचा विषय ठरत आहे. सोनियांनी त्यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात, गोध्रा हत्याकांडातील आगीचे कारण अद्यापही वादाचा विषय असल्याचे म्हटले. यावरूनच आडनाव ‘गांधी’ धारण केले, तरी त्यांच्या लेखणीला ‘सत्याची धग’ सहन झाली नसल्याचेच स्पष्ट होते. त्या हत्याकांडात ५९ कारसेवकांचे बळी गेले. यामागे कट असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. तरी सोनियांना घटनेचे कारण विवादितच वाटते. सत्य इतके अस्वस्थ करणारे का वाटावे?
अलीकडेच तत्कालीन विशेष तपास पथकाचे प्रमुख असलेले माजी ‘सीबीआय’ राकेश अस्थाना यांनी सोनियांच्या असत्याची भांडाफोड केली. गोध्रा हा कट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. "सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथक आणि नानावटी आयोगाच्या अहवालातही आग जाणूनबुजून लावण्यात आल्याचेच नमूद होते,” असेही अस्थाना म्हणाले. शिवाय, गुजरातच्या तत्कालीन मोदी सरकारनेही तपासात हस्तक्षेप केला नसल्याचे त्यांनी सांगितले. मग सोनियांनी आत्मचरित्रातील संशयाचे भूत कोणत्या पुराव्यावर साकारले? की, नवगांधींच्या राजकारणात सत्यापेक्षा सोयीलाच अधिक महत्त्व आहे? गोध्रा हा कट होता, हे लिहिण्यात अडचण काय? अडचण हीच ‘घातपात’ हा शब्द लिहिला, तर मतपेटीतील काही मते निसटतील, ही भीती! म्हणूनच, शब्दांना असा मुलामा द्यायचा उद्योग आत्मचरित्रात सोनियांनी केला. बाबरी पडल्यावर अश्रू ढाळणार्या सोनिया, ५९ कारसेवकांचा मृत्यूवर डब्बा पेटवला की पेटला, याची चर्चा करतात; यातच काँग्रेसचे चरित्र उघड होते. सोनियांनी आत्मचरित्र लिहिले की, राजकीय सोयीनुसार इतिहासाचे संपादन केले, हा प्रश्न निर्माण झालाच आहे. आत्मचरित्रात सोयीसाठी इतिहासातील जखमांवर संदिग्धतेची पट्टी चिकटवण्याचे उद्योग काँग्रेसने करू नये. कारण, शब्द बदलल्याने इतिहास बदलता येत नाही. त्याला सामोरे जाण्याची हिंमतच लागते!
प्रसिद्धीचाच बाजार
नसिरुद्दीन शाह यांना प्रसिद्धीची एवढीच हौस असेल, तर त्यांनी चांगला अभिनय करावा; पण वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याचा स्वस्तातील उद्योग मात्र टाळावा. मुंबई प्रेस क्लबमध्ये ‘कोविड’ काळातील मदतकार्यावरील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम. पण, या कार्यक्रमात पुस्तकाच्या आशयापेक्षा सरकारविरोधी ‘पिपाणी’ वाजविण्याचा मोह नसिरुद्दीन यांना आवरला नाही. सहा वर्षांपूर्वी सरकारने अचानक ‘लॉकडाऊन’ लावल्याने नागरिकांचे हाल झाले, अशी टीका त्यांनी केली. वर, सरकारची कसलीच तयारी नसल्याचे पालूपदही जोडले. अलीकडे तसा पुस्तक प्रसिद्धीसाठी वादग्रस्त वक्तव्य करण्याचा नवा पायंडा पडलाच आहे. नसिरुद्दीन यांचे वक्तव्य त्याचाच भाग! पुस्तक विकण्यासाठी बातमी होईल, अशी विधाने करण्याचा शिरस्ता अलीकडे तथाकथित पुरोगामी कंपू नेमाने पाळताना दिसतो. जगाला हादरवले, हे खरे. जगात कुणालाही या संकटाचा अंदाज नव्हताच. अशा वेळी भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदीचा निर्णय घेतला गेला. हा निर्णय नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या दृष्टीने घेतला. त्यावर सहा वर्षांनंतर टीका करणार्यांनी त्यावेळची जागतिक परिस्थिती तरी डोळ्यांसमोर ठेवावी.
सरकारने पूर्वतयारी केली नाही म्हणणार्या शाह यांनी, जगातील कोणत्या देशाने ‘कोरोना’साठी लाल गालिचा अंथरला होता? हे आधी सांगावे. कोणत्या देशाकडे या संकटाचा आराखडा तयार होता? भारताने उपलब्ध साधनसामग्री आणि परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतले. त्यामुळे सहा वर्षांनी आरामखुर्चीत बसून शहाणपणाचे तारे तोडण्याला काहीच अर्थ नाही. त्यावेळी देशासमोरच्या आव्हानांची जाणीव ठेवण्याइतका विवेक तरी हवा! आणि पुस्तकाचा विषय बाजूला, मदतकार्य बाजूला आणि सरकारवर टीका करण्याची खुमखुमी मात्र जिरवण्यास प्राधान्य द्यायचे, यास म्हणावे तरी काय? पुस्तक प्रसिद्धीसाठी एवढाच आधार उरला असेल, तर त्या प्रसिद्धीला किंमतच नाही. प्रत्येक वेळी सरकारवर चिखलफेक केली की, आपण फार मोठे विचारवंत ठरत नाही, नसिरुद्दीन शाह यांनी लक्षात घेतले पाहिजे. अभिनयाच्या पडद्यावर मिळविलेली प्रसिद्धी आणि राजकीय विधानांची क्षणिक चर्चा यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. पुस्तकाच्या नावाखाली प्रसिद्धीचा हा धंदा करण्यापेक्षा गप्पच बसलेले बरे!
- कौस्तुभ वीरकर