जागतिक उत्पादन आणि व्यापाराचे केंद्र बदलत असताना व्हिएतनामने आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. चीनवरील उत्पादन क्षेत्राचे अवलंबित्व कमी करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या पर्यायी उत्पादन केंद्रांचा शोध घेत असताना, व्हिएतनाममधील न्घे आन प्रांताने या संधीचे आर्थिक विकासात रूपांतर करण्याची तयारी सुरू केली आहे.
औद्योगिक वसाहती, खोल समुद्रातील बंदरे, ऊर्जा प्रकल्प आणि वाहतूक सुविधांची एकात्मिक उभारणी करून जागतिक पुरवठा साखळीत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रांताचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, परकीय थेट गुंतवणुकीसाठी केवळ औद्योगिक भूखंड उपलब्ध करून न देता उद्योगांना आवश्यक असलेली संपूर्ण परिसंस्था विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
न्घे आनमधील ‘होआंग माई-१’ औद्योगिक वसाहतीत २६४.७७ हेटरपैकी २५१.९३ हेटर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. आतापर्यंत पाच औद्योगिक प्रकल्पांनी सुमारे ७२५.७४ दशलक्ष अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केली असून, उपलब्ध औद्योगिक भूखंडांपैकी ८७.६ टक्के क्षेत्र भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. उर्वरित १२.८४ हेटर क्षेत्राच्या भूसंपादनातील अडथळे दूर करण्याचे काम सुरू आहे. तसेच औद्योगिक वसाहतींना जोडणारे रस्ते आणि जलनिस्सारण व्यवस्था विकसित करण्यावरही भर दिला जात आहे.
औद्योगिक विकासाला आंतरराष्ट्रीय व्यापाराशी जोडण्यासाठी कुआ लो खोल समुद्रातील बंदर प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पात ३२.८३ हेटर जमिनीचा आणि २०८.०४ हेटर जलक्षेत्राचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १९.१६ हेटर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले असून, जमीन सपाटीकरणाचे काम ६७.७१ टक्के पूर्ण झाले आहे. प्रवेश रस्ते आणि बांधकामासाठी आवश्यक वीजपुरवठा व्यवस्था पूर्ण झाली असून, प्रवेश पूल आणि धक्क्यांचे बांधकाम सुरू आहे.
जागतिक बाजारपेठेत उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी बंदरांची उपलब्धता आणि मालवाहतुकीचा वेग निर्णायक ठरतो. त्यामुळे कुआ लो बंदरामुळे औद्योगिक कंपन्यांना कच्च्या मालाची आयात आणि तयार उत्पादनांची निर्यात अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीशी जोडलेल्या कंपन्यांसाठी न्घे आनचे आकर्षण वाढू शकते.
औद्योगिक विस्तारासाठी अखंडित ऊर्जापुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने प्रांतात सुमारे चार हजार अब्ज व्हिएतनामी डाँग गुंतवणुकीचा कचर्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाची प्रतिदिन १ हजार ५०० टन कचर्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असून, त्यातून ३० मेगावॅट वीज निर्माण होणार आहे. बांधकाम सुमारे ३५ टक्के पूर्ण झाले असून, २०२७च्या चौथ्या तिमाहीत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, ११० केव्ही वीजवाहिन्या, पाणीपुरवठा पाईपलाईन आणि जलउपसा केंद्रांच्या विकासालाही गती दिली जात आहे.
आज जागतिक गुंतवणूकदार एखाद्या देशाची किंवा प्रांताची निवड करताना केवळ स्वस्त मनुष्यबळ किंवा उपलब्ध औद्योगिक जमीन पाहत नाहीत. उत्पादन केंद्रापासून बंदरापर्यंतची वाहतूक, निर्यातीचा खर्च, ऊर्जा उपलब्धता, औद्योगिक पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय कार्यक्षमता यांचाही विचार केला जातो. त्यामुळे न्घे आन प्रांताने औद्योगिक वसाहती, खोल समुद्रातील बंदर आणि ऊर्जा प्रकल्प यांची एकाच वेळी उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हिएतनामसाठी ही रणनीती जागतिक उत्पादन साखळीतील आपले स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. विशेषतः बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी सक्षम औद्योगिक परिसंस्था निर्माण करणे, निर्यात क्षमतेत वाढ करणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी थेट संपर्क वाढविणे, यावर भर दिला जात आहे.
जागतिक बाजारपेठेत गुंतवणुकीची स्पर्धा आता केवळ सवलतींची राहिलेली नाही, तर सक्षम पायाभूत सुविधांची झाली आहे. न्घे आन प्रांताचा विकास आराखडा याच बदलत्या आर्थिक वास्तवाचे प्रतिबिंब असून, औद्योगिक क्षेत्र, बंदर आणि ऊर्जा यांची सांगड घालून जागतिक गुंतवणुकीसाठी अनुकूल केंद्र निर्माण करण्याचा व्हिएतनामचा प्रयत्न आहे.