हिंदुस्थानात ‘लादेन फटाका’ कशासाठी?

    14-Nov-2026
 
 

Osama Bin Laden Firecrackers
 
एकीकडे दिवाळीच्या फटाक्यांमुळे होणार्‍या प्रदूषणावरुन रणकंदन माजले असताना, दुसरीकडे सद्दाम हुसेन आणि ओसामा बिन लादेनचे चेहरे असलेल्या फटाक्यांच्या विक्रीचा संतापजनक प्रकारही उघडकीस आला आहे. त्यामुळे अशाप्रकारे लादेन आणि हुसेनचे फोटो वापरुन केले गेलेले हे उद्दात्तीकरणाचे प्रकार अजिबात खपवून न घेता, अशा फटाक्यांचे उत्पादन आणि विक्री करणार्‍या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारायलाच हवा!
 
आपल्या देशात खलनायकांना ‘नायक’ किंवा ‘आदर्श पुरुष’ ठरविण्याचा प्रयत्न आणि अट्टाहास नेहमी होत असतो. अशा प्रयत्नांमधून खलनायकांचे उदात्तीकरण आणि देशासाठी खरे आदर्श असलेल्या नायकांचे पद्धतशीर विस्मरण केले जाते. देशातील काही राजकीय पक्षसुद्धा आपल्या राजकीय फायद्यासाठी अशा खलनायक पात्रांचे समर्थन करून प्रोत्साहन देत असतात. सामाजिक प्रबोधन करणार्‍या संस्था, साहित्य, कला, नाटक, चित्रपटांमधूनसुद्धा असे प्रकार अधूनमधून घडत असतात. महाराष्ट्रातही धर्मांध औरंगजेबापासून अफजलखानाचे उदात्तीकरण सुरू असून, काही राजकीय पक्ष पुढार्‍यांमध्ये त्यासाठीची स्पर्धासुद्धा लागली आहे. आता दिवाळीच्या काळात खलनायकांचे उदात्तीकरण करणारा ‘ओसामा बिन लादेन’ आणि ‘सद्दाम हुसेन’ यांच्या ‘फटाका ब्रॅण्ड’चा संतापजनक प्रकार नुकताच समोर आला आहे.
 
दिवाळीच्या काळात फटाकेविक्रीचा मोठा व्यवसाय असून, फटाके फोडण्याची जुनी परंपरा आहे. पूर्वी तुपाचे दिवे जाळून किंवा शेती वातावरणासाठी पोषक नैसर्गिक बारुद वापरुन फटाके फोडले जात असत. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी शोभेच्या दारूचे फटाके उडवून आनंदोत्सव साजरा केला जात असे. परंतु, कालांतराने चीनने फटाक्यांचा अविष्कार करून पोटॅशियम नायट्रेट, गंधकमिश्रित फटाके बाजारात आणले. तरुणांमध्ये आतषबाजी करणार्‍या फटाक्यांच्या आकर्षणामुळे दिवाळीच्या काळात देशात फटायांची प्रचंड प्रमाणात विक्री होत असते. परंतु, फटाका कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी ओसामा बिन लादेन आणि सद्दाम हुसेन यांच्या नावाने ‘फटाके ब्रॅण्ड’ तयार करून भारतात विक्री करणे, ही भयंकर बाब म्हणावी लागेल. कारण, हिंदुस्थानचा आणि लादेन, सद्दाम हुसेनशी कुठलाही संबंध नाही. उलट, लादेनच्या ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेने काश्मीर खोर्‍यात निरपराध माणसांचा रक्तपात करणार्‍या दहशतवाद्यांना मदतच केलेली आहे, हे ढळढळीत सत्य!
 
आपल्या देशात फटाका उत्पादन उद्योगाचे नियमन व परवाना नियंत्रण वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि फटाक्यांची विक्री करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून किंवा सक्षम परवाना प्राधिकरणाकडून परवाना घेणे आवश्यक असते. मग लादेन, सद्दामच्या फोटोंचे वेष्टन किंवा आवरण लावून फटाक्यांचे ‘ब्रॅण्डिंग’ आणि विक्री करताना फटाका व्यवसायाचे नियमन करणार्‍या शासकीय यंत्रणा, संस्था झोपल्या होत्या का? तसेच ‘लादेन’ आणि ‘सद्दाम हुसेन’ फटाक्यांचे ‘ब्रॅण्डिंग’ व विक्री करणार्‍या कंपन्या पाकिस्तानी टँक फोडणारे ‘परमवीर’ अब्दुल हमीद यांचे ‘ब्रॅण्डिंग’ का करीत नाहीत, असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याशिवाय राहत नाही.
 
वाईट प्रवृत्तीचा उदो उदो कितपत योग्य?
 
