भारताची खरी शक्ती तिच्या विविधतेत आणि त्या विविधतेला जोडणार्या आत्मीयतेच्या धाग्यात आहे. भाषा, वेशभूषा, संस्कृती आणि भौगोलिक अंतर वेगळे असले, तरी माणुसकीची भावना सर्वांना एकत्र आणू शकते. पूर्वोत्तर भारतातील तरुणांना देशाच्या अन्य भागांत परकेपणाऐवजी आपलेपणाचा अनुभव मिळावा, त्यांच्या अडचणींत मदतीचा हात मिळावा आणि देशातील विविध समाजघटकांमध्ये बंधुभावाचे नाते निर्माण व्हावे, या उदात्त हेतूनेच ‘माय होम इंडिया’ या संस्थेची स्थापना झाली. गेल्या २१ वर्षांत मदत, सेवा, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि युवा सहभागाच्या माध्यमातून, या संस्थेने पूर्वोत्तर भारत आणि उर्वरित देश यांच्यात आत्मीयतेचा भक्कम सेतू उभारला. या आगळ्यावेगळ्या प्रवासाच्या कहाणीचा मागोवा घेणारा हा लेख...
१९९१ मध्ये संघ प्रचारक म्हणून मी मेघालयात रुजू झालो. त्याकाळात पूर्वोत्तर भारतातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नोकरी-व्यवसायासाठी देशाच्या अन्य भागांतून आलेले तरुण-तरुणी मला भेटत. त्यांच्या अनुभवांतून एक वेदनादायी वास्तव वारंवार समोर येई. चेहर्याच्या वेगळेपणामुळे त्यांना ‘विदेशी’ समजले जाई, ‘चिंकी’सारख्या अपमानास्पद शब्दांनी हिणवले जाई. भाषा माहीत नसल्याने संवाद साधता येत नसेच, स्थिानिक समाजाशी सहजपणे मिसळणेही कठीण होई.
यापैकी काहीजणांना महाविद्यालयात प्रवेश घेताना भेदभावाचा सामना करावा लागे. कुणाला पोलीस ठाण्यात न्याय मिळवताना अडचणी येत, कुणाची फसवणूक होत असे, तर कुणाचा पगारच अडवला जाई. अशा प्रसंगी मदत करणारे कोणी नसेल, तर अन्यायाची भावना मनात खोलवर रुजते. या अनुभवांमुळेच काही तरुणांच्या मनात देशापासून दुरावल्याची भावना निर्माण होत असल्याचे मला दिसले. अलगाववादी विचारसरणीचे लोक याच नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत. ही परिस्थिती बदलायची असेल, तर केवळ भाषणांमधून एकात्मतेचा संदेश देऊन चालणार नाही; प्रत्यक्ष आयुष्यात आपलेपणाचा अनुभव त्यांना द्यावा लागेल, हे मला जाणवले.
पूर्वोत्तर भारतातील तरुणांना देशाच्या इतर भागांत आधार मिळावा, त्यांच्या प्रश्नांवर विश्वासाने धावून जाणारे लोक असावेत आणि त्यांच्याविषयी देशभर योग्य माहिती पोहोचावी, या हेतूने देशव्यापी संस्था उभारण्याचा विचार माझ्या मनात आला. चेहरा किंवा भाषा वेगळी असली, तरी ते आपल्या देशाचेच नागरिक आहेत; त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही आपली जबाबदारी आहे, हा विचार समाजापर्यंत मला पोहोचवायचा होता.
२००२ मध्ये प्रचारक म्हणून काम थांबवून मी घरी परतलो. त्यानंतर २००४ मध्ये मित्र, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना एकत्र करून संस्थेची उभारणी सुरू केली. दि. ९ डिसेंबर २००५ रोजी, ‘माय होम इंडिया’ला नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. म्हणूनच, दि. ९ डिसेंबर हा दिवस आम्ही संस्थेचा स्थापना दिवस आणि ‘फ्रॅटर्निटी डे’ म्हणून साजरा करतो. २०२६ मध्ये संस्थेच्या प्रवासाला २१ वर्षे पूर्ण होत आहेत.
या प्रवासातील आमचे एक महत्त्वाचे काम म्हणजे, पूर्वोत्तर भारतातील नागरिकांना देशाच्या अन्य राज्यांत अडचणीच्या वेळी मदत करणे. गेल्या २१ वर्षांत दीड लाखांहून अधिक नागरिकांना, विविध प्रकारे आम्हांला मदत करता आली. कुणाला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, कुणाचा अडकलेला पगार सोडवून दिला, पोलीस ठाण्यातील वाद किंवा अडचण सोडवण्यासाठी मदत केली. अनेकदा एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर कर्ज मिळवण्यासाठी किंवा योग्य संपर्क जोडण्यासाठी हातभार लावला. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एका फोनमध्ये मिळेलच असे नाही; पण अडचणीत असलेल्या व्यक्तीला ऐकून घेणे, तिच्या बाजूने उभे राहणे आणि शय तो तोडगा शोधणे, यातूनच विश्वास तयार होतो.
मदत म्हणजे केवळ संकटात आर्थिक किंवा प्रशासकीय सहकार्य करणेच नव्हे. नात्यांतून आपलेपणा निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दिवाळी, होळी, पोंगल, ओणम यांसारख्या सणांच्या वेळी, पूर्वोत्तर भारतातील तरुणांना आपल्या घरी बोलवण्यास आम्ही कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. त्यांचे सणही आम्ही इथे साजरे केले. ईशान्येतील अनेक कुटुंबे ख्रिश्चन आहेत; त्यांच्यासोबत ‘अॅडव्हेंट’ आणि ख्रिसमसचे कार्यक्रमही आत्मीयतेने आयोजित केले. ‘माय होम इंडिया’च्या कामात विविध सणांचा सहभाग हा केवळ कार्यक्रमांचा भाग नाही. एकमेकांच्या श्रद्धा आणि परंपरांचा आदर करत, आनंदात सहभागी होण्याची ती संधी आहे.
याच विचारातून ‘फ्रॅटर्निटी कप’सारखे फुटबॉल सामनेही आयोजित केले. खेळाच्या मैदानावर भाषा किंवा प्रदेशाची भिंतच उभी राहत नाही. संघभावना, मैत्री आणि परस्पर आदर यांना महत्त्व मिळते. अशा उपक्रमांतून स्थानिक तरुण आणि पूर्वोत्तर भारतातून आलेले तरुण एकत्र येतात, भेटीगाठी वाढतात, ओळखी मैत्रीत बदलतात आणि अनोळखीपणाची जागा विश्वास घेतो.
देशभरातील लोकांना पूर्वोत्तर भारताची प्रत्यक्ष ओळख व्हावी, यासाठी आम्ही अनेक जनजागृतीचे कार्यक्रमही केले. डिजिटल आणि समाज माध्यमे सर्वसामान्यांच्या हातात येण्यापूर्वीही हे काम सुरू होते. भाषणे, संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रत्यक्ष भेटींतून, पूर्वोत्तर भारतातील समाजजीवनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. अनेकांना त्या प्रदेशाला भेट देण्यासाठी प्रोत्साहित केले. आतापर्यंत हजारो लोकांनी गट करून, पूर्वोत्तर भारताचा प्रवास केला आहे. तेथील निसर्ग, संस्कृती आणि समाजाशी त्यांची थेट ओळख झाली. या संवादामुळे पूर्वग्रह कमी होतात आणि देशाच्या एका भागातील लोकांना, दुसर्या भागातील माणसांचे जीवन समजते.
विद्यार्थी-तरुणांना व्यासपीठ मिळावे आणि देशभरातील लोकांनी पूर्वोत्तर भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा आनंद घ्यावा, यासाठी विविध शहरांत उत्सवांचे आयोजअन करण्यात आले. पुणे, बंगळुरू, नागपूर, दिल्ली, मुंबई आणि चंदीगढ येथे ‘माय होम इंडिया’च्या स्थानिक घटकांनी, अशा कार्यक्रमांचे आयोजन केले. या प्रयत्नांचा मोठा अविष्कार म्हणजे, दिल्लीतील ‘छएडीं ऋशीीं- नॉर्थ ईस्ट स्टुडंट्स फेस्टिव्हल’!
