मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखनजीकच्या कुंडी गावातील श्री केदारलिंगाच्या देवराईत दुर्मीळ पॅलिड स्कॉप्स घुबड (Pallid Scops Owl) दिसून आले आहे (kundi devrai devrukh ratnagiri). ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे विराज आठले यांना या घुबडाचे दर्शन झाले (kundi devrai devrukh ratnagiri). मध्य आशिया आणि पश्चिम आशियातील काही भागांत प्रजनन करणारे हे घुबड हिवाळ्यात भारताच्या दिशेने स्थलांतर करते (kundi devrai devrukh ratnagiri). त्यामुळे कोकणातील देवराईत त्याचे झालेले दर्शन पक्षीवैविध्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे. (kundi devrai devrukh ratnagiri)
पॅलिड स्कॉप्स घुबडाला मराठीत पांढुरके शिंगळा घुबड म्हटले जाते. हे आकाराने लहान, साधारण २१ ते २२ सेंमी लांबीचे घुबड आहे. याच्या शरीरावर फिकट करड्या रंगाची छटा असून पाठीवर आणि पंखांवर ठळक काळसर रेषा दिसतात. डोक्यावरील लहान कानांसारखी दिसणारी पिसांची रचना हे या घुबडाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. दिसायला हे घुबड स्कॉप्स प्रकारातील इतर घुबडांसारखे असले, तरी शरीरावरील फिकट रंग आणि ठळक रेषांमुळे त्याची ओळख पटते. प्रामुख्याने रात्री सक्रिय असणारे हे घुबड दिवसा झाडांच्या फांद्यांमध्ये किंवा झाडांच्या खोडांमध्ये स्वतःला लपवून बसते. कीटक हे त्याचे प्रमुख खाद्य आहे.
पॅलिड स्कॉप्स घुबडाचा अधिवास मध्यपूर्वेतील देशांपासून पश्चिम आणि मध्य आशियापर्यंत पसरलेला आहे. तुर्कस्तान, इराण, इराक, अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील काही भागांत त्याची नोंद आहे. या प्रदेशांतील काही स्थानिक समूह हिवाळ्यात दक्षिणेकडे स्थलांतर करतात. या स्थलांतरादरम्यान अरबी द्वीपकल्प, इजिप्त, पाकिस्तान आणि भारतातील काही भागांत ते आढळतात. भारतात हिवाळी पाहुणा म्हणून त्याची नोंद उत्तर-पश्चिम भारतापासून महाराष्ट्रापर्यंत झाली आहे. काही नोंदींनुसार त्याचे हिवाळी वितरण मुंबईपर्यंत पोहोचते.
देवराईचे जैवविविधतेतील महत्त्व
कुंडी गावातील देवराई ही केवळ धार्मिक श्रद्धेचे स्थान नसून स्थानिक जैवविविधतेचा महत्त्वपूर्ण अधिवास आहे. गावापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर महिमतगड आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी श्री केदारलिंगची देवराई आहे. स्थानिक देवतेच्या श्रद्धेतून या वनक्षेत्राचे संरक्षण झाल्याने येथील वृक्षसंपदा आणि नैसर्गिक अधिवास टिकून राहण्यास मदत झाली आहे. या परिसरात सस्तन प्राण्यांसह विविध प्रकारच्या वन्यजीवांचे अस्तित्व आढळते. देवराईमध्ये जुन्या वृक्षांची घनता, नैसर्गिक झाडोरा आणि मानवी हस्तक्षेपाचे तुलनेने कमी प्रमाण यामुळे पक्ष्यांना निवारा, विश्रांती आणि खाद्य मिळते. स्थलांतरित पक्ष्यांसाठीही अशा वनक्षेत्रांचे महत्त्व असते. विशेषतः सह्याद्रीच्या परिसरात उरलेली छोटी-छोटी नैसर्गिक वनक्षेत्रे स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांसाठी अधिवासाची बेटे म्हणून काम करतात. पॅलिड स्कॉप्स घुबडाच्या दर्शनामुळे कुंडी येथील देवराईचे पक्षीवैविध्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.