आधुनिक साहित्य आणि कलाविश्वातील रामकथा

    14-Nov-2026
 
 
Ramayana in Modern Literature and Cinema
 
रामकथा ही अविट आहे, नित्यनूतन आहे. आजवर तिच्यावर विपुल साहित्य निर्माण झाले असले, तरीही ती आजही तितकीच नवीन आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ चित्रपटातून पुन्हा एकदा रामकथा भव्य स्वरुपात प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यानिमित्ताने साहित्य आणि कलाविश्वातील रामकथेचा मागोवा घेणारा हा लेख...
 
राम हे भारतीय जनमानसाच्या चेतनेतील केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वच नाही, तर मर्यादा, कर्तव्य आणि आदर्श यांचे शाश्वत प्रतीकही आहेत. त्यामुळे भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही श्रीरामांवर विपुल लेखन झाले. त्यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट, नाटके आणि विविध कलाकृतींची निर्मिती झाली. साहित्य, चित्रपट आणि कलाविश्वातही श्रीरामांच्या विचारांचा आणि संदेशाचा ठसा खोलवर उमटलेला दिसतो. आधुनिक साहित्य, चित्रपट आणि दृश्य कलांच्या माध्यमातून नव्या सामाजिक, मानसशास्त्रीय आणि तात्त्विक दृष्टिकोनांतूनही रामकथेचे पुनर्मूल्यांकन झाले आहे, असे निश्चित म्हणता येईल. रामकथेचे वैशिष्ट्यच असे आहे की, ती आपण कितीही वेळा ऐकली, पाहिली किंवा वाचली, तरी प्रत्येक वेळी जीवनातील एका वेगळ्या आनंदाची आणि मूल्यांची अनुभूती ती देते.
 
आधुनिक साहित्य आणि लेखन
 
भगवान श्रीरामांवर आजवर विपुल लेखन झाले आहे. तरीही आनंदाची बाब म्हणजे, आजही श्रीरामांवर मोठ्या प्रमाणात हे लेखन सुरूच आहे आणि भविष्यातही राहील. मात्र, आधुनिक लेखकांनी रामकथा नव्या पद्धतीने, आपापल्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. यामध्ये काही लेखकांनी त्यांच्या लेखनात श्रीरामांचे अलौकिक ईश्वरस्वरूप अधोरेखित केले, तर काहींनी त्यांना संघर्षशील मानव, संवेदनशील शासक आणि अंतर्मनातील द्वंद्वांशी झुंजणारा नायक म्हणूनही चित्रित केल्याचे दिसते.
 
‘राम की शक्तिपूजा’ या काव्यात सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ यांनी, श्रीरामांचे एक वेगळेच रूप साकार केले आहे. युद्धभूमीवर रावणाच्या महाशक्तीशी सामना करताना संशय आणि निराशेच्या भावनेतून जाणारे, आत्मशक्तीचा शोध घेणारे श्रीराम त्यांनी सामान्य माणसाच्या रूपात चित्रित केले. श्रीरामांचे हे रूप मानवी संघर्ष, आत्मसंशयावर मात करण्याची जिद्द आणि राष्ट्रजागरणाचे प्रतीक ठरते.
 
प्रसिद्ध साहित्यिक डॉ. नरेंद्र कोहली यांनीही रामकथा पारंपरिक धार्मिक किंवा भक्तिकाव्याच्या चौकटीत न मांडता, वास्तववादी, वैज्ञानिक आणि आधुनिक मानवी दृष्टिकोनातून सादर केली. त्यांच्या रामकथेत ऋषी-मुनी केवळ पूजा-अर्चा करणारे नसून वैज्ञानिक, रणनीतीकार आणि समाजाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेले बुद्धिजीवी म्हणून समोर येतात. त्यांच्या मते, राक्षस ही काही वेगळी जीवसृष्टी नव्हती, तर समाजाचे शोषण करणार्‍या आणि मानवी शांततेत अडथळे निर्माण करणार्‍या प्रवृत्तींचेच ते प्रतीक होते. या संकल्पनेचा संबंध त्यांनी समकालीन घटनांशी जोडून स्पष्टही करण्याचा प्रयत्न केला आहे. तरुण वाचकांमध्ये लोकप्रिय असलेले लेखक अमीश त्रिपाठी यांनीही आपल्या ‘रामचंद्र शृंखला’ या पुस्तकांतून श्रीरामांना नियमांचे पालन करणारे, कायद्याप्रति निष्ठावान आणि समाजसुधारणेसाठी प्रयत्नशील असलेले व्यक्तिमत्त्व म्हणूनच सादर केले.
 
चित्रपटाच्या पडद्यावर रामकथा
 
भारतात भगवान श्रीराम आणि रामायणातील अन्य पात्रांवर आधारित चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटकांची मोठीच परंपरा आहे. रामकथेवर चित्रपटांची निर्मिती करण्यात केवळ भारतीय निर्मातेच नव्हे, तर परदेशी चित्रपटनिर्मातेही सहभागी झाले आहेत. रामानंद सागर यांनी ‘रामायण’ या दूरचित्रवाणी मालिकेच्या माध्यमातून इतिहास घडविला. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेत अरुण गोविल यांनी साकारलेले श्रीरामांचे शांत, सौम्य आणि करुणामय रूप, भारतीय जनमानसांच्या मनावर कोरले गेले. रामानंद सागर यांनी रामायणाच्या सादरीकरणाचा असा मानदंड निर्माण केला आहे की, त्यापुढे जाणे आजही आव्हानात्मकच ठरताना दिसते आहे.
 
अलीकडच्या दोन-तीन वर्षांत काही निर्मात्यांनी, रामायणावर आपल्या नव्या दृष्टिकोनातून चित्रपटांची निर्मिती केली. मात्र, त्यांच्या या नव्या प्रयोगांना प्रेक्षकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. आता नव्या निर्मात्यांची टीम, सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या बजेटसह रामायणाची कथा मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज आहे. त्यांच्या काही प्रयोगांनाही प्रेक्षकांचा विरोध होत आहे. चित्रपटनिर्मितीत व्यावसायिक गणिते आणि वैचारिक अजेंडांना अधिक महत्त्व दिल्यास, तर कथेतील भावनिक आशयाचे महत्त्व कमी होणे स्वाभाविकच आहे. भारतीय इतिहासावर चित्रपट निर्माण करणार्‍यांनी ‘हनुमान अंश’च्या निर्मात्यांकडून शिकण्यासारखे आहे. त्यांनी केवळ पैसा कमावण्यापेक्षा, कथा प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला.
मणिरत्नम यांच्या ‘रावण’ (२०१०) या चित्रपटात राम, सीता आणि रावण या पात्रांच्या प्रतीकात्मक स्वरूपाला आधुनिक पोलीस अधिकारी, अपहरण आणि बंडखोरी अशा गुंतागुंतीच्या संघर्षाच्या माध्यमातून मांडण्यात आले. तामिळ, तेलुगू, गुजराती, मराठी आणि कन्नड यांसह विविध भारतीय भाषांमध्येही, रामकथेवर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली आहे. रामायणाने जपानी चित्रपटनिर्मात्यांनाही आकर्षित केले. जपानी चित्रपटनिर्माते युगो साको यांनी मुलांसाठी ‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स राम’ (१९९२) या चित्रपटाची निर्मिती केली. मात्र, हा चित्रपट केवळ मुलांनाच नव्हे, तर सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना आवडला. जपानी अ‍ॅनिमेशन तंत्र आणि भारतीय रामकथेचा अनोखा संगम म्हणूनच, या चित्रपटाकडे पाहिले जाते.
 
कला आणि आधुनिक चित्रांकनातील श्रीराम
 
पारंपरिक कांग्रा, मेवाड आणि मधुबनी यांसारख्या लघुचित्रकला शैलींपासून पुढे जात, आधुनिक चित्रकारांनी रामकथा नव्या कल्पना आणि दृष्टिकोनातून चितारली. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्रतिष्ठापित अरुण योगीराज यांनी घडविलेली रामललाची श्यामशिळेतील मूर्ती याचे उत्तम उदाहरण! पारंपरिक शिल्पशास्त्राचा, विशेषतः ‘होयसळ’ शैलीचा प्रभाव आणि आधुनिक शिल्पकलेतून साकारलेले सूक्ष्म मानवी भाव यांचा उत्कृष्ट मिलापच, या मूर्तीत आपल्याला पाहायला मिळतो. आधुनिक काळात श्रीरामांचे स्वरूप केवळ उपासनेपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. ’न्याय’, ’मर्यादा’, ’मानवी करुणा’ आणि ’कर्तव्यभावना’ यांचे जिवंत आदर्श म्हणूनच, श्रीराम प्रत्येक नव्या माध्यमातून अधिकाधिक प्रासंगिक ठरताना दिसतात.
 
विविध भारतीय भाषांमधील रामायणावर आधारित चित्रपट
 
१. तेलुगू चित्रपटसृष्टी
  • ‘सम्पूर्ण रामायणमु’ (१९५८) - एन. टी. रामाराव यांनी श्रीरामांची भूमिका साकारली.
  • ‘सीताराम कल्याणम्’ (१९६१) - एन. टी. रामाराव यांनी रावणाची, तर हरनाथ यांनी श्रीरामांची भूमिका साकारली.
  • ‘लव कुश’ (१९६३) - तेलुगू चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड मानला जाणारा हा रंगीत चित्रपट. यात एन. टी. रामाराव यांनी श्रीरामांची, तर अंजली देवी यांनी सीतेची भूमिका साकारली आहे.
  • ‘श्रीराम राज्यम्’ (२०११) - बापू दिग्दर्शित या चित्रपटात नंदमुरी बालकृष्ण यांनी श्रीरामांची, तर नयनतारा यांनी सीतेची भूमिका साकारली.
२. तामिळ चित्रपटसृष्टी
  • ‘सीता कल्याणम्’ (१९३४) - ‘प्रभात टॉकीज’ आणि मुरुगादास यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला, हा सुरुवातीच्या काळातील प्रसिद्ध चित्रपट आहे.
३. कन्नड चित्रपटसृष्टी
  • ‘वाल्मीकी’ (१९६३) - महर्षी वाल्मीकी यांचे जीवन आणि रामायणाच्या रचनेवर आधारित या चित्रपटात, डॉ. राजकुमार यांनी प्रमुख भूमिका साकारली.
  • ‘श्रीराम पूजा’ (१९५५).
  • ‘दशहरा’ (१९६०) - भगवान विष्णूंच्या दशावतारांमधील रामावताराचा प्रसंग, या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे.
४. मराठी चित्रपटसृष्टी
  • ‘लंका दहन’ (१९१७) - दादासाहेब फाळके यांची निर्मिती असलेला हा ऐतिहासिक मूकपट आहे. यात अण्णा साळुंके यांनी श्रीराम आणि सीता या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या.
  • ‘सेतू बंधन’ (१९३२) - बाबूराव पेंटर आणि भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला चित्रपट आहे.
  • ‘रामराज्य’ (१९४३) - विजय भट्ट यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये, एकाचवेळी या चित्रपटाची निर्मिती केली. महात्मा गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट असल्याचे मानले जाते.
५. गुजराती चित्रपटसृष्टी
  • ‘संपूर्ण रामायण’ (१९७०चे दशक) - गुजराती भाषेत डब करून, तसेच रूपांतरित स्वरूपात प्रदर्शित करण्यात आलेला चित्रपट.
  • ‘सीताहरण’ / ‘सती सीता’ - गुजराती धार्मिक चित्रपटांच्या प्रारंभीच्या काळातील निर्मिती असलेल्या चित्रपटांपैकी एक.
६. मल्याळी चित्रपटसृष्टी
  • ‘कांचन सीता’ (१९७७) - जी. अरविंदन दिग्दर्शित हा समांतर चित्रपटसृष्टीतील जगप्रसिद्ध चित्रपट आहे. सी. एन. श्रीकांतन नायर यांच्या नाटकावर आधारित या चित्रपटात निसर्गालाच सीतेचे प्रतीक मानून, श्रीरामांच्या अंतर्मनातील द्वंद्वाचे चित्रण करण्यात आले आहे.
  • ‘सीता स्वयंवरम्’ (१९७६).
७. बंगाली चित्रपटसृष्टी
  • ‘सीता’ (१९३३) - देबकी बोस दिग्दर्शित हा चित्रपट, व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मानित झालेल्या सुरुवातीच्या भारतीय चित्रपटांपैकी एक होता.
  • ‘मेघनाद वध’ - मायकेल मधुसूदन दत्त यांच्या प्रसिद्ध महाकाव्यावर आधारित, विविध नाट्य आणि चित्रपट रूपांतरे करण्यात आली आहेत.
८. ओडिया चित्रपटसृष्टी
  • ‘सीता बिबाह’ (१९३६) - ओडिया चित्रपटसृष्टीतील पहिला बोलपट म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट, पूर्णपणे श्रीराम आणि सीता यांच्या विवाहप्रसंगावरच आधारित होता.
-डॉ. लोकेन्द्र सिंह
(लेखक माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक आहेत.)
 
 




संबंधित मजकूर