आजोबा-नातवाच्या नात्यातील मायेचा नितळ झरा!

    14-Nov-2026
 
 
Aadi Anant Movie Review
 
काही चित्रपट केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, तर काही विचार करायला भाग पाडतात, तर काही चित्रपट संपल्यानंतरही आपल्या मनात घर करून राहतात, आपल्या माणसांची आठवण करून देतात. नात्यांमधील ओलावा, मायेची ऊब आणि माणसाला माणसाची असणारी गरज यांचा हळुवार वेध घेणारा महेश लिमये दिग्दर्शित ’आदि अनंत’ हा चित्रपट याच पठडीत मोडतो.
 
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण करिअर, पैसा, प्रतिष्ठा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या मागे धावताना आपल्या जवळच्या माणसांसाठी किती वेळ देतो? घरात असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या भावना समजून घेतो का? त्यांच्या अनुभवांना, त्यांच्या एकटेपणाला आणि त्यांच्या अपेक्षांना किती महत्त्व देतो? असे अनेक प्रश्न हा चित्रपट नकळत प्रेक्षकांसमोर उभे करतो.
 
एका बाजूला आयुष्याचा मोठा प्रवास पूर्ण केलेली ज्येष्ठ पिढी आणि दुसर्‍या बाजूला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारी तरुण पिढी, या दोन पिढ्यांमधील भावनिक नात्याची गोष्ट म्हणजे ’आदि अनंत’ हा चित्रपट.
 
या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत अनंत भालेराव (अशोक सराफ) आणि आदित्य (संकर्षण कर्‍हाडे). अनंतराव हे वयस्कर असले, तरी त्यांच्यातील उत्साह, स्वभावातील मिश्किलपणा आणि माणसांबद्दलची आपुलकी कायम आहे. दुसरीकडे आदित्य हा आपल्या करिअरमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा तरुण. त्याच्या आयुष्यात अनेक प्रश्न आहेत, स्वप्नं आहेत आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेला संघर्षही आहे.
 
या दोघांचे नाते केवळ आजोबा आणि नातू एवढ्यापुरते मर्यादित राहत नाही. त्यांच्यात मैत्री आहे, एकमेकांबद्दल काळजी आहे, कधी लहानसहान कुरबुरी आहेत, तर कधी एकमेकांना समजून घेण्याची धडपडसुद्धा आहे.
 
या नात्यातून चित्रपट एक महत्त्वाचा विचार मांडतो. वयाने मोठे असलेले प्रत्येक जण केवळ मार्गदर्शन करण्यासाठी नसतात आणि तरुण पिढीतील प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःच्या विश्वात रमलेली नसते. दोन्ही पिढ्यांना एकमेकांची गरज असते. फक्त ती व्यक्त करण्याची भाषा मात्र वेगळी असते. आदित्य आणि अनंतराव यांच्या आयुष्यात गायत्रीची (सखी गोखले) एन्ट्री झाल्यानंतर कथेला वेगळे वळण मिळते. आता ते काय आहे, हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल.
 
या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे अशोक सराफ यांचा कसदार अभिनय! अशोकमामांनी अनंत भालेराव ही व्यक्तिरेखा केवळ साकारलेलीच नाही, तर ती पूर्णपणे जगली आहे. त्यांचा एकूणच लूक, वाढलेली दाढी, विस्कटलेले केस, कपाळावरील टिळा, जुने कपडे आणि एकंदर देहबोली यातून अनंतरावांचे व्यक्तिमत्त्व चपखलपणे उभे राहते. मात्र, या व्यक्तिरेखेचे खरे सौंदर्य त्यांच्या अभिनयातील सहजतेत आहे. संकर्षण कर्‍हाडेसाठीही हा चित्रपट विशेष महत्त्वाचा आहे. कारण, अभिनयासोबतच कथा, पटकथा आणि संवादलेखनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
 
आदित्यच्या व्यक्तिरेखेतून तरुणाईची अस्वस्थता, करिअरमधील संघर्ष, स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा आणि नात्यांमध्ये अडकलेली भावनिक गुंतवणूक दिसते. अशोक सराफ यांच्यासोबतचे त्याचे प्रसंग चित्रपटाला एक वेगळी रंगत देतात. इतर कलाकारांनीही कथानकाला आवश्यक ती साथ दिली आहे.
 
दिग्दर्शक महेश लिमये यांनी या चित्रपटासाठी निवडलेला विषय साधा असला, तरी त्यातील भावनिक खोली महत्त्वाची आहे. मोठ्या घटना, नाट्यमय संघर्ष किंवा अनपेक्षित वळणे यांपेक्षा माणसांमधील नातेसंबंध आणि त्यांच्या मनातील भावना यांना त्यांनी अधिक महत्त्व दिले आहे.
 
छायाचित्रकार म्हणूनही त्यांची नजर अनेक प्रसंगांतून जाणवते. घरातील वातावरण, व्यक्तिरेखांची मांडणी, प्रकाशयोजना आणि दृश्यांची रचना यांमधून चित्रपटाचे भावविश्व अधिकच खुलते.
 
चित्रपटातील संगीतकार अविनाश-विश्वजीत यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत कथेला पूरक ठरते. गुरू ठाकूर यांचे गीतलेखन आणि राहुल देशपांडे तसेच शिवम सिंह यांचे स्वर चित्रपटाच्या भावविश्वाला अधिक समृद्ध करतात. महेश लिमये आणि तन्मय वनमाळी यांचे छायांकन उत्तमच झाले आहे.
 
’आदि अनंत’चा विषय निश्चितच सुंदर आहे. मात्र, केवळ चांगला विषय असणे पुरेसे नसते. तो पडद्यावर किती प्रभावीपणे मांडला जातो, हेही महत्त्वाचे असते. काही प्रसंगांमध्ये पटकथेचा वेग कमी झालेला जाणवतो. संवादांमधून अपेक्षित असलेली भावनिक तीव्रता प्रत्येक वेळी साधली जातेच असे नाही. काही घटना आणि प्रसंगांचा अंदाज प्रेक्षकांना आधीच येतो. त्यामुळे कथेत काही ठिकाणी अनपेक्षितपणा कमी जाणवतो.
 
या चित्रपटातील नात्यांचा विषय अधिक खोलवर जाण्याची क्षमता ठेवतो. काही प्रसंग अधिक नेमकेपणाने लिहिले असते आणि पटकथेची बांधणी अधिक घट्ट केली असती, तर चित्रपटाचा परिणाम आणखी खोलवर झाला असता. तरीही आजच्या काळात कुटुंबातील नात्यांमध्ये संवाद कमी होत असताना, एकमेकांसाठी वेळ देण्याची गरज अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे कुटुंबासोबत पाहावा असा हा चित्रपट नक्कीच आहे.
 
दिग्दर्शक : महेश लिमये
कलाकार : अशोक सराफ, संकर्षण कर्‍हाडे, सखी गोखले, कविता लाड, वैदेही परशुरामी
लेखक : संकर्षण कर्‍हाडे
कालावधी : २ तास २२ मिनिटे

 -कपिल देशपांडे




संबंधित मजकूर