गडचिरोलीत ३ हजार कोटींच्या विकासकामांचा ऐतिहासिक प्रारंभ! आदिवासी समाज नक्षलवादाच्या छायेतून विकासाच्या नव्या पर्वाकडे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

२४६ प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनजातीय गौरव दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात सहभाग

 
 Gadchiroli Development Projects 2026
 
मुंबई (Gadchiroli Development Projects 2026) : एकेकाळी नक्षलवाद, हिंसाचार आणि मागासलेपणामुळे चर्चेत असलेला गडचिरोली जिल्हा आता विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करीत आहे. बंदुकीच्या आवाजाची जागा आता उद्योग, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी घेत असून दुर्गम आदिवासी गावांपर्यंत विकासाची गंगा पोहोचू लागली आहे. याच परिवर्तनाला राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करणारा जनजातीय गौरव दिनाचा भव्य सोहळा शनिवारी गडचिरोलीत पार पडला.
 
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. त्यांच्या हस्ते देशभरातील सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या २४६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. नक्षलवादाच्या सावटातून बाहेर पडणाऱ्या आदिवासीबहुल भागांसाठी हा दिवस विकासाच्या नव्या आशा आणि संधींचा संदेश घेऊन आला. (Gadchiroli Development Projects 2026)
 
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘जोहार’ या पारंपरिक अभिवादनाने केली. भगवान बिरसा मुंडा यांच्यासह बाबूराव शेडमाके, राघोजी भांगरे, खाज्या नाईक, राणी दुर्गावती आणि तंट्या भिल्ल यांसारख्या आदिवासी स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या योगदानाचे स्मरण केले. आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास हा देशाच्या राष्ट्रीय अस्मितेचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नक्षलवादामुळे अनेक दशके विकासापासून दूर राहिलेल्या भागांमध्ये आता शाळा, रस्ते, आरोग्य सुविधा, उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. (Gadchiroli Development Projects 2026)
 
देशातील जवळपास ५० कोटी नागरिकांनी अत्यंत गरिबीवर मात करणे आणि नक्षलवादाच्या संकटातून देशाची मुक्तता होणे, या दोन ऐतिहासिक उपलब्धी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ‘वंचितांना प्राधान्य’ या धोरणातून दुर्गम आदिवासी वस्त्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. पीएम जनमन आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून पक्की घरे, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाबरोबरच आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा आणि अस्मिता जपण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
 
लाभार्थ्यांच्या अनुभवातून विकासाचे चित्र
 
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा येथील तीन आदिवासी लाभार्थ्यांशी संवाद साधला. यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम आदिवासी समाजाचे कृष्णा नागोराव टेकाम यांनी पीएम जनमन अभियानातून पक्के घर आणि शौचालय मिळाल्यामुळे कुटुंबाचे जीवनमान बदलल्याचे सांगितले. गुजरातमधील वजीरभाई कोतवालिया यांनी बांबू हस्तकलेच्या प्रशिक्षणामुळे मासिक उत्पन्न सात ते आठ हजार रुपयांवरून २० ते २५ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती दिली. तर तेलंगणातील सबावत अन्वेष याने एकलव्य आदर्श निवासी शाळेतून शिक्षण घेत आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळविल्याचा प्रवास मांडला. या तीन अनुभवांतून निवारा, रोजगार आणि शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजात घडणारे परिवर्तन स्पष्ट झाले. (Gadchiroli Development Projects 2026)
 
‘गडचिरोली विकासात पहिला जिल्हा बनेल’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या बदलत्या विकासचित्रावर विशेष भर दिला. नक्षलवादग्रस्त आणि मागास जिल्हा अशी असलेली जुनी ओळख आता पुसली जात असून गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा न राहता विकासाच्या बाबतीत पहिला जिल्हा बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील विपुल खनिज संपत्तीच्या आधारे गडचिरोलीला देशाची पुढील ‘स्टील सिटी’ म्हणून विकसित करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. पोलाद उद्योग, औद्योगिक गुंतवणूक आणि पूरक व्यवसायांमधून स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. मात्र, औद्योगिक विकास करताना जल, जंगल आणि जमिनीचे संवर्धन तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीतील आदिवासी तरुणी आधुनिक अवजड यंत्रसामग्री चालवून औद्योगिक क्षेत्रात काम करीत असल्याचा उल्लेख करत त्यांनी जिल्ह्यातील बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे चित्र मांडले. (Gadchiroli Development Projects 2026)
 
आदिवासी अस्मिता आणि आधुनिकतेचा संगम
 
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आदिवासी समाजाचा विकास केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता त्यांची संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान जपण्याची आवश्यकता अधोरेखित केली. भगवान बिरसा मुंडा यांचा जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कांसाठीचा संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी, पारंपरिक लोककला आणि हस्तकलेला बाजारपेठ तसेच कलाकारांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.
 
या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम, केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (Gadchiroli Development Projects 2026)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर