मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वपूर्ण दुवा असलेल्या घोडाझरी वन्यजीव अभयारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे (ghodazari wildlife sanctuary). मात्र, ब्रह्मपुरी वनविभागातील तीव्र मानव-व्याघ्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अभयारण्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (ghodazari wildlife sanctuary)
दि. ३१ जानेवारी २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘राज्य वन्यजीव मंडळा’च्या १३व्या बैठकीत घोडाझरीला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. दि. २३ मार्च २०१८ रोजी या अभयारण्याच्या घोषणेची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाली. ब्रह्मपुरी वनविभागातील नागभीड, तळोधी आणि चिमूर वनपरिक्षेत्र मिळून १५९ चौ.किमी क्षेत्रावर हे अभयारण्य पसरलेले आहे. मात्र, या अभयारण्याचे महत्त्व केवळ या क्षेत्रापुरताच मर्यादित नसून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि ब्रह्मपुरी-गडचिरोलीच्या वनप्रदेशाशी संबंधित मोठ्या वन्यजीव अधिवासाचा भाग आहे. याठिकाणी तीन वाघ, चार वाघिणी आणि चार निमवयस्क वाघांचा वावर नोंदविण्यात आला आहे. या अभयारण्याला नागभीड-सिंदेवाही रस्ता छेदून जातो. त्यामुळे याठिकाणी वाघांच्या सुलभ भ्रमणासाठी ७५० आणि ३०० मीटरच्या दोन अंडरपासची उभारणी सुरू आहे. सद्यपरिस्थितीत या अभयारण्याचा ताबा ब्रह्मपूरी प्रादेशिक वनविभागाकडे आहे. या अभयारण्यामुळे कोणत्याही गावाचे पुनर्वसन होणार नाही. ब्रह्मपुरी वनविभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अभयारण्याचा ताबा वन्यजीव विभागाकडे देण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात असून काही बाबींविषयी स्पष्टता अजूनही समोर आलेली नाही.
अभयारण्याच्या क्षेत्रातील सर्व बांधकाम वन्यजीव विभागाच्या ताब्यात देण्यात येणार असून या जागेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी लागणारे वनकर्मचार्यांचे मनुष्यबळ देण्यास ब्रह्मपुरी वनविभाग असक्षम आहे. कारण, ब्रह्मपुरी वनविभागात मानव-व्याघ्र संघर्ष टिपेला पोहोचला असून त्याच्या व्यवस्थापनाकरिता मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत मानव-व्याघ्र संघर्षाच्या व्यवस्थापनासाठी कार्यरत असणारे वनकर्मचारी हे अभयारण्यात विलीन केल्यास संघर्षाचे व्यवस्थापन सुलभरीत्या करणे शक्य होणार नाही.
अभयारण्याची वैशिष्ट्ये
- अभयारण्याचे सर्वांत वैशिष्ट्य म्हणजे त्याचे भौगोलिक स्थान.
- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ईशान्येकडे असलेले ब्रह्मपुरी वनक्षेत्र वाघांच्या प्रसारासाठी महत्त्वाचे आहे.
- उमरेड-कर्हांडला वनक्षेत्राशी असलेल्या भौगोलिक संबंधांचाही या दृष्टीने अभ्यास आवश्यक आहे.
- घोडाझरी तलाव, सातबहिणी डोंगर आणि ‘मुक्ताई देवस्थान’ परिसरामुळे या भागाला पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे.
पर्यटनास चालना मिळेल
घोडाझरी अभयारण्याचे हस्तांतरण वन्यजीव विभागाकडे झाल्यास हे वन्यजीवांसाठी सुरक्षित स्थान म्हणून निर्माण होईल. शिवाय, पर्यटनासदेखील चालना मिळेल. कारण, याठिकाणी वनविभागाने सफारीकरिता रस्ते तयार केले असून या क्षेत्राचे व्यवस्थापन अभयारण्यासारखे झाल्यास याठिकाणी वन्यजीव सफारीला चालना मिळेल. याचा फायदा आमच्यासारख्या स्थानिकांना मिळेल. - यश कायारकर, स्थानिक, अध्यक्ष-एसडब्लूएबी फाऊंडेशन
वाघांचा सुरक्षित अधिवास
घोडाझरी वन्यजीव अभयारण्य हे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडणार्या अतिरिक्त वन्यप्राण्यांच्या स्थलांतराकरिता पूरक असा महत्त्वपूर्ण अधिवास म्हणून काम करते. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासही मदत होते. तसेच, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला एकारा, नवेगाव-नागझिरा आणि उमरेड-कर्हांडला यांसारख्या इतर संरक्षित क्षेत्रांशी जोडणार्या वन्यजीव भ्रमणमार्गातील एक महत्त्वाचा दुवा म्हणूनही हे अभयारण्य कार्य करते. - मिलिंद परिवक्कम, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, एलआरसी फाऊंडेशन
पर्यटनवाढीची संधी
घोडाझरीचे संवर्धन हे अभयारण्याच्या दृष्टीने झाल्यास पर्यटन विकासाला नवी दिशा मिळू शकते. ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ने (डब्लूआयआय) देखील अभयारण्याच्या पर्यटन विकासासाठी स्वतंत्र आणि एकात्मिक आराखडा तयार करण्याची शिफारस केली आहे. घोडाझरी तलाव, बोटिंग, जंगल सफारी, निसर्ग पायवाटा आणि पक्षीनिरीक्षण अशा सुविधांचा विस्तार करता येऊ शकतो. तसेच ताडोबा-अंधारी आणि उमरेड-कर्हांडला या पर्यटन केंद्रांशी जोडून स्वतंत्र पर्यटन सर्किट विकसित करण्याची संधी आहे. यामुळे पर्यटकांचा मुक्काम वाढण्यासोबतच स्थानिक तरुणांना निसर्ग मार्गदर्शक, वाहनचालक आणि होम-स्टेच्या माध्यमातून रोजगार मिळू शकतो. वन्यजीव आणि सिंचन विभागातील समन्वय वाढल्यास पर्यटन सुविधांचे नियोजनही अधिक प्रभावी होईल.