राष्ट्रहित जपताना...

    15-Nov-2026
 
 National Interest and Civic Responsibility
 
माणूस आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी आयुष्यभर धडपडतो. मात्र, या व्यक्तिगत प्रयत्नांतूनच समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्राचेही चरित्र घडत असते. राष्ट्रभक्ती केवळ घोषणांतून किंवा सीमांचे रक्षण करण्यापुरती मर्यादित नाही; ती रोजच्या आचरणात, व्यवहारातील सचोटीत आणि दुसर्‍याविषयीच्या आदरातही प्रतिबिंबित व्हायला हवी. सार्वजनिक जीवनातील वाढती अभद्रता, द्वेषाची भाषा आणि हरवत चाललेले सामाजिक संकेत पाहता राष्ट्रहिताचा विचार पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिगत आचरणाशी जोडून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
आ पण रोज उपजीविकेसाठी उद्योग-व्यवसाय करतो, मेहनत घेतो, आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी धडपडतो. हे सारेच आपल्याला वैयक्तिक वाटणे स्वाभाविकच. पण, आपल्या कामाची पद्धत, व्यवहारातील सचोटी, इतरांशी असलेले वागणे आणि रोजच्या जबाबदार्‍या पार पाडण्याची वृत्ती, या सगळ्यांचा समाजावर परिणाम होतो. आपले उठणे-बसणे, बोलणे आणि वागणेही नकळत राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देत असते. राष्ट्रनिर्मिती ही केवळ काही मोजयाच व्यक्तींच्या असामान्य कार्यातून घडत नाही; ती असंख्य सामान्य माणसांच्या दैनंदिन आचरणातूनही आकार घेते. सभ्यताही देखील प्रगतीच्या मोजमापाने न ठरता; ती आपल्या भाषेतून, वर्तनातून आणि दुसर्‍याला दिलेल्या सन्मानातून व्यक्त होते. आज देशाच्या सार्वजनिक जीवनात जे काही घडते आहे, ते अस्वस्थ करणारे आहे. राजकीय मतभेद असणे स्वाभाविकच. सत्तेला प्रश्न विचारणे, विरोध करणे, कठोर टीका करणे, हा लोकशाहीचा अधिकारही आहे. पण, या सगळ्याच्या नावाखाली विरोधकांना अर्वाच्च भाषेत संबोधणे, त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत आणि घरातील ज्येष्ठांपर्यंत अपमानाची भाषा पोहोचवणे, ही कोणत्या लोकशाहीची संस्कृती?
 
भारत ही केवळ एक प्राचीन संस्कृती नाही; ती सात्त्विक विचारांची, संत-महात्म्यांची आणि सहिष्णुतेची भूमीदेखील आहे. ज्या समाजात घरातील ज्येष्ठांसमोर डोक्यावरून पदर घेण्याची परंपरा होती, वडीलधार्‍यांचा मान राखला जात असे आणि पाहुण्याचा सन्मान हा संस्कार मानला जाई, त्या समाजात आज दुसर्‍याला अपमानित करण्यातच मोठेपणा वाटू लागला आहे, ही खेदाचीच बाब.
 
राजे आले, राज्यकर्ते आले, अनेक विचारधारा उदयाला आल्या. मतभेदही झाले, संघर्षही झाले; पण विरोध व्यक्त करताना मर्यादा पाळण्याची जाणीवच आपल्या संस्कृतीची खरी ताकद होती. आज त्या मर्यादाच पुसल्या जात आहेत की काय? असा प्रश्न पडतो. याहून अधिक चिंताजनक बाब म्हणजे, या भाषेला मिळणारे प्रोत्साहन. विशेषतः नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे म्हणून पुढे येणारे काही नेतेही अभद्र भाषेचा अवलंब करत असतील, तर आपण पुढच्या पिढीला नेमका कोणता वारसा देत आहोत? शब्द हे केवळ उच्चार नसतात ते विचार घडवतात, वृत्ती निर्माण करतात आणि हळूहळू समाजाच्या वर्तनाचा भाग होतात.
 
या सगळ्याचा परिणाम देशांतर्गत वातावरणापुरताच मर्यादित राहत नाही. जग भारताकडे केवळ त्याच्या आर्थिक प्रगतीमुळे किंवा सामर्थ्यामुळे पाहत नाही; त्याच्या संस्कृतीकडे, लोकशाहीच्या परिपक्वतेकडे आणि सार्वजनिक जीवनातील सभ्यतेकडेही पाहते. ‘राष्ट्र प्रथम’ ही विचारसरणी केवळ घोषणेतूनच फक्त सिद्ध न होता; ती आपल्या शब्दांतून, कृतीतून आणि मतभेद व्यक्त करण्याच्या पद्धतीतूनही दिसली पाहिजे. देशाची प्रतिष्ठा उंचावणे जितके महत्त्वाचे, तितकेच ती आपल्या वर्तनामुळे मलिन होऊ न देणेही महत्त्वाचे. आपल्या संस्कृतीत अशी एक धारणा आहे की, घरात अभद्र शब्द उच्चारले, तर वास्तूही ‘तथास्तु’ म्हणते. या श्रद्धेमागे एक सूक्ष्म जाणीव आहे, ती म्हणजे आपण जसे शब्द उच्चारतो, तसेच वातावरण घडवतो. मग ज्या राष्ट्रभूमीला आपण माता मानतो, जिच्या संस्कारांतून आपले व्यक्तिमत्त्व घडते, त्या भूमीवर उभे राहून तिच्याच सार्वजनिक जीवनात अपमानाची, द्वेषाची आणि अभद्रतेची भाषा उच्चारली जात असेल, तर त्या राष्ट्रभूमीला लेश होणार नाहीत का?
 
राष्ट्राचा सन्मान केवळ सीमेवर जपायची बाब नाही; तो सार्वजनिक जीवनातही जपायचा असतो. राष्ट्रभूमीचा गौरव तिच्या नागरिकांच्या विचारांतून, आचरणातून आणि परस्परांना दिलेल्या सन्मानातूनही वाढतो. आपण ‘सूर्य थांबला’, ’पृथ्वी हलकी होते आहे’ या प्रतिमेतून, पृथ्वीच्या बदलत्या अवस्थेकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. आज पुन्हा एकदा वाटते, पृथ्वी हलकी होणे म्हणजे, केवळ तिच्यावरील भौतिक ओझे कमी होणे नव्हे. मानवी मनातून विवेक, संवेदना, कृतज्ञता आणि परस्परांविषयीचा आदर कमी झाल्यास; माणसांची गर्दी वाढली तरी पृथ्वीवरील माणुसकी मात्र कमी हाईल.
 
प्रश्न कोण जिंकले आणि कोण हरले, हा नाही. प्रश्न असा आहे की, या सगळ्यात आपण काय गमावत आहोत? राजकीय सत्ता बदलू शकते, नेते बदलू शकतात, विचारधारा बदलू शकतात; पण समाजाच्या भाषेतून सभ्यता हरवली, तर ती पुन्हा रुजवण्यासाठी किती पिढ्या लागतील, हे मात्र नेमकेपणाने सांगता येत नाही. पृथ्वीचा भार माणसांच्या संख्येनेच वाढत नाही; माणसांमधील माणुसकी कमी झाल्यावर तो वाढतो. कदाचित, म्हणूनच आज पृथ्वी हलकी होत चालल्याची जाणीव होते आहे.
नंदकुमार पटवर्धन
 
९९७००५६५२३




संबंधित मजकूर