नवी दिल्ली (Zakir Naik Islamic Research Foundation Ban Extended) : धार्मिक उपदेशाच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करणे आणि कट्टरतावाद पसरवण्याचे काम करणार्या झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन अर्थात आयआरएफवरील बंदी, केंद्र सरकारने आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. त्यासाठीची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवार दि .१३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा अर्थात यूएपीए अंतर्गत आयआरएफवरील बंदी वाढवण्यात आली आहे.
आयआरएफवर सरकारने सर्वप्रथम दि. १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. याद्वारे आयआरएफला बेकायदेशीर संघटनाही घोषित करण्यात आले होते. त्यानंतर २०२१ मध्ये ही बंदी पुन्हा पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली. बंदीच्या कालावधीची मुदत दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी संपणार असल्याने, केंद्र सरकारने नव्या अधिसूचनेद्वारे बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. (Zakir Naik Islamic Research Foundation Ban Extended)
गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, जाकिर नाईक याची भाषणे आणि विधाने आक्षेपार्ह व विघातक स्वरूपाची आहेत. त्याच्या वक्तव्यांमधून देशातील सलोखा धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, झाकीर नाईक त्याच्या भाषणांतून भारतासह परदेशातील तरुणांनाही दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत असल्याचे केंद्र सरकारने नमूद केले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्या, इंटरनेट, मुद्रित माध्यमे आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून, लाखो लोकांपर्यंत दहशतवादी विचार पोहोचविण्याचा प्रयत्न झाकीर नाईकने केल्याचेही अधिसूचनेत नमूद आहे. बंदी उठवल्यास फुटीरतावादी विचारांना प्रोत्साहन मिळणे आणि देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचण्याची चिंता केंद्र सरकारने यक्त केली. (Zakir Naik Islamic Research Foundation Ban Extended)
धर्माच्या नावाखाली विद्वेषाची पेरणी करणे ही गंभीर बाब आहे. अशा विचारसरणीला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण देता येणार नाही, ही केंद्र सरकारची भूमिकाच या निर्णयातून पुन्हा अधोरेखित झाली आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात द्वेषाचे विष पसरविण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
झाकीर नाईक आणि आयआरएफवरील आरोप :
- भारतात भाषणांमधून विद्वेष पसरवल्याचा आरोप
- २०१६ च्या ढाका हल्ल्यातील हल्लेखोर जाकीर नाईकच्या भाषणांनी प्रेरित
- बेकादशीर परदेशी निधी संकलनाचा सक्तवसुली संचलनायाचा आरोप
- पीस टिव्ही या जाकीर नाईकच्या वाहिनीवरुन विद्वेषी विचारांचा प्रसार
- पीस टिव्हीवर भारत, बांगलादेश, ब्रिटनसह अनेक देशांत बंदी