२०२६ मध्ये दि. ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे झालेल्या 'NESt Fest' साठी, २९ हजार तरुण-तरुणींनी ऑनलाईन नोंदणी केली. दोन दिवसांत प्रत्यक्ष उपस्थितीची एकूण संख्या २५ हजारांहून अधिक होती. तीन राज्यांचे मुख्यमंत्री, दोन राज्यपाल, तीन केंद्रीय मंत्री, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली. पूर्वोत्तर भारतातील पारंपरिक नृत्ये, वेशभूषा आणि संगीताचाही रंगमंचावरून परिचय झाला. पारंपरिक पोशाखांचा फॅशन शो, युवा गायक-गायिकांची सादरीकरणे आणि दिल्ली परिसरातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठीच्या नृत्यस्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेची संकल्पना ‘वन्दे मातरम्’ होती. अनेक विद्यापीठांनी उत्साहाने सहभाग घेतला. हा महोत्सव केवळ मनोरंजनाचाच कार्यक्रम नव्हता. पूर्वोत्तर भारतातील तरुणांच्या प्रतिभेला देशासमोर आणणारा आणि विविध प्रदेशांतील युवकांना एकत्र आणणारा तो मंच होता.
संस्थेच्या सेवाकार्यातील आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे, ‘सपनों से अपनों तक’! हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पुन्हा पोहोचवण्याचा हा प्रकल्प, सुमारे १४ वर्षांपूर्वी सुरू झाला. या उपक्रमातून आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक हरवलेल्या मुलांना, त्यांच्या कुटुंबीयांशी सुरक्षितपणे पुन्हा जोडण्यात आले आहे. प्रत्येक पुनर्मिलन म्हणजे, एका कुटुंबात परतलेला आनंद आणि हरवलेली आशाच असते.
पूर्वोत्तर भारतातील रुग्णांना, विशेषतः कर्करोगाच्या रुग्णांना, उपचारांच्या काळात मदत करण्याचे कामही आम्ही केले. उद्योजक आणि तरुणांना नोकरीच्या संधी, व्यवसायविषयक संपर्क आणि मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी शक्य ते सहकार्य केले. ही सर्व कामे एका संस्थेची यादी म्हणून पाहण्यापेक्षा, देशातील नागरिकांनी एकमेकांसाठी उभे राहण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पाहिली पाहिजेत.
‘माय होम इंडिया’च्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त दि. ९ डिसेंबर २०२६ रोजी मुंबईतील अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात, ‘NESt Fest Mumbai’ आयोजित करण्याचे नियोजन आहे. Blue Hills Meet the Blue Ocean - एक शाम पूर्वोत्तर के नाम’ ही त्याची संकल्पना असून, पूर्वोत्तर भारतातील सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाराष्ट्रातील आदिवासींची कला यांचा संगम या महोत्सवात घडवण्याचा आमचा मानस आहे. विविध राज्यांतील गायक-गायिका आणि कलाकारांना एकाच मंचावर आणून, ‘फ्रॅटर्निटी’चा संदेश अधिक व्यापक करायचा आहे.
‘माय होम इंडिया’ सुरू करताना मनात एक साधा विचार होता की, पूर्वोत्तर भारतातून आलेल्या कोणत्याही नागरिकाला देशाच्या अन्य भागांत एकटेपणा किंवा परकेपणा जाणवू नये. आजही तोच विचार आमच्या कामाला दिशा देतो. भारताच्या कोणत्याही भागातून आलेल्या व्यक्तीला दुसर्या भागात आपले घर आणि आपली माणसे सापडली, तर राष्ट्रीय एकात्मता कागदावरची संकल्पना न राहता, रोजच्या आयुष्यातील अनुभव होईल. आत्मीयतेच्या अशा असंख्य नात्यांतूनच बंधुभावाचा शाश्वत धागा मजबूत होतो.
- सुनील देवधर