‘आपण चांगले, तर जग चांगले’ या समजूतीमुळे डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवणार्या हिंदूंसोबत अनेकदा ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’च्या घटना घडताना दिसतात. याविरोधात कायदा आहे, त्याची अंमलबजावणीही होईल. तरीही, या घटना घडतात. याचे कारण, आपल्यासोबत वाईट होत आहे, हे समजण्याइतकीही अक्कल नसणारे लोक, त्यातही महिला-मुली आजही आपल्या समाजात आहेत. ‘सगळे धर्म एकच आहेत आणि सगळी माणसे सारखीच आहेत,’ हा विचार, सर्वधर्म समभाव, सहिष्णुता ही हिंदू-संस्कृतीची भूषणे आहेत म्हणे! पण, काळाच्या ओघात या भूषणांचे ‘भूषण’ खरेच मिरवू शकतो का? या परिप्रेक्ष्यात इंदोरच्या नुकत्याच घडलेल्या घटनेचा मागोवा घेणारा हा लेख...
इंदोरच्या पवन सोनीने कालपरवा गळा चिरून पत्नीला मारून टाकले, वर स्वत:ही आत्महत्या केली. १८ वर्षांपूर्वीच पवनचा वर्षासोबत प्रेमविवाह झाला होता. वर्षा पस्तीशीची, तर पवन चाळीशीचा होता. दोघांना दोन मुले, एक १५ वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी. पवनचे दुकान होते. तो पराठे विकण्याचा व्यवसाय करत असे. मात्र, या पे्रमविवाहाचा दुःखद अंत झाला. जिच्यावर प्रेम केले, जिच्यासोबत सात जन्माचे नाते टिकावे अशी इच्छा होती, तिचाच खून करून पवनने स्वतःही आत्महत्या का केली? या दुर्दैवी घटनेमागचे सत्य पाहून दुःख,संताप येत आहे ना? त्यामुळेच या घटनेचा मागोवा घेणे गरजेचे आहे. पवनला काही महिन्यांपासूनच जाणवले की, गृहिणी असलेल्या वर्षाचे वर्तन बदलले आहे. ती कुटुंबापासून अलिप्त राहते. त्याला वाटले, वर्षाला काहीतरी चिंता असेल, आजारी असेल किंवा घरातल्या कामाने थकत असेल. पवनने त्या दिवसापासूनच वर्षाची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेण्यास सुरुवात केली. तो वर्षासोबत जास्त वेळ घालवू लागला. पण, या सगळ्यामुळे वर्षा आणखीनच बेताल वर्तन करू लागली. ‘मला एकट राहू दे, कामधंदा कर’ म्हणू लागली. पवनने मग पुन्हा कामात लक्ष घातले.
मात्र, एकेदिवशी तर कहरच झाला. त्याला कळाले की, साधीसुधी वर्षा नशाही करु लागली होती. पवनने या बदलाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. त्याला जे समजले, त्यामुळे तो अधिकच दुःखी झाला, हतबल झाला. कारण, वर्षा मोलमजुरी करणार्या २४ वर्षांच्या फैजानच्या जाळ्यात अडकली होती. त्याने याबाबत वर्षाला जाब विचारला असता, तिने ‘मला तो हवा, तू नको’ असे म्हणत वादच घातला. वर्षा आणि पवनमध्ये सातत्याने खटके उडू लागले. मुलांसाठी पवनने हेसुद्धा स्वीकारले. त्याने वर्षाच्या अपरोक्ष तिचा फोन ‘रेकॉर्डिंग’ करण्याचे ठरवले.
एकेदिवशी त्याने एक फोन ‘रेकॉर्डिंग’ ऐकले आणि त्याने वर्षाचा गळा चिरून खूनच केला, स्वतःही आत्महत्या केली. का? कारण, या ‘रेकॉर्डिंग’मध्ये फैजान वर्षाला सांगत होता, ‘तुझ्या नवर्याला आणि मुलाला मारून टाकू, मग तुझ्या पोरीला विकू.’ विशेष म्हणजे पतीच्या आणि मुलाच्या हत्येला, तसेच स्वतःच्या सात वर्षांच्या लेकीला विकण्यासाठी वर्षा सहमतीही देत होती. या सगळ्या गुन्ह्यात त्याला साथ देण्याचे म्हणत होती. हे सगळे रेकॉर्डिंग पवनने ऐकले आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. १८ वर्षे वैवाहिक जीवनातली जोडीदार असलेली वर्षा, आपल्यासकट मुलांच्या जीवावर उठली होती. पोटच्या पोरीला विकण्यासाठी आतुर होती. ती माता नव्हती, वैरीण होती. हे सगळे प्रकरण संपवण्यासाठीच पवनने वर्षाची हत्या केली. अर्थात, पवनने केलेल्या हत्येचे-आत्महत्येचे समर्थन होऊच शकत नाही. कारण, कोणत्याही गोष्टीचे समाधान कुणाचा जीव घेऊन किंवा जीव देऊन होत नसते. या परिप्रेक्ष्यात वर्षाला व्यसन लावून, तिच्या पती-मुलाचा खून करून, मुलीला विकण्याची भाषा करणारा फैजान कोण होता?
