ठाणे (Shahapur Dark Sky Zone SAPO Observatory) : शहापूरची ओळख आता केवळ निसर्गरम्य पर्यटनस्थळापुरती मर्यादित न राहता खगोलप्रेमींचे केंद्र म्हणूनही निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शहापूरमधील अत्याधुनिक ‘सॅपो’ (SAPO) तारांगण आणि वेधशाळेमुळे खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पाला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी रात्री विशेष भेट देत दुर्बिणीतून विविध ग्रह-ताऱ्यांचे निरीक्षण केले. यावेळी शहापूर परिसराला ‘डार्क स्काय झोन’ म्हणून घोषित करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे शहापूरला खगोल पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या भेटीदरम्यान मान्यवरांनी संपूर्ण रात्र दुर्बिणीतून आकाशातील विविध खगोलीय घटकांचे निरीक्षण करण्यात घालवली. सौरडाग, सौरज्वाला, शनीची कड्यांची वलये, गुरूचे चार प्रमुख चंद्र, शुक्र ग्रह तसेच आकाशगंगेतील विविध खगोलीय घटकांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यात आला. अत्याधुनिक दुर्बिणी आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणारा हा अनुभव उपस्थितांसाठी विशेष ठरला. ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. (Shahapur Dark Sky Zone SAPO Observatory)
विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागणार
सॅपो वेधशाळेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे धडे प्रत्यक्ष अनुभवता येणार आहेत. केवळ पुस्तकांमधून ग्रह-ताऱ्यांची माहिती घेण्याऐवजी दुर्बिणीतून आकाशाचे निरीक्षण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि खगोलविज्ञानाची आवड निर्माण होईल, तसेच समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी व्यक्त केला. शहापूर हे भविष्यात खगोलप्रेमींसाठी महत्त्वाचे केंद्र बनू शकते, असेही त्यांनी नमूद केले. (Shahapur Dark Sky Zone SAPO Observatory)
डार्क स्काय झोनसाठी शासनाकडे प्रस्ताव
या भेटीदरम्यान ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी शहापूर परिसराला महाराष्ट्र शासनाने ‘डार्क स्काय झोन’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली. रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाचे प्रदूषण कमी असल्यास आकाशातील तारे, ग्रह आणि इतर खगोलीय घटकांचे अधिक स्पष्ट निरीक्षण करता येते. त्यामुळे शहापूर परिसराला डार्क स्काय झोनचा दर्जा मिळाल्यास खगोल अभ्यास आणि पर्यटनाला चालना मिळू शकते. याशिवाय सॅपो वेधशाळेपर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता रुंद करण्याची मागणीही त्यांनी केली. (Shahapur Dark Sky Zone SAPO Observatory)
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी डार्क स्काय झोनसाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले. तसेच सॅपो प्रकल्पाला प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. आमदार दौलतराव दरोडा यांनीही पर्यटकांच्या सोयीसाठी वेधशाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
तरुणांच्या संकल्पनेतून साकारली वेधशाळा
शहापूरमधील निलेश ठाकूर, गिरीश ठाकूर आणि राज छेडा या तरुण संचालकांनी एकत्र येत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला आहे. पावसाळ्यापूर्वी आमदार दौलतराव दरोडा आणि दा. कृ. सोमण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. खगोलशास्त्राचा प्रसार व्हावा, यासाठी दा. कृ. सोमण आपले मौल्यवान ग्रंथही या प्रकल्पाला भेट देणार आहेत. (Shahapur Dark Sky Zone SAPO Observatory)