संस्कृतचा उगवता भानुज

    14-Nov-2026

Bhanuj Vashishth Sanskrit Vlogger
 
इन्स्टाग्रामवरील आपल्या 'sreezzv' या चॅनेलच्या माध्यमातून देशविदेशांतील संस्कृतप्रेमींपर्यंत पोहोचलेल्या, अवघ्या १८ वर्षांच्या संस्कृत व्लॉगर भानुज वशिष्ठ याच्याविषयी...
 
संस्कृत भाषा कालौघात ‘आऊटडेटेड’ ठरल्याची ओरड होत असताना, आजही काही मोजक्या ठिकाणी मात्र निश्चयाने संस्कृतमधूनच व्यवहार केला जातो. ‘केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालया’ची देशभरात विखुरलेली १४ केंद्रे आणि अन्य काही मठ, विद्यालयांमध्ये आजही ‘संस्कृत’ हीच माध्यमभाषा आहे. कारण, संस्कृतमधून विचार करण्याची सवय एकदा लागली, की त्यानंतर विद्यार्थ्यांनाही त्यात फार कठीण असे काहीच भासत नाही.
 
असे लाखो विद्यार्थी ‘केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालया’ने आजवर घडवले आहेत. त्यांची बोली भाषा संस्कृतच असल्याने, आजची तरुणाई ज्याप्रमाणे गाणी, गोष्टी, रील्स, अटायर-एक्सप्लेनर, ट्रॅव्हल-व्ह्लॉग करते, त्याचप्रमाणे हे विद्यार्थीही साहजिकच संस्कृतमधून ही सर्व माध्यमे हाताळतात. समाजमाध्यमांवर आपल्या संस्कृत व्ह्लॉगसाठी प्रसिद्ध असलेलं असंच एक ‘जेन-झी’ व्यक्तिमत्त्व म्हणजे भानुज वशिष्ठ!
 
भानुज मूळचा हिमाचल प्रदेशातील कांगडाचा. २००८ साली त्याचा जन्म एका संयुक्त कुटुंबात झाला. त्याचे आजोबा आणि त्यांच्याचकडून गुरुपरंपरेने अध्ययन केलेले बाबा, हे दोघेही ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक. शिवाय, त्याचे काका संस्कृत अध्यापक. भानुजवर नकळत्या वयापासूनच संस्कृतचे संस्कार झाले. त्याचे वडील पौरोहित्यही करत असल्याने, अगदी दहा-बारा वर्षांचा असल्यापासूनच भानुज त्यांच्याबरोबर कथा-पारायणासाठी जात असे. त्याच निरीक्षणातून आणि ते मंत्रोच्चार ऐकून, भानुज आता वडिलांच्या मदतीशिवाय एकटाही पौरोहित्य करू शकतो.
 
शाळेत असल्यापासून भानुजला गणितात रुची होती. ज्योतिषशास्त्रपंडितांच्या घरी गणिताच्या विशेष अध्ययनासाठी, त्याला साहजिकच प्रोत्साहन दिले गेले. परंतु, त्याने मात्र संस्कृतातच उच्च शिक्षण घेण्याचा आणि त्यातील ज्योतिषशास्त्र शिकण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या पाठिंब्याने त्याने ‘केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालया’च्या हिमाचल प्रदेशातील ‘वेदव्यास क्षेत्रा’त ‘प्राक्शास्त्री’, अर्थात अकरावी-बारावीसाठी प्रवेश घेतला. तेथील रीतीनुसार अध्यापनाची भाषा संस्कृत असल्यामुळे भानुजला बोली संस्कृत शिकणे, आपले विचार संस्कृतात मांडायला शिकणे क्रमप्राप्तच होते. यात ‘संस्कृतभारती’ या संस्थेच्या विविध उपक्रमांचादेखील त्याला उपयोग झाल्याचे, भानुज आवर्जून नमूद करतो.
 
पदवी मात्र भारतातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयातूनच करण्याचे, भानुजने नक्की केले होते. आपला ज्योतिषशास्त्राचा कल जाणून, त्याने कर्नाटकमधील ‘केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालया’च्या ‘राजीव गांधी क्षेत्रा’त ‘शास्त्री-फलज्योतिष’साठी प्रवेश घेतला. तेथे सर्व दैनंदिन व्यवहार संस्कृतातूनच होत असल्यामुळे, भानुजला संस्कृत संभाषणाचा अधिकच सराव मिळाला. महाविद्यालयीन ‘रूपक महोत्सवा’तील नाटकातही, तो आता मोठ्या आत्मविश्वासाने रंगमंचावर उभा राहू शकतो.
 
