‘रामायण’चा भव्य अविष्कार ते ‘आदि अनंत’चा भावस्पर्शी प्रवास!

    14-Nov-2026
 
 
Mahesh Limaye Interview
 
‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून कॅमेर्‍याच्या मागे आणि दिग्दर्शक म्हणून कथेच्या केंद्रस्थानी असलेले महेश लिमये यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘हिरामंडी’ यांसारख्या भव्य कलाकृतींचा अनुभव घेताना, ‘रामायण’सारख्या महाकाव्याला जागतिक सिनेमॅटिक रूप देण्याचे आव्हान त्यांनी लीलया पेलले आहे. दुसरीकडे, ‘आदि अनंत’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी नात्यांमधील भावविश्व, बदलती पिढी आणि संवाद हरवत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेचा संवेदनशील वेध घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतचा अनुभव, मराठी चित्रपटसृष्टीसमोरील आव्हाने, उत्तम कथांचे महत्त्व, चित्रपटांचे मार्केटिंग आणि आगामी प्रकल्प अशा अनेक विषयांवर महेश लिमये यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद!
  • एकीकडे ‘रामायण’सारख्या भव्य चित्रपटाला मिळणारी प्रशंसा आणि दुसरीकडे ‘आदि अनंत’ हा एका संवेदनशील विषयावरील चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तेव्हा, या दोन्ही चित्रपटांविषयी काय सांगाल?
‘रामायण’ हे आपलं महाकाव्य. लहानपणापासूनच रामायणाचे संस्कार आपल्या सगळ्यांवर होत असतात. आपण नेहमी रामराज्याबद्दल बोलतो. प्रभू श्रीराम म्हणजे शांतता आणि संयमाचं एक मोठं उदाहरण, तर रावण विद्वान असूनही त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अहंकाराची किनार आहे. अशा महाकाव्यावर आधारित भव्य चित्रपटाचा भाग होता आलं, ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. मी याआधीही अनेक ‘अ‍ॅक्शनपट’ केले आहेत. ‘दबंग’पासून गेली १५-१६ वर्षं अ‍ॅक्शनच्या क्षेत्रात काम करतोय; मात्र ‘रामायण’मधील ‘अ‍ॅक्शन’चा अनुभव पूर्णपणे वेगळा होता. हॉलीवूडमधील उत्कृष्ट अ‍ॅशन दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक दृश्यासाठी प्रचंड मेहनत आणि नियोजन होतं. काही सिक्वेन्स तीन-सहा महिने, तर काहींची तयारी दोन-अडीच वर्षे सुरू होती. एवढ्या मोठ्या स्तरावर काम करण्याची मजा काही वेगळीच असते.
 
