ठाणे (Milapnagar Lake Dombivli): दिवाळीनंतर पुन्हा एकदा अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेल्या डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील मिलापनगर तलावाची अखेर स्वच्छता करण्यात आली आहे. तलावाच्या दुरवस्थेबाबत दैनिक ‘मुंबई तरुण भारत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच केडीएमसी प्रशासनाने तातडीने दखल घेत सफाई मोहीम राबवली. तलाव परिसरातील निर्माल्य, प्लास्टिक, फटाक्यांचा कचरा, देवदेवतांच्या मूर्ती, दिवंगत व्यक्तींचे फोटो, पणत्या आणि नारळ हटविण्यात आले. त्यामुळे तलाव परिसर पुन्हा स्वच्छ आणि कचरामुक्त झाला आहे.
दिवाळीनंतर मिलापनगर तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. धार्मिक साहित्य, निर्माल्य आणि फटाक्यांच्या अवशेषांमुळे तलावाच्या परिसराचे विद्रूप स्वरूप झाले होते. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने तलावावर पाठवून संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. विशेष म्हणजे, पुढील काही दिवस तलावावर देखरेख ठेवण्यासाठी दिवसा एका सफाई कर्मचाऱ्याची नियुक्तीही करण्यात आली आहे. (Milapnagar Lake Dombivli)
मात्र, माध्यमांतून बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येते, हा यापूर्वीचाही अनुभव असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांची स्वच्छता न करता तलावाच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्याची मागणी मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनने केली आहे. (Milapnagar Lake Dombivli)
तलावावर देखरेखीसाठी दिवसा कायमस्वरूपी एक कंत्राटी सफाई कर्मचारी नियुक्त करावा.
तलावात कारंजे किंवा पंपाद्वारे पाण्याचे अभिसरण (वॉटर एरेशन) करावे. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.
तलावातील पाण्याचा वापर जवळील वंदे मातरम् उद्यान, शैलगंगा मिलापनगर शहरी वन प्रकल्प आणि इतर बिगरपिण्याच्या कामांसाठी करण्याचा विचार करावा. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होण्यास मदत होईल.
तलावाच्या देखभालीची जबाबदारी मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन किंवा रोटरी क्लबसारख्या संस्थेकडे सोपविण्याचा विचार करावा. (Milapnagar Lake Dombivli)
स्वच्छता झाली, आता कायमस्वरूपी देखभालीचे काय?
प्रशासनाने तातडीने केलेल्या स्वच्छतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी तलावाची स्वच्छता केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तलावाचे पर्यावरण, पाण्याची गुणवत्ता आणि परिसरातील जीवसृष्टी अबाधित ठेवत दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासन आता या सहा मागण्यांबाबत काय निर्णय घेते, याकडे मिलापनगरवासीयांचे लक्ष लागले आहे. (Milapnagar Lake Dombivli)