भानुजचा आतेभाऊ प्रशांतही नोकरीनिमित्त तेथेच राहत असल्याने, त्यांची वरचेवर भेट होते. दोघे मिळून आपली नवनवीन ठिकाणी फिरण्याची आवड जोपासतात. सप्टेंबर २०२५ मध्ये भानुजची आत्यादेखील तेथे आली असता, सगळे मिळून ऊटी फिरण्यास गेले. प्रशांतदादाचा आयफोन घेऊन फोटो काढता काढता, भानुजने सहजच एक व्ह्लॉग केला. नातेवाईकांची ओळख करून देत, ‘आम्ही आता ऊटीमधील या धबधब्याकाठी आलेलो आहोत,’ एवढंच त्याने संस्कृतमध्ये सांगितलं. परंतु त्याला मिळालेला प्रतिसाद कमालीचा होता. त्यातूनच स्फूर्ती मिळून भानुज पुन्हा पुन्हा प्रशांतदादाला भेटून त्याच्या आयफोनने रील्स, व्ह्लॉग तयार करत राहिला. ‘संस्कृतभारती’च्या जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या ‘अखिल भारतीय संस्कृत रील महोत्सव’ स्पर्धेत, त्याने ‘भारतीय ज्ञानपरंपरेचे पाच घटक’ या विषयावर पारंपारिक वेशातील रील सादर केली होती. याबद्दल त्याला पहिल्या पारितोषिकाने गौरवण्यातही आले.
 
भानुजच्या या यशाने, त्याच्या महाविद्यालयाने त्याला ‘रील’मध्ये प्रोत्साहन देण्यासाठी पुढील महिन्यात ‘केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालया’च्या राजस्थान केंद्रात व्ह्लॉगविषयीच्या कार्यशाळेसाठी पाठवले. तेथील प्रशिक्षणाने भानुजचे रीलकौशल्य अधिकच समृद्ध झाले. पण, चांगल्या फोनअभावी त्याला प्रशांतदादावरच अवलंबून राहावे लागत असे. यावेळी त्याचा महाविद्यालयीन मित्र कुशलने मोलाची साथ दिली. मग, भानुज कुशलच्या आयफोनने व्ह्लॉग करत असे आणि कुशल त्याचे एडिटिंग. भानुजच्या रील्सचे विषय अगदीच दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात. संस्कृत गाणी म्हणणे, आपल्या संस्कृतीची माहिती देणे, आधुनिक आणि पुरातन गोष्टींचा मेळ घालणारे काही रील्स करणे भानुजला अधिक आवडते. त्याचे अटायर-एक्सप्लेनर, विशेषतः धोती-लुंगीबद्दल आणि दाक्षिणात्य रीतिरिवाजांबद्दल माहिती देणारे रील्स, त्याच्या हिमाचलच्या मित्रांमध्ये लोकप्रिय होतात. शिवाय, त्याला फिरायचीही हौस असल्याने ‘जाऊ तिथे व्ह्लॉग’ या तत्त्वाने, तो ट्रॅव्हल व्ह्लॉगच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या भेटीस येतो. त्याच्या साध्या-सोप्या संस्कृतमुळे आज तो देशभरात सुप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ‘रामायणवार्ता’ या विषयावरील रीलसाठी, ‘रामायण रिसर्च काऊन्सिल’कडून त्याला अल्पवयातच ‘संस्कृतभूषण’ पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले.
 
रीलनिर्मितीचा अनुभव, ज्योतिषशास्त्राचे शिक्षण आणि पौरोहित्याचे बाळकडू या तिन्हींचा मेळ घालत, भविष्यात संस्कृतचा प्रचार-प्रसार करून समाजाला काहीतरी देणे देण्याची तळमळ भानुज व्यक्त करतो. आज ठिकठिकाणी ‘जेन-झीं’मुळे जनक्षोभ उसळला असताना, संस्कृतच्या संस्कारांत वाढलेला भानुज वशिष्ठ हाच भारतीय संस्कृतीतील ‘जेन-झी’चा खरा चेहरा ठरावा.
 
-ओवी लेले
९८६९३४५७५३
  




संबंधित मजकूर