कल्याण (Ramesh Mhatre Hospitalized) : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची कारागृहात प्रकृती खालावली. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शुक्रवारी आधारवाडी कारागृहातून उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
आधारवाडी कारागृहात असताना रमेश म्हात्रे यांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. त्यानंतर कारागृह प्रशासनाने खबरदारी म्हणून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविले. उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. (Ramesh Mhatre Hospitalized)
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याच्या कथित प्रकरणानंतर म्हात्रे यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती. आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले असले, तरी या प्रकरणात त्यांची न्यायालयीन कोठडी कायम आहे. (Ramesh Mhatre Hospitalized)