दुसरीकडे ‘आदि अनंत’ हा भावनांनी समृद्ध असा चित्रपट आहे. यात नातेसंबंधांवर भाष्य करणारे नाट्य आहे. संकर्षण कर्‍हाडे यांचं लेखन आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांना नक्कीच भावेल. हा चित्रपट केवळ मनोरंजन करणार नाही, तर प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणून त्यांच्या मनात घरही करेल, असा मला विश्वास आहे.
  • ‘आदि अनंत’मध्ये अशोक सराफ यांचा एक वेगळाच पैलू पाहायला मिळणार आहे. त्यांनी इतकी वर्षे प्रेक्षकांना हसवलं; मात्र आता प्रेक्षकांना रडवण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले होते. त्यांना या भूमिकेसाठी कसं तयार केलं?
अशोकमामा म्हणजे जणू क्रिकेटमधले सचिन तेंडुलकरच! इतक्या वर्षांचा अनुभव असूनही त्यांच्यात काम करण्याची जी ऊर्जा आहे, ती थक्क करणारी आहे. एखादा कलाकार अनेक वर्षे काम केल्यानंतर काहीसा निवांत होऊ शकतो; पण मामांमध्ये मला पहिल्यांदाच काम करणार्‍या कलाकाराचा उत्साह दिसला.ते ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. तरीही सकाळी ठरलेल्या वेळेच्या आधी सेटवर येऊन तयार असायचे. पहिल्याच दिवशी त्यांनी मला सांगितलं, "तुला हवं ते कर. तुला स्क्रिप्ट जास्त माहीत आहे.” त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. चांगलं लेखन असेल, तर अशोकमामांसारखे कसलेले कलाकार अशी संधी स्वीकारण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. एका महत्त्वाच्या दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्या नखाला दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला. मला वाटलं, आता शूटिंग थांबवावं लागेल. डॉक्टरांना बोलावलं, त्यांच्यावर उपचार झाले, बॅण्डेज केलं; पण ते पुन्हा शूटिंगसाठी तयार झाले. ते जवळपास साडेसात मिनिटांचे महत्त्वाचे दृश्य होते. कामाप्रति त्यांचं एवढं समर्पण खरंच शिकण्यासारखं आहे.
  • ‘आदि अनंत’ हा चित्रपट दोन पिढ्यांमधील नातं समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आजच्या काळात कुटुंबातील संवाद कुठेतरी हरवत चाललेला दिसतो. याकडे तुम्ही कसं पाहता?
निश्चितच! आजच्या काळात हा प्रश्न प्रत्येकाला जाणवत असेल. पूर्वी आपण एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलायचो. आता मित्रांना समाजमाध्यमावर मेसेज केला, एखाद्या पोस्टला लाईक केलं की आपण संपर्कात आहोत, असं आपल्याला वाटतं. पण, प्रत्यक्षात अनेक महिने, वर्षे आपलं एकमेकांशी बोलणंही होत नाही. आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. घरचे लोक, मित्र, आपण जिथे काम करतो, त्या ठिकाणची माणसं, या सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणं महत्त्वाचं आहे. एकमेकांचा हात धरून पुढे गेलात, तर तुम्ही अधिक मोठे व्हाल. इतरांना मागे टाकून पुढे जाण्यात फारसा अर्थ नाही. संकर्षणचं ‘कुटुंब कीर्तन’ हे नाटकही याच विचारावर आधारित आहे.
  • संकर्षण कर्‍हाडे यांचं लेखन तुम्हाला या चित्रपटासाठी विशेष भावलं. त्यांच्या आजोबांसोबतच्या नात्याचा अनुभव या कथेत उतरला आहे. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला दिग्दर्शन करण्याची प्रेरणा कशी मिळाली?
आपण नेहमीच चांगल्या कथेच्या शोधात असतो. संकर्षणने ही कथा जगली आहे. त्याने आपल्या आजोबांसोबत जे नातं अनुभवलं, ते या कथेत उतरवलं आहे. एखादी गोष्ट तुम्ही स्वतः अनुभवली असेल, तरच तिच्यावर मनापासून लिहू शकता. ही कथा ऐकत असताना मलाही माझे वडील आठवले. माझे वडील हे माझे सर्वांत जवळचे मित्र होते. त्यामुळे संकर्षण आणि त्याच्या आजोबांचं नातं ऐकताना मला माझे बाबा दिसत होते. त्यांच्यासोबतचा संवाद, मैत्री आणि भावनिक बंध मला या कथेत जाणवले. संकर्षणचं लेखन अतिशय सुंदर आहे. अर्थात, ‘फीचर फिल्म’ करताना काही बदल करावे लागतात. पात्रांचा आलेख, त्यांचा प्रवास, कथेतले चढ-उतार यांचा विचार करावा लागतो. शेवटी आपण चित्रपट प्रेक्षकांसाठी बनवत असतो. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे प्रसंगही आवश्यक असतात. माझ्या मते, ‘आदि अनंत’ ही मुरलेल्या लोणच्यासारखी किंवा मुरलेल्या मुरांब्यासारखी कलाकृती आहे. ती हळूहळू चढत जाते आणि शेवटी प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देते. कथेतच ते सामर्थ्य आहे.