तर, काही महिन्यांपूर्वी पवनने त्याच्या पराठ्याच्या दुकानावर पत्रे टाकण्यासाठी, मजुरी करणार्या फैजानला बोलावले होते. पण, दुकानावर पत्रा टाकायला आलेल्या २४ वर्षांच्या फैजानने ३५ वर्षीय वर्षाशी ओळख करून घेतली. फैजान वयाने लहान, आर्थिक परिस्थितीनेही कंगाल! असे किती लोक कामधंद्यासाठी येत-जात. त्यामुळे पवनला या ओळख काढण्यामध्ये काहीच वावगे वाटले नाही. फैजानने वर्षाशी गोडगोड बोलून, ओळख वाढवली. ‘छोट्या-मोठ्या कामांत मदतीला येऊ का?’ असे वर्षाला सतत विचारू लागला. ‘छोट्या-मोठ्या कामात फुकटात मदत करणारा मिळतोय, तर त्याला का सोडा,’ असा विचार वर्षाने केला. कदाचित, याचमुळे पवननेही याकडे दुर्लक्ष केले असावे. २४ वर्षांचा फैजान आपल्या एका शब्दावर काहीही करायला तयार होतो, या बेगडी-खोट्या कल्पनेतच वर्षा मश्गूल झाली. संधी साधून फैजानने डाव टाकला, तिला नशेचे व्यसन लावले. यातच तिचे आणि त्याचे अनैतिक संबंध सुरू झाले. व्यसनाची आणि लैंगिकतेची नशा लागलेली वर्षा पूर्णपणे फैजानच्या अधीन झाली. पवनला हे कळले, तेव्हा उशीर झाला होता. या प्रकरणात चूक कोणाची? वर्षाची की फैजानची? की, सर्वधर्म समभाव, निधर्मीपणाच्या आड सापाला दूध पाजण्याच्या वृत्तीची? जगभरात इतक्या घटना घडत असतानाही स्वस्तात काम करायला तयार होतो, म्हणून फैजानला दुकानात, घरात कामाला बोलावताना पवनने कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार केला का? दुसरीकडे वर्षा व्यसनी होऊन वासनांध झाली. इतकी की, खून करण्यास आणि पोटच्या मुलीला विकायला निघाली?
अशीच एक सत्यघटना रायगड जिल्ह्यातली. सधन-संपन्न घरच्या त्या ४३ वर्षांच्या गृहस्थाचा सुखी संसार. त्याची अतिदोस्ती त्याच्याच वयाच्या कौमवाल्याशी झाली. तोही बिबी-बालबच्चेवाला, तर सधन हिंदू गृहस्थाला ११ वर्षांची लाडकी लेक. या कौमवाल्याला ती ‘चाचा’ म्हणायची. हिंदू गृहस्थाची पत्नी आणि १३ वर्षांची लेक या ‘चाचा’ला राखीही बांधे. आता ते सगळेच एका कुटुंबातले झाले होते. घरात ‘गंगा-जमुना तेहजीब’ होतीच. बरीच वर्षे गेली. मुलगी १८ वर्षांची झाल्याबरोबर, या ५० वर्षांच्या चाचाबरोबर कुठेतरी गेली. अज्ञात स्थळाहून तिने गृहस्थाला मोबाईलहून निरोप पाठवला. "लहानपणापासून चाचाने मला प्रेम दिले. चाचा किती चांगला आहे, तुम्हाला तर माहिती आहेच. मी त्यांच्याशीच निकाह केला.” यानंतर त्या गृहस्थाला ‘आडजवळ करू की विहीर’ असे झाले. तिच्या बालपणापासूनचे दिवस त्याला आठवले. मुलीला शाळेत आणणे-सोडणे, फिरायला नेणे, गृहस्थ आणि त्याची पत्नी कामानिमित्त कुठे बाहेर गेले; तर घरी येऊन मुलीला सांभाळणे किंवा मुलीला स्वतःच्या घरी नेणे, हे सगळेच हा चाचा करायचा. याच काळात त्याने मुलीच्या अबोधतेचा गैरफायदा घेतला होता, हेही उघड झाले. पण, आता पश्चाताप करून काय फायदा? अशा अनेक घटना आज समाजात घडतच आहेत.
असो! हे सगळे लिहीत असतानाच, इस्रायलचा दौरा आठवला. सधनातले सधन ज्यूसुद्धा घरची काम स्वतःच करत होते. वेळ पडल्यास शेजार्यापाजार्यांना, चतुर्थ श्रेणीच्या कामात मदत करत होते. घरकाम, बागकाम, स्वच्छता ते छोटी-मोठी मोलमजुरीची कामेही ज्यूच करत होते. याबद्दल भेटलेल्या ज्यूंनी उत्तर दिले होते, "आमची कामे आम्हीच करणार किंवा आमच्याच लोकांकडून करून घेणार.” ज्यूंचा हा वर्णश्रेष्ठत्वाचा दंभ आहे का? असे मला वाटले.
मी तसे विचारताच, त्यातला एकजण म्हणाला, "हमास’चे दहशतवादी जमिनीखाली सुरुंग खणून इस्रायलमध्ये अनेक ठिकाणी घुसले. कुठे, किती ज्यू राहतात आणि कुणाच्या घरचा दरवाजा, खिडकी कुठे आहे, कुणाच्या घरी तरुण मुली आहेत, कोण श्रीमंत आहे, हे याची त्यांना तंतोतंत माहिती होती. हे कसे काय? तर, दि. ७ ऑक्टोबर २०२३च्या पूर्वी आम्हा सर्व ज्यूंच्या घरी घरकाम, बागकाम, कष्टाची कामे, सगळी चतुर्थ श्रेणीची मोलमजुरीची कामे करणारे ज्यू नव्हते. तर, ही कामे करणारे ९० टक्के लोक हे गाझा पट्टीतले मुस्लीम स्त्री-पुरुषच होते. गेली अनेक वर्षे ते ज्यूंच्या वस्तीत काम करायचे. दिवसभर काम करून, ते संध्याकाळी गाझा पट्टीत परतत. आम्ही त्यांच्या जीवावर घरदार-मुलेबाळ सोडून जात होतो. त्यांना घरातल्यासारखेच आम्ही वागवत होतो. त्यांना आमच्या घराची पूर्ण माहिती होती. पण, दि. ७ ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी यातले बहुसंख्य लोक कामाला आले नव्हते. का? त्यांना या हल्ल्याबद्दल माहिती होती का? आम्हाला तर वाटते की, यातील अनेकांना ‘हमास’च्या दहशतवाद्यांनीच फितवले. या लोकांनी घराची, वस्तीची माहिती ‘हमास’ला पुरवली. आम्ही कामानिमित्त बाहेर असताना, हे लोक जमिनीखालून बंकर बनवण्यासाठीची जागा, त्यासाठीची मदत ‘हमास’ला करायचे. त्यामुळेच तर दहशतवाद्यांना आमच्या घरादाराबद्दलची, वस्तीबद्दलची इत्यंभूत माहिती मिळाली आणि या बंकरमधून ते आमच्या वस्तीत घुसले. आम्ही ठरवले आहे की, आमची कामे आम्हीच करणार आणि कामे द्यायची असली, तर ती आमच्याच माणसाला देणार.” असो.
आता हे सगळे पाहून आपण आपल्या-आपल्या शहराची परिस्थिती पाहावी. घरातले सगळे दैनंदिन व्यवहार आपण कुणासोबत करत आहोत? प्रत्येक वस्तीचा नाका आणि स्टेशन किंवा बसडेपोचा परिसर आठवा, देशाचा नकाशा आठवा. देशाच्या नव्हे; तर शहरांच्याही सगळ्या सीमाभागात कोणाची वस्ती दाट आहे आणि ती सातत्याने का, कशी वाढत आहे, ते बघा. हे सगळे आठवल्यावर विचार करा की, उद्या काही अघटित घडले; तर काय होऊ शकते? कदाचित, हे विचार भित्रेपणाचे असू शकतात. ‘आम्ही काय बांगड्या भरल्या का?’ असे स्त्रियांना कमी लेखणारे उद्गारही काढले जातील. पण, कितीही म्हटले, तरी सत्य नाकारून चालणार नाही. कष्टाच्या, स्वयंरोजगार देणार्या कलाकौशल्याच्या कामात पैसे मिळत असूनही, या कामामध्ये किती टक्के हिंदू आहेत? उद्या ठरवले की, सुरक्षिततेच्या दृष्टीने आमची कामे आम्हीच करू किंवा आमच्या विश्वासाच्या माणसाकडून करून घेऊ, तर ते शक्य आहे का? हे कसे शक्य होईल? तसेच कुणाशी मैत्री करावी, कुणाशी नाते जोडावे आणि कुणाला जीवनातच नव्हे; तर घरातही आणावे, याबाबत जागरूक राहायला हवे की नाही?
९५९४९६९६३८