‘लादेन फटाक्या’च्या निमित्ताने ओसामा बिन लादेन कोण होता आणि त्याची हिंदुस्थानविषयी काय भूमिका होती, हे लक्षात घेणे क्रमप्राप्त ठरावे. लादेन हा जगातील कुख्यात दहशतवादी संघटना ‘अल कायदा’चा संस्थापक आणि प्रमुख होता. अमेरिकेतील दि. ११ सप्टेंबर २००१च्या दहशतवादी हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. हल्ल्यात जवळपास तीन हजार लोकांचा मृत्यू झाला होता. ओसामा बिन लादेनचे काश्मीरमधील दहशतवादी गटांशी संबंध, प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीचे आंतरराष्ट्रीय जाळे होते आणि ते अनेकवेळा सिद्धसुद्धा झाले होते. दि. २ मे २०११ रोजी अमेरिकेच्या विशेष सैन्याने त्याच्या पाकिस्तानस्थित अबोटाबाद निवासस्थानावर कारवाई केली होती.झालेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला. भविष्यात त्याचे उदात्तीकरण होऊ नये, म्हणून अमेरिकन सैन्याने ओसामा बिन लादेनचा मृतदेह दफनविधी करून अरबी समुद्रात गाडला होता. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा होते. वास्तविक पाहता, ‘अल कायदा’ आणि ओसामा बिन लादेन ज्याप्रमाणे अमेरिकेचे शत्रू होते, त्याचप्रमाणे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही ते शत्रूच होते. त्यामुळे फटाक्यांच्या स्वरूपातसुद्धा आंतरराष्ट्रीय दहशतवादी व्यक्तीचे उदात्तीकरण करणे, कितपत योग्य आहे? लादेनचे उदात्तीकरण करणार्‍या फटाका कंपन्या, पाकिस्तानी टँक फोडणार्‍या ‘परमवीर’ अब्दुल हमीद यांच्या स्मरणार्थ उत्पादन का करीत नाहीत?
 
मग ‘परमवीर’ अब्दुल हमीद का आठवत नाहीत?
 
आपल्या देशात सेक्युलर, राजकीय पक्ष आणि अनेक कंपन्या हिंदुस्थानचे खलनायक असलेल्या व्यक्तीचे उदात्तीकरण करीत असतात. पण, देशाच्या खर्‍या नायकांचे उदात्तीकरण किंवा स्मरण त्यांना पचनी पडत नाही. ‘परमवीर’ अब्दुल हमीद या देशाचे खरे आदर्श व नायक असून, त्यांचे स्मरण केले जात नाही. ‘परमवीरचक्र’ विजेते अब्दुल हमीद हे १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारतीय सैन्याचे अत्यंत शूर सैनिक होते. पाकिस्तानच्या ‘पॅटन’ रणगाड्यांना उद्ध्वस्त करण्याच्या पराक्रमामुळे ते हिंदुस्थानच्या इतिहासात आणि लष्करी क्षेत्रात अजरामर झालेले आहेत. अब्दुल हमीद यांचा पराक्रम हा भारतीय सैन्याच्या इतिहासातील शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान यांचे प्रतीक मानले जाते. समोर पाकिस्तानचे सैनिक उभे असताना ‘परमवीर’ अब्दुल हमीद यांनी धर्मापेक्षा राष्ट्रसेवा आणि राष्ट्राच्या सुरक्षेला सर्वोच्च स्थान दिले होते. भारत सरकारने सर्वोच्च युद्धकालीन शौर्यपदक म्हणजे, ‘परमवीरचक्र’ त्यांना बहाल केले होते. उत्तर प्रदेशातील धामुपूर, जिल्हा गाझीपूर येथे त्यांचे स्मारक असून, ते देशाला राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रसुरक्षेची प्रेरणा देते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
 
टागोरांचा अपमान व लादेनचे उदात्तीकरण!
 
आपल्या देशात दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या माध्यमातून खलनायकांचे उदात्तीकरण होत असताना, बांगलादेशात प्रसिद्ध साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेवर शाईफेक करून त्यांचा अपमान करण्याचा निंदनीय प्रकार ढाका येथे घडला आहे. यापूर्वीदेखील तेथे भारतीय प्रतीकांचा सतत अपमान झालेला आहे. बांगलादेशी नागरिकांना ‘नोबेल’ पुरस्कारप्राप्त जागतिक पातळीवरील खरे नायक रवींद्रनाथ टागोर यांचा सन्मान मान्य नाही. परंतु, आपल्या देशात खलनायकांचे उदात्तीकरण कसे होऊ शकते? त्यामुळे भारतात फटाका व्यवसायात ओसामा बिन लादेन आणि सद्दाम हुसेनच्या फटाका ब्रॅण्ड निर्मिती व विक्रीची चौकशी झाली पाहिजे आणि भविष्यात खलनायकांचे उदात्तीकरण होणार नाही, याची काळजी घेणारी यंत्रणा कठोरपणे मजबूत केली पाहिजे.
 
-अशोक राणे
९४२३६५८३८५
 
 




संबंधित मजकूर