नुकतीच दिवाळी संपली. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव! दिवाळीमध्ये आपण रांगोळ्या काढतो, कंदील लावतो, फराळ करतो, एकमेकांकडे भेट देतो, आपल्याकडे पाहुणे येतात. दिवाळी अशी आपण आनंदात साजरी करतो. मात्र, दिवाळी संपल्यावर आपण पुन्हा एकदा आपल्या नैमित्तिक दिनचर्येच्या चक्रात अडकतो. आनंद, उत्साह आणि प्रेमाचा सण म्हणजे दिवाळी. पण, दिवाळीच्या वेळेला आपण जसा विचार करतो, तोच विचार आपण पुढेही कायम ठेवला पाहिजे, असे मला अगदी मनापासून वाटते. दिवाळीच्या निमित्ताने आपण एखाद्या मित्राला फोन केल्यास, त्याच्याशी गप्पा मारल्यास, हेच आपण दिवाळीनंतरही सुरू ठेवू शकतो. तसेच मनातील कटुता दूर सारण्याचा प्रयत्नही आपल्याला यानिमित्ताने करता येतो. मनापासून एखाद्याला माफ करूया, एखाद्याची मनापासून माफी मागूया. असे केल्यानेच नाती जपली जातात.
प्रत्येकवेळेला आपण हा विचार केला पाहिजे की, एखाद्या वादामध्ये समोरच्याची चूक असली, झाले ते झाले म्हणून आपण त्यातून ‘मूव्ह ऑन’ होऊया, असा विचारही आपण केला पाहिजे. मला जाणवणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यावर्षी दुष्काळामुळे पाण्याची असलेली टंचाई! त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचे संदेश आपण एकमेकांना देत आहोतच. प्रदूषण टाळण्यासाठी दिवाळीतही फटाके कमी उडवण्याचे संदेश आपण दिले, हेसुद्धा आपण वर्षभर कायम पाळले पाहिजे. आपल्या देशात वर्षभर सण सुरू असतात. अशा वेळी प्लास्टिक सजावटीऐवजी फुले, नैसर्गिक सामग्रीचा वापर करण्याचा विचार करून आपण पर्यावरणरक्षण करू शकतो.
आज प्रत्येकाचे जीवन इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी व्यापलेले आहे. अशा वेळी एखाद्या संध्याकाळी मोबाईल, लॅपटॉपसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजूला ठेवून नातेवाईक, पालक आणि मित्रांशी गप्पा मारण्यासाठी वेळ काढणे गरजेचे झाले आहे. किंबहुना, एकत्र जमल्यावर मोबाईल बाजूला ठेवण्याचा नियमही आपण करूच शकतो. समोरच्याला समजून घेणे आणि समोरची व्यक्ती काय सांगते, त्याच भावनेने ते ऐकणे, हीसुद्धा समोरच्याला दिलेली सुंदर भेट ठरेल.
अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण करू शकतो, ती म्हणजे, कृतज्ञता व्यक्त करणे! कृतज्ञता वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल आपल्याला वाटू शकते, ती आपण व्यक्तही केली पाहिजे. दिवसाच्या सुरुवातीला किंवा शेवटी आपण या गोष्टी नित्यनेमाने करू शकतो. आपण नवीन वर्षानिमित्ताने अनेक संकल्प करत असतो. दिवाळीच्या वेळीही अनेकजण असे संकल्प करतात. दररोज व्यायाम करणे, दिवाळीच्या वेळी बाजारात आलेल्या दिवाळी अंकाच्या माध्यमातून वाचनाच्या संकल्पाची सुरुवात करता येऊ शकते. दिवाळी अंक साहित्यअंगाने अतिशय समृद्ध असतात. या संकल्पामुळे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल घडताना दिसून येतात.
अनेकवेळा आपण एकमेकांना भेटवस्तू देतो. मात्र, अलीकडे प्रत्येकाकडे जवळपास प्रत्येक गोष्ट असतेच. तसेच प्रत्येकाची असलेली वस्तूची गरजही वेगवेगळी आहे. त्यामुळे अशा बाजारातील तयार भेटवस्तू देण्यापेक्षा स्वत:च्या हाताने तयार केलेली भेटवस्तू देऊया, शुभेच्छापत्र देऊया किंवा मित्र-मैत्रिणींसमवेत अथवा स्वत: एकटे जाऊन किल्ल्यांच्या वा अन्य प्रदर्शनांना भेटी देण्यानेही आपला जीवनानुभव अधिक समृद्ध होण्यास मदत होते. अशा विविध गोष्टींचा वापर करून आत्मानंद आणि आत्मविकास या गोष्टी महत्त्वाच्या असतात. दिवाळीतील दिवे वस्तूंचे असले, तरी प्रकाश मात्र विचारांचा पडला पाहिजे. भेटवस्तू हातामध्ये असल्या, तरी प्रेम मनामध्ये असणे आवश्यक आहे. आता दिवाळी संपली असली, तरी दिवाळीत ठरवलेल्या गोष्टी जीवनाचा भाग केल्यास आपला व्यक्तिमत्त्व विकास साध्य करणे सहजशक्य होईल!
डॉ. गौरी कानिटकर
(लेखिका ‘अनुरूप’ विवाह संस्थेच्या कार्यकारी संचालक असून, ‘मॅरेज इन्रिचमेंट कौंसिलर आहेत.)