ठाणे (Bhojpuri Songs at Mumbai Railway Stations): मुंबई रेल्वे विभागातील स्थानकांवर छटपूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवली जात असताना महाराष्ट्रातील सण-उत्सवांच्या गाण्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे. नुकतीच भाऊबीज साजरी झाली. मात्र, या दिवशी भाऊबीजेची किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी गाणी स्थानकांवर वाजविण्यात आली नाहीत. यावरून रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
छटपूजा हा प्रामुख्याने बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. या सणानिमित्त भोजपुरी गाणी वाजविण्यास हरकत नाही; मात्र मुंबई रेल्वे विभागात केवळ भोजपुरी गाण्यांनाच प्राधान्य का, असा सवाल घनघाव यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील सण, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतिबिंब स्थानकांवर उमटले पाहिजे. गणेशोत्सव, गुढीपाडवा, दिवाळी, भाऊबीज अशा सणांच्या निमित्ताने मराठी गाणीही प्रत्येक स्थानकावर वाजविण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Bhojpuri Songs at Mumbai Railway Stations)
रेल्वे प्रशासनाची भूमिका काय?
या वादावर मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, विविध प्रसंगांनुसार स्थानकांवर जिंगल्स आणि जनजागृतीपर संदेश प्रसारित केले जातात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस यांसारख्या विशेष गाड्या सोडल्या जाणाऱ्या स्थानकांवर छटपूजेