नवी दिल्ली (Godhra Train Burning Case Sonia Gandhi Book) : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी २००२ मधील गोध्रा रेल्वे जळीतकांडाचे कारण अद्याप वादग्रस्त असल्याचा उल्लेख ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. मात्र, हा उल्लेख पूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगत गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाचे तत्कालीन प्रमुख राकेश अस्थाना यांनी तो फेटाळला आहे. या घटनेचा तपास पूर्ण झाला असून, न्यायवैद्यकीय पुरावे आणि स्वतंत्र साक्षीदारांच्या जबाबांतून आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
दि. २७ फेब्रुवारी २००२ रोजी अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला गोध्रा रेल्वेस्थानकाजवळ आग लावण्यात आली होती. या घटनेत ५९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २७ महिला, १० मुले आणि २२ पुरुषांचा समावेश होता. डब्यातून बाहेर पडता न आल्याने अनेकांचा आतच मृत्यू झाला, असे अस्थाना यांनी सांगितले. काही प्रवासी डब्यातून बाहेर उडी मारून बचावण्याचा प्रयत्न करत असताना जमावाने त्यांचा पाठलाग करून मारहाण केल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे ही केवळ अपघाती आग होती आणि जमावाकडून हिंसा झालीच नाही, असे म्हणणे तपासाशी विसंगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Godhra Train Burning Case Sonia Gandhi Book)
न्यायवैद्यकीय पुराव्यांचा आधार
आगीचे कारण निश्चित करण्यासाठी जळालेल्या डब्याची आणि परिसराची न्यायवैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्वलनशील द्रवपदार्थाचा वापर करून आग लावण्यात आल्याचे तपासात समोर आले. स्वतंत्र साक्षीदारांच्या जबाबांनीही या निष्कर्षाला पुष्टी दिली. न्यायालयात दोषसिद्धी होण्यात या पुराव्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे अस्थाना यांनी नमूद केले. त्यांच्या मते, केवळ कबुलीजबाबांवर नव्हे, तर प्रामुख्याने न्यायवैद्यकीय पुराव्यांवर खटला उभा होता. (Godhra Train Burning Case Sonia Gandhi Book)
दहशतवादी संघटनेचे धागेदोरे; मात्र पुरावे अपुरे
तपासादरम्यान काही दहशतवादी संघटनेशी संबंधित धागेदोरे समोर आले होते. अमन गेस्ट हाऊसचे मालक अब्दुल रझाक ‘कुरकुर’ याची चौकशी करण्यात आली. गेस्ट हाऊसची नोंदवही आणि दूरध्वनी नोंदी तपासल्या असता पाकिस्तानमधून तेथे काही दूरध्वनी आले असल्याचे आढळले. घटनेच्या काही दिवस आधी हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित काही व्यक्ती तेथे राहिल्याची माहितीही मिळाल्याचे अस्थाना यांनी सांगितले. मात्र, या दहशतवादी संघटनेशी संबंध सिद्ध करणारे खटला चालवण्यायोग्य पुरावे मिळाले नसल्याने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमागे कट, नियोजन आणि पूर्वतयारी होती, असा त्यांचा दावा आहे. (Godhra Train Burning Case Sonia Gandhi Book)
बॅनर्जी समितीच्या निष्कर्षांवरही आक्षेप
२००४ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी न्यायमूर्ती यू.सी. बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने प्राथमिक अहवालात आग अपघाताने लागल्याचा निष्कर्ष मांडला होता. कारसेवकांकडे असलेल्या स्टोव्हमुळे आग लागल्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या समितीच्या स्थापनेला गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. १३ ऑक्टोबर २००६ रोजी उच्च न्यायालयाने समितीची स्थापना आणि त्यानंतरची कारवाई रद्द केली होती. अस्थाना यांनी या समितीच्या निष्कर्षांवरही प्रश्न उपस्थित केले. (Godhra Train Burning Case Sonia Gandhi Book)
मोदींकडून दबाव नसल्याचा दावा
तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून तपासावर कोणताही राजकीय दबाव नव्हता, असे अस्थाना यांनी सांगितले. तपास पथकात मुस्लिम अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची विनंती केल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले. या अधिकाऱ्यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दंगलीशी संबंधित बंद करण्यात आलेल्या प्रकरणांचा पुन्हा तपास करण्यात आला आणि सुमारे ७५० जणांना नव्याने अटक करून आरोपपत्रे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या तपासाच्या अनुभवात तत्कालीन राज्य सरकारकडून हस्तक्षेप किंवा संगनमत आढळले नसल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, गोध्रा परिसरात त्या काळात रॉ आणि गुप्तचर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. देश अस्थिर करण्याच्या व्यापक कटाचा संशय होता; मात्र त्यामागील संपूर्ण योजना उघड करण्यात यश आले नाही, असे अस्थाना यांनी मुलाखतीत सांगितले. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातील उल्लेख आणि अस्थाना यांचे स्पष्टीकरण यामुळे गोध्रा जळीतकांडाच्या तपासाविषयीचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. (Godhra Train Burning Case Sonia Gandhi Book)