दिव्यात पुन्हा वाहनांना आगीचा विळखा; महिनाभरात दुसरी घटना!

दिवा-अगासन मार्गावर तीन कार आगीच्या भक्ष्यस्थानी; दोन कार जळून खाक, यापूर्वी साबेगावमध्ये २३ वाहने जळाली होती

    15-Nov-2026
Diva Vehicle Fire Incident
 
ठाणे (Diva Vehicle Fire Incident) : दिवा परिसरात वाहनांना आग लागण्याच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. साबेगाव परिसरात महिनाभरापूर्वी एका रिक्षेसह २२ दुचाकी जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पहाटे दिवा-अगासन मार्गावर रस्त्यालगत उभ्या असलेल्या तीन कारना आग लागली. या आगीत दोन कार पूर्णपणे जळून खाक झाल्या, तर एका कारचे अंशतः नुकसान झाले. अवघ्या महिनाभरात दिव्यात वाहनांना आग लागण्याची दुसरी मोठी घटना घडल्याने वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
शनिवारी सकाळी सुमारे ६.३७ वाजण्याच्या सुमारास दिवा-अगासन मार्गावरील एसएमजी शाळेजवळ ही घटना घडली. रस्त्यालगत उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांना अचानक आग लागली. यामध्ये हुंदाई ऑरा आणि अन्य एका कारचा पूर्णपणे कोळसा झाला, तर मारुती सुझुकी वॅगनआरचे अंशतः नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच शिळ अग्निशमन केंद्राचे जवान एक अग्निशमन बंब आणि बचाव वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Diva Vehicle Fire Incident)
 
दरम्यान, १३ ऑक्टोबर रोजी दिव्यातील साबेगाव परिसरात रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या घटनेत एक रिक्षा आणि २२ दुचाकी अशा एकूण २३ वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. आदर्श विद्यालयासमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना लागलेली आग पहाटेच्या सुमारास आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले होते. ही आग नेमकी लागली की लावण्यात आली, याचा तपास मुंब्रा पोलिसांकडून सुरू होता.
 
आता महिनाभराच्या अंतराने पुन्हा तीन कारना आग लागल्याने दिव्यातील रस्त्यालगतच्या वाहनांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. दिव्यातील अनेक इमारतींमध्ये पुरेशी वाहनतळ व्यवस्था नसल्याने रहिवाशांना रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. अशा वाहनांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, शनिवारी लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासह आगीच्या कारणांचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे. (Diva Vehicle Fire Incident)
 
 




संबंधित मजकूर