  • तुम्ही १९९४ मध्ये जाहिरात क्षेत्रातून कारकिर्दीला सुरुवात केली. २००३ मध्ये स्वतंत्रपणे पहिला चित्रपट केला. ‘सिनेमॅटोग्राफर ते दिग्दर्शक’ हा प्रवास कसा राहिला?
माझी संपूर्ण जडणघडण जाहिरात क्षेत्रात झाली. १९९४ मध्ये मी कामाला सुरुवात केली. त्यानंतर २००३ मध्ये पहिला चित्रपट स्वतंत्रपणे शूट केला. त्याआधी मी कोणाकडे ‘असिस्टंट’ म्हणूनही काम केलेलं नव्हतं. २००३ पासून २०२६ पर्यंत मी १३-१४ हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याहून अधिक मराठी चित्रपट केले आहेत. या प्रवासात अनेक दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांकडून शिकायला मिळालं. संजय लीला भन्साळी सरांसोबत काम करणं, हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’मधील ‘अ‍ॅशन सिक्वेन्स’ आणि ‘हिरामंडी’मधील काही भागांवर काम करताना खूप काही शिकायला मिळालं.
भन्साळी सरांकडून शिकलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चित्रपटनिर्मिती ही केवळ दिग्दर्शनापुरती मर्यादित नसते. कलाकारांना काय बोलायचं, कोणता भाव द्यायचा, हे सांगण्यापलीकडे जाऊन एडिटिंग, लूक, फील, बॅकग्राऊंड स्कोअर, संगीत या सगळ्यांचा एकत्रित विचार करावा लागतो. चित्रपट हा संपूर्ण टीमचा प्रयत्न असतो.
  • मराठी चित्रपटसृष्टीतील आशयाबद्दल नेहमीच बोललं जातं. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना मराठी सिनेमाच्या आशयाची ताकद किती जाणवते?
मराठी चित्रपटांमध्ये आशयाची ताकद खूप मोठी आहे. माझे हिंदीतील अनेक मोठे दिग्दर्शक मला नेहमी विचारतात, ‘कुछ अच्छा हैं या’, ‘कोई अच्छी स्टोरी हैं तो बताओ|’ कारण, हिंदी चित्रपटसृष्टीत आशयप्रधान चित्रपटांचं प्रमाण तुलनेने कमी होत चाललं आहे. आपल्याकडे साहित्याचा प्रचंड मोठा खजिना आहे. आपले विचार प्रगल्भ आहेत. त्या विचारांना आपण चित्ररूप दिलं, तर ५०-१०० चित्रपट बनवले, तरी ते कमीच पडतील. मराठी चित्रपटांना महाराष्ट्राबाहेरही मोठा प्रेक्षकवर्ग आहे. ‘आदि अनंत’ हा चित्रपट महाराष्ट्रासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूके आणि अमेरिकेतही प्रदर्शित होत आहे. परदेशात राहणार्‍या मराठी प्रेक्षकांनाही आपले चित्रपट पाहण्याची इच्छा असते. त्यामुळे आपला आशय जगभर पोहोचवणं महत्त्वाचं आहे.
  • मराठी चित्रपटांना चांगला आशय असूनही अनेकदा आर्थिक पाठबळ आणि मार्केटिंगच्या बाबतीत मर्यादा जाणवतात. यामुळे चित्रपटसृष्टीच्या प्रगतीवर परिणाम होतो का?
नक्कीच! प्रत्येक निर्मात्याची आर्थिक क्षमता वेगळी असते. चित्रपटासाठी कितीही पैसा खर्च केला, तरी तो कमीच पडतो, असं आजच्या काळात वाटतं. चित्रपटाचं बजेट, मार्केटिंग, प्रमोशन या सगळ्या गोष्टींसाठी आर्थिक पाठबळ आवश्यक आहे. याबाबतीत रितेश देशमुख यांचं विशेष कौतुक करावंसं वाटतं. त्यांनी ‘राजा शिवाजी’सारखा मोठ्या पातळीवरचा चित्रपट केला आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न केला. त्याचप्रमाणे प्रवीण तरडे यांनी ‘देऊळ बंद’सारख्या चित्रपटाची मांडणी आणि त्याचं प्रमोशनही प्रभावीपणे केलं. आज समाजमाध्यमांपासून ते वेगवेगळ्या माध्यमांपर्यंत प्रेक्षकांशी जोडणं आवश्यक आहे. मात्र, केवळ प्रमोशन करून उपयोग नाही, तर चित्रपटात आशयघन कथा आणि मनोरंजन यांचा समतोलही असला पाहिजे. प्रेक्षकांनी आयुष्यभर लक्षात ठेवावी, अशी गोष्ट चित्रपटात असणं गरजेचं आहे.
  • ‘रामायण’सारख्या भव्य महाकाव्याचा भाग होणं, ही एक भारतीय आणि मराठी माणूस म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. जगभरातून या चित्रपटाचं कौतुक होत असताना काय भावना आहेत?
काय सांगू! मला अगदी जगभरातून संदेश येतात. अनेकजण चित्रपटातील माझं नाव पाहून स्क्रीनशॉट पाठवतात. त्यांचे संदेश वाचताना मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते. त्यांना मला पडद्यावर पाहायला खूप आवडायचं. माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली, मी स्वतंत्रपणे काम करू लागलो आणि त्यानंतर ते गेले. आज जेव्हा कोणी संदेश पाठवतं की, ‘तुझा या सुंदर आणि अप्रतिम चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान वाटतो,’ तेव्हा मला वडिलांची आठवण येते. लहानपणापासून कॅमेरा हातात घेण्याचं, शूटिंग करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मी स्वप्नाळू माणूस आहे. आयुष्यात खूप संयम ठेवला आणि अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आज हे स्वप्न पूर्ण होत आहे. मला मराठी असल्याचा विशेष अभिमान आहे. आपल्या मातीत अनेक उत्तम तंत्रज्ञ घडले. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं आहे. ‘रामायण’सारख्या महाकाव्याचा एक छोटासा भाग होता आलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
  • ‘हंबीरराव’, ‘राजा शिवाजी’, ‘दबंग’ यांसारख्या चित्रपटांमधून तुमच्या कॅमेर्‍याने इतिहास आणि भव्यता वेगळ्या पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडली. दिग्दर्शक तुमच्यावर विश्वास ठेवतात. त्या विश्वासाचं रहस्य काय?
प्रत्येक दिग्दर्शकाचं स्वतःचं एक ‘व्हिजन’ असतं. त्याने लिहिलेली गोष्ट शक्य तितक्या सुंदर पद्धतीने चित्ररूपात उतरवणं आणि त्याची कथा पुढे घेऊन जाणं, हा माझा प्रयत्न असतो. मला माझा मोठेपणा दाखवायचा नसतो. दिग्दर्शकाची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचेल, याचा विचार मी करतो. दिग्दर्शकाचा माझ्यावर विश्वास असतो. त्याला काय हवं आहे, हे मला समजून घ्यावं लागतं. ‘हंबीरराव’ चित्रपटात एखादं दृश्य अधिक प्रभावी व्हावं, म्हणून आम्ही सूर्यास्ताची वाट पाहिली. अशा प्रसंगांमध्ये संयम महत्त्वाचा असतो. कारण, शेवटी प्रेक्षकांना पडद्यावर काय दिसणार आहे, हेच महत्त्वाचं असतं.
  • तुमच्यातील ‘सिनेमॅटोग्राफर’ आणि दिग्दर्शक यांच्यात कधी संघर्ष होतो का? कॅमेर्‍यामागचा महेश कधी दिग्दर्शकाच्या ‘व्हिजन’वर वरचढ ठरतो का?
अशा वेळी मी माझ्या ‘डीओपी’ला, म्हणजे सिनेमॅटोग्राफरला नेहमी मागे खेचत असतो. कारण, दिग्दर्शकाचं ‘व्हिजन’ महत्त्वाचं असतं. मला एखादं दृश्य कुठल्या कोनातून छान दिसेल, हे माहीत असतं; पण दिग्दर्शकाला ते वेगळ्या पद्धतीने मांडायचं असेल, तर त्यामागचं कारण समजून घेणं, गरजेचं असतं. मी नेहमीच बरोबर असतो, असं नाही. दिग्दर्शकही खूप छान कल्पना घेऊन येतात. त्या कल्पना समजून घेऊन, त्यांना आणखी पुढे नेणं, हीच ‘फिल्ममेकिंग’ची मजा आहे. दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं, तर उत्तम कलाकृती निर्माण होऊ शकते.
  • ‘आदि अनंत’सारखा वेगळा विषय स्वीकारताना दिग्दर्शक म्हणून तुम्हाला स्वतःला कोणतं आव्हान जाणवलं?
मी नेहमीच स्वतःला काहीतरी नवीन आव्हान देत असतो. स्वतःला आव्हान दिलं नाही, तर आयुष्यात मजा नाही. एखादी कथा मला मनापासून पटली आणि तिच्यावर काम करण्याची इच्छा झाली, तरच मी ती स्वीकारतो. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, आमचे निर्माते समीर हम्पी. गेली २५ वर्षे ते नाट्यक्षेत्रात काम करत आहेत. अगदी तिकीट खिडकीवर तिकीट फाडण्यापासून त्यांनी सुरुवात केली. आजही गरज पडली, तर ते तिथे बसतात. त्यांनी स्वतःच्या कष्टाचा पैसा या चित्रपटात गुंतवला आहे. त्यांनी संकर्षणच्या लेखनावर आणि आमच्या ‘व्हिजन’वर विश्वास ठेवला.
 
अशोकमामांसारख्या ज्येष्ठ कलाकारांनीही या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली. अलीकडच्या स्क्रीनिंगनंतर मामांनी माझा हात धरून मिठी मारली. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि चित्रपटाबद्दलचा विश्वास पाहून खूप समाधान वाटलं. शेवटी ही संपूर्ण टीमची मेहनत आहे.
 
(मुलाखत : कपिल देशपांडे)
 
 




संबंधित मजकूर