sindhudurg - आंबोलीतून ऑर्किडच्या नव्या प्रजातीचा शोध

    14-Nov-2026
amboli sindhudurg


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या अमरी म्हणजेच ऑर्किडच्या जैवविविधतेत भर घालणारा शोध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात लावण्यात आला आहे (amboli sindhudurg). ऑर्किड कुळातील वनस्पतीची एक नवीन प्रजाती संशोधकांनी शोधून काढली असून तिचे नामकरण ‘लिपॅरिस प्रिमोर्सा’ (Liparis praemorsa) असे करण्यात आले आहे (amboli sindhudurg). मराठीत या कुळातील ऑर्किडला उजळपर्ण असे म्हणतात. महत्त्वाचे म्हणजे आंबोलीतून शोधण्यात आलेली ही २६ वी नवीन जीव प्रजात आहे. (amboli sindhudurg)
 
 
‘लिपॅरिस प्रिमोर्सा’ ही वनस्पती ऑर्किड कुळातील असून ती खडकांवर वाढणारी (Lithophyte) आहे. या प्रजातीचा शोध प्रा. विजय पैठणे यांच्यासह समीर पाटील, आलोक चोरघे आणि ए. एस. भुक्तर यांनी लावला आहे. या संशोधनाचे वृत्त ‘नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी’ या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनासाठी आंबोलीतील हिरण्यकेशी परिसरातून १४ जुलै २०२४ रोजी वनस्पतीचा नमुना संकलित करण्यात आला. समुद्रसपाटीपासून ८५० ते ९०० मीटर उंचीवर आढळलेल्या या वनस्पतीचा नमुना शास्त्रीय अभ्यासासाठी प्रमाणित करण्यात आला. या प्रजातीची नोंद केवळ आंबोलीपुरती मर्यादित नसून सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील तिलारीनगर–स्वप्नवेल व्ह्यू पॉइंट रस्ता परिसर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथेही करण्यात आली आहे.
 
 
नव्याने शोधलेल्या या वनस्पतीची उंची साधारणतः २२.५ ते २८.५ सेंटीमीटर आहे. तिच्या फुलांचा रंग पिवळा, हिरवट-पिवळा किंवा तपकिरी असून ओठासारख्या दिसणाऱ्या पाकळीसदृश भागाच्या (Labellum) कडा दंतुर आहेत. या भागाच्या टोकाचा आकार चावून तुटल्यासारखा दिसतो. याच वैशिष्ट्यावरून या प्रजातीला ‘प्रिमोर्सा’ हे नाव देण्यात आले आहे. जून ते सप्टेंबर हा या वनस्पतीचा फुलण्याचा आणि फळधारणेचा कालावधी आहे.
 
 
आंबोलीचे महत्व
सांवतवाडी तालुक्यात ५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रावर आंबोली गाव विस्तारले आहे. या गावाचा परिसर जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट आहे. कारण, उत्तर आणि मध्य पश्चिम घाटाला जोडणारा हा भाग असल्याने या ठिकाणी दक्षिण भारतातील प्रजाती मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे येथील जैवविविधता समृद्ध आहे. एवढ्या छोट्याशा भागामधून २००५ पासून २६ नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. या नव्या प्रजातींमध्ये काही साप, उभयचर, खेकडे, कोळी आणि स्काॅरपियन प्रजातीबरोबरच 'शिस्टुरा हिरण्यकेशी' या माशाचाही समावेश आहे. या गावामध्ये शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसास्थळ असून येथील वनक्षेत्राचा समावेश आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये होतो.
 
 
संशोधनाचे महत्त्व
या संशोधनाचे महत्त्व केवळ एका नव्या प्रजातीच्या शोधापुरते मर्यादित नाही. ‘लिपॅरिस ओडोराटा’ या प्रजाती समूहातील वनस्पतींच्या वर्गीकरणाबाबत अनेक वर्षांपासून संभ्रम होता. काही वनस्पतींची चुकीची ओळख आणि जुन्या वनस्पतीशास्त्रीय नोंदींच्या वेगवेगळ्या अर्थांमुळे हा गोंधळ निर्माण झाला होता. क्षेत्रीय सर्वेक्षण, देशातील आणि परदेशातील वनस्पती संग्रहालयांमधील नमुन्यांचा अभ्यास तसेच ऐतिहासिक संशोधन साहित्याच्या तुलनात्मक विश्लेषणातून संशोधकांनी हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या अभ्यासातून नव्या प्रजातीचे वर्णन करण्याबरोबरच काही प्रजातींचे वर्गीकरण आणि शास्त्रीय नामकरणही नव्याने निश्चित करण्यात आले आहे.




संबंधित मजकूर