प्राचीन भारताच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देणारी मंदिरे म्हणजे, तत्कालीन समाजाच्या कलासक्त वृत्तीची, सौंदर्यदृष्टीची आणि अभियांत्रिकी कौशल्याची जिवंत साक्षच! दगडाला आकार देताना त्यात सौंदर्य, श्रद्धा आणि कल्पकतेचा अविष्कार घडवणार्या अज्ञात कलाकारांच्या प्रतिभेचा शोध घेताना, भारतीय संस्कृतीचे अनेक अनोखे पैलू ही मंदिरे उलगडतात. ओडिशाचे ‘लिंगराज’ यांपैकीच एक. काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या या अद्भुत वारशाचा मागोवा घेणारा हा लेख...
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर! आज वेगाने विस्तारत असलेल्या या शहराची हजारो वर्षांच्या सांस्कृतिक प्रवासाशी जोडली गेलेली एक ओळख म्हणजेच, मंदिरांची नगरी! शहराच्या जुन्या भागात प्रवेश केल्यावर आधुनिक इमारतींच्या गर्दीतून अचानक दगडी शिखरांचे दर्शन होते. एखाद्या चौकातून वळल्यावर छोटेसे शिवमंदिर भेटते, तर थोडे पुढे गेल्यावर शतकानुशतके उभ्या मंदिरांच्या रांगा दिसतात. या सर्व शिखरांमध्ये सर्वांत उंच, सर्वांत प्रभावी आणि भुवनेश्वरच्या धार्मिक जीवनाच्या केंद्रस्थानी असलेले शिखर म्हणजे, लिंगराज मंदिराचे! जवळपास १८० फूट उंचीचे हे शिखर पाहताना प्रश्न पडतो की, अकराव्या शतकातील शिल्पकारांनी इतया भव्य दगडी वास्तूची कल्पना तरी कशी केली असेल? आणि केवळ कल्पनाच नाही, तर त्या वास्तूच्या प्रत्येक स्तरावर देवता, नर्तिका, गज-सिंह, पुष्पवल्ली आणि असंख्य अलंकार कोरण्याचे कौशल्य त्यांनी कसे प्राप्त केले असेल? याचे उत्तर शोधायचे असेल, तर आपल्याला भुवनेश्वरच्या प्राचीन इतिहासात प्रवेश करावाच लागतो.
आजचे भुवनेश्वर प्राचीन काळी ‘एकाम्र’ क्षेत्र म्हणून ओळखले जाई. स्थानिक स्थलपुराणांनुसार हा परिसर शिव-पार्वतीच्या वास्तव्याशी जोडला जातो. ‘एकाम्र’ म्हणजे आंब्याच्या वृक्षाशी संबंधित पवित्र क्षेत्र! या भूमीला शिव उपासनेची अनेक शतकांची परंपरा होती. परशुरामेश्वर, मुक्तेश्वर, राजाराणी, ब्रह्मेश्वर आणि लिंगराज ही मंदिरे पाहिली; तर कलिंग स्थापत्य विकासाचा संपूर्ण प्रवासच आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. प्रारंभीची तुलनेने लहान देवालये, पुढे अधिक सुबक होत गेलेली शिखरे, मंदिरांच्या भिंतींवर वाढत गेलेले शिल्पवैभव आणि अखेरीस प्रचंड प्रमाणात विकसित झालेले लिंगराज मंदिर! म्हणूनच, लिंगराजकडे केवळ एक स्वतंत्र वास्तू म्हणून पाहणे अपुरेच आहे. ते अनेक शतकांच्या स्थापत्य प्रयोगांचे परिपक्व रूप ठरावे. मंदिराच्या विद्यमान प्रमुख वास्तूचा संबंध ११व्या शतकातील सोमवंशी राजवटीशी जोडला जातो. काही परंपरांमध्ये ‘ययाती केशरी’चेही नाव येते, तर स्थापत्य आणि ऐतिहासिक अभ्यासात ‘उद्योत केशरी’च्या काळालाही महत्त्व दिले गेले आहे. पुढे पूर्व गंग राजांच्या काळात या मंदिरपरिसराचा विस्तार झाला. त्यामुळे आजचे मंदिर एकाच वेळी पूर्ण झालेले नसून, अनेक टप्प्यांत विकसित झाले आहे.
भारतीय मंदिर स्थापत्याच्या अभ्यासात कलिंगशैली, नागर स्थापत्य परंपरेची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक शाखा मानली जाते. या शैलीतील मंदिराचे मुख्यतः दोन प्रकारचे उंचावलेले वास्तुघटक सहज ओळखता येतात. गर्भगृहावरील वक्ररेषीय, उंच शिखराला ‘रेखा देऊळ’ म्हणतात, तर त्यापुढील मंडपाच्या पायर्यांसारख्या चढत जाणार्या छपराला ‘पिढा देऊळ’ संबोधतात. लिंगराज मंदिरात या दोन्ही प्रकारांचा विलक्षण समन्वय दिसतो. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशातून आत गेल्यावर दिसणारे आणि एकाच अक्षावर उभे असलेले चार प्रमुख भाग म्हणजे भोगमंडप, नटमंडप, जगमोहन आणि सर्वांत शेवटी गर्भगृहावरील विशाल देऊळ. ‘भोगमंडप’ म्हणजे, देवतेला नैवेद्य अर्पण करण्याशी संबंधित सभागृह. ‘नटमंडप’ हा नृत्य आणि धार्मिक विधींशी संबंधित भाग. त्यानंतर येतो ‘जगमोहन’ म्हणजे, मुख्य सभामंडप आणि या सर्वांच्या पलीकडे उभे असते, गर्भगृहाचे उंच शिखर. या रचनेत एक स्थापत्यविचार दडलेला आहे. मंदिराच्या बाहेरून गर्भगृहाकडे जाताना वास्तूंची उंची क्रमाक्रमाने वाढत जाते. भोगमंडपापासून सुरू हा प्रवास जगमोहन ओलांडून, अखेरीस उंच रेखा देवळापाशी पोहोचतो. जणू संपूर्ण वास्तूच आपली नजर हळूहळू देवतेच्या अधिष्ठानाकडे नेते.
लिंगराजचे मुख्य शिखर म्हणजे, कलिंग स्थापत्याच्या परिपक्वतेचे उत्कृष्ट उदाहरणच! त्याच्या तळभागावर विविध रथ किंवा उभे प्रक्षेप दिसतात. भिंतींच्या खालच्या आणि वरच्या भागांमध्ये शिल्पांची मांडणी केली आहे. त्यावर उंचावत जाणारा वक्ररेषीय ‘गंडी’ भाग, शीर्षाजवळील ‘आमलक’ आणि ‘कलश’ अशी रचना आहे. शिखराच्या पृष्ठभागावर असंख्य लहान स्थापत्यरूपे आणि अलंकार कोरलेले असल्याने संपूर्ण वास्तूच एखाद्या विशाल दगडी शिल्पासारखी भासते. मंदिराच्या बाह्य भिंतींकडे बारकाईने पाहिल्यास शिल्पकारांनी केवळ सजावट केली नसल्याचे सहज लक्षात येते. गणेश, कार्तिकेय, पार्वती, शिवाची विविध रूपे, अर्धनारीश्वर, सूर्य आणि इतर देवतांच्या प्रतिमांतून, तत्कालीन धार्मिक विश्वाची ओळख होते. देवतांच्या बरोबरीनेच नर्तिका, अलंकारिक स्त्रीप्रतिमा, प्राणी, व्याल आणि पुष्परचनांमुळे या भिंतींवर तत्कालीन कलाविश्वाचा एक समृद्ध पटच उलगडताना आपल्याला दिसतो. विशेषतः मंदिराच्या भिंतींवरील रथ, अनुरथ, कनिका, जंघा आणि त्यांमधील लहान देवकोष्ठांची रचना समजून घेतल्यास शिल्पकारांनी सपाट भिंतीला सुंदरपणे प्रकाश आणि सावलीच्या खेळात रूपांतरित केल्याचे जाणवते. सकाळच्या आणि संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात या शिल्पांचे रूपही सतत बदलतच राहते.
पण, लिंगराज मंदिराचे वैशिष्ट्य केवळ त्याच्या स्थापत्यात नाही. येथील देवताच आपल्याला भारतीय उपासनेच्या एका सुंदर समन्वयाची ओळख करून देते. लिंगराज हे शिवाचे रूप असले, तरी येथे उपासना ‘हरिहर’ स्वरूपाची केली जाते. ‘हर’ म्हणजे शिव आणि ‘हरि’ म्हणजे विष्णू. या दोन उपासना परंपरांचा संगम लिंगराजाच्या धार्मिक परंपरेत दिसतो. भारतीय मंदिरांच्या इतिहासात शैव आणि वैष्णव परंपरा स्वतंत्रपणे विकसित झाल्या. त्यांची तत्त्वज्ञाने, आगम, विधी आणि उपासनापद्धती वेगवेगळ्या होत्या. पण, प्रत्यक्ष समाजजीवनात या परंपरांमध्ये संवादही घडत राहिला. काही ठिकाणी हरिहराच्या संयुक्त प्रतिमा निर्माण झाल्या, तर काही मंदिरांच्या उपासनेत दोन्ही परंपरांची वैशिष्ट्ये सामावली गेली. लिंगराज मंदिर हे अशा धार्मिक समन्वयाचे महत्त्वाचे उदाहरण आहे. गर्भगृहातील स्वयंभू लिंगाची उपासना शिव आणि विष्णू यांच्या एकात्म स्वरूपात केली जाते. पुढील काळात ओडिशात जगन्नाथ उपासनेचे महत्त्व वाढले आणि भुवनेश्वरच्या धार्मिक जीवनाचे वैष्णव परंपरेशी असलेले संबंध अधिक दृढ झाले. म्हणूनच, लिंगराजचा इतिहास आपल्याला शिकवतो की, मंदिर म्हणजे केवळ एका काळातील धार्मिक विचारांचे स्थिर स्मारक नसून, बदलत्या काळानुसार त्याच्या उपासनेत, उत्सवांत आणि सांस्कृतिक अर्थांमध्ये नवनवीन स्तरही जोडले जातात.
मंदिराच्या विशाल प्राकारात अनेक लहान-मोठी देवालये आहेत. त्यामुळे मुख्य लिंगराज मंदिराभोवती, स्वतंत्र देवतांचे एक छोटेसे धार्मिक विश्वच उभे आहे. या मंदिरसमूहातून शिव उपासनेबरोबरच, विविध देवता आणि स्थानिक परंपरांचे स्थान अधोरेखित होते.लिंगराजच्या उत्तरेला असलेले ‘बिंदुसागर’ सरोवर या पवित्र भूगोलाचा आणखी एक महत्त्वाचा भाग. स्थानिक परंपरेनुसार, भारतातील विविध पवित्र नद्यांचे पाणी या सरोवरात एकत्र आले. सरोवराच्या सभोवतालची मंदिरे, घाट आणि धार्मिक विधींमुळे ‘बिंदुसागर’ संपूर्ण ‘एकाम्र’ क्षेत्राच्या धार्मिक जीवनाचेच केंद्र होते. या सरोवराजवळचे अनंत वासुदेव मंदिर, भुवनेश्वरच्या वैष्णव परंपरेची साक्ष देते. त्यामुळे लिंगराज, बिंदुसागर आणि अनंत वासुदेव ही स्थळे एकत्र पाहिल्यास भुवनेश्वरचा शैव-वैष्णव सांस्कृतिक भूगोल अधिकच स्पष्ट होतो.
लिंगराज मंदिराची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे, येथील रुकुणा रथयात्रा! अशोकाष्टमीच्या निमित्ताने लिंगराजाच्या उत्सवमूर्तीची रथयात्रा निघते. मंदिराच्या प्राकारातून बाहेर पडून, देवता नगरातील भक्तांच्या भेटीसाठी जाते. देवता आणि नगरवासीय यांच्यातील हे नाते भारतीय उत्सवपरंपरेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. महाशिवरात्री दिवशी मंदिराच्या शिखरावर प्रज्वलित केला जाणारा महादीप, भक्तांच्या श्रद्धेच्या दृष्टीने विशेष महत्त्व असलेला सोहळा असतो. ११व्या शतकातील ही वास्तू आजही उत्सवांनीच जिवंत आहे. तिच्या दगडी भिंतींवर इतिहास कोरला आहे. पण, तिच्या अंगणात आजही पूजा, नैवेद्य, मंत्रोच्चार आणि उत्सवांची परंपरा अखंड सुरू आहे.
म्हणूनच, भुवनेश्वरला गेल्यावर केवळ लिंगराजाचे दर्शन घेऊन परतू नका. सर्वप्रथम मुक्तेश्वर मंदिर पाहा, त्याच्या सुंदर तोरणातून कलिंग स्थापत्याची सौंदर्यदृष्टी समजून घ्या. पुढे राजाराणी मंदिराच्या शिखरातील रचना आणि शिल्पांचे निरीक्षण करा, ब्रह्मेश्वर मंदिरात स्थापत्याच्या अधिक विकसित रूपाचा अनुभव घ्या आणि मगच लिंगराजासमोर उभे राहा. तेव्हाच कदाचित तुमच्या लक्षात येईल की, या विशाल शिखराची भव्यता निर्माण होण्यामागे अनेक पिढ्यांचे शिल्पकार, स्थापत्यकार, राजाश्रय आणि उपासनेच्या परंपरांचा प्रदीर्घ प्रवास आहे. मुक्तेश्वर आपल्याला कलिंग स्थापत्यातील सौंदर्य शिकवते, राजाराणी त्यातील शिल्पवैभव दाखवते, तर लिंगराज त्या संपूर्ण स्थापत्य परंपरेचे भव्य आणि परिपक्व रूप आपल्या समोर उभे करते. संध्याकाळच्या वेळी ‘बिंदुसागरा’च्या काठावरून लिंगराजाचे शिखर पाहताना हा अनुभव आणखीच गहन होतो. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात दगडी शिखराचे रूप बदलते, तर सरोवराच्या पाण्यात काठावरच्या मंदिरांचे प्रतिबिंब हलत राहते. त्या विशाल शिखराच्या पलीकडे भुवनेश्वरच्या शेकडो वर्षांच्या मंदिर-संस्कृतीची आठवण दडलेली आहे. कारण, लिंगराज मंदिर हे कलिंग स्थापत्याच्या परिपक्वतेचे, शैव-वैष्णव परंपरांच्या समन्वयाचे आणि हजार वर्षांहून अधिक काळ जिवंत राहिलेल्या मंदिर-संस्कृतीचे भव्य प्रतीक आहे.म्हणूनच, भुवनेश्वरच्या मंदिरनगरीत उभे लिंगराजाचे शिखर केवळ आकाशाकडे झेपावत नाही. ते आपल्याला भारतीय स्थापत्यकलेच्या एका विलक्षण उत्कर्षाकडे घेऊन जाते.
इंद्रनील बंकापुरे
७८४१९३४७७४