मुंबई (CIDCO Housing Lottery November 2026) : सिडकोच्या डिसेंबर २०२५ मधील गृहनिर्माण योजनेतील बिगर-ईडब्ल्यूएस प्रवर्गातील घरांसाठी अखेर सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या प्रधानमंत्री आवास योजना १.० अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेची सोडत दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडणार आहे. यापूर्वी न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगित असलेल्या अल्प उत्पन्न गटातील घरांच्या सोडतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाची सोडत यापूर्वीच पार पडली आहे. मात्र, अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांच्या सोडतीला न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे स्थगिती देण्यात आली होती. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर सिडकोने बिगर-इडब्ल्यूएस प्रवर्गासाठी सोडत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. (CIDCO Housing Lottery November 2026)
दरम्यान, या योजनेच्या संदर्भात सिडकोने महत्त्वाचे स्पष्टीकरणही दिले आहे. डिसेंबर २०२५ च्या योजनेत नमूद करण्यात आलेला ‘एलआयजी’ हा शब्द या योजनेच्या प्रयोजनार्थ ‘बिगर-इडब्ल्यूएस’ या अर्थाने ग्राह्य धरण्यात येणार आहे. योजनेच्या इतर सर्व अटी आणि शर्ती मात्र पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत.
सोडतीपूर्वी अर्ज मागे घेऊ इच्छिणाऱ्या किंवा सदनिकेवरील आपला दावा सोडू इच्छिणाऱ्या अर्जदारांना सिडकोने विशेष संधी दिली आहे. या घोषणेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत अर्जदारांना माघार घेता येणार आहे. यासाठी अर्जदारांनी आपल्या सिडको लॉगिनमधील ऑनलाइन सुविधेचा वापर करणे बंधनकारक आहे. अन्य कोणत्याही माध्यमातून केलेल्या विनंत्या स्वीकारल्या जाणार नाहीत.(CIDCO Housing Lottery November 2026)
विशेष म्हणजे, अर्ज मागे घेणाऱ्या अर्जदारांना त्यांनी भरलेली बुकिंग रक्कम कोणतीही कपात न करता पूर्णपणे परत मिळणार आहे. अर्ज मागे घेण्याची ऑनलाइन विनंती सादर केल्यानंतर १५ दिवसांच्या आत ही रक्कम परत केली जाईल. मात्र, अर्ज नोंदणीच्या वेळी दिलेल्या बँक खात्याचा तपशील अचूक आणि वैध असणे आवश्यक आहे.
अर्ज मागे घेणाऱ्या किंवा सदनिकेवरील दावा सोडणाऱ्या अर्जदारांना आगामी सोडतीत सहभागी होता येणार नाही. तसेच, या निर्णयाबाबत भविष्यात फेरविचार करण्याची मागणीही करता येणार नाही. दुसरीकडे, निर्धारित दहा दिवसांच्या मुदतीत माघार न घेणाऱ्या अर्जदारांचा सोडतीतील सहभाग कायम राहणार असून, त्यांनी सिडकोने जाहीर केलेली व्यवस्था मान्य केली आहे, असे गृहीत धरले जाईल. त्यामुळे बिगर-इडब्ल्यूएस प्रवर्गातील सर्व अर्जदारांनी सोडतीची तारीख, माघार घेण्याची मुदत आणि ऑनलाइन अर्जप्रक्रियेची नोंद घ्यावी, असे आवाहन सिडकोने केले आहे. (CIDCO Housing Lottery November 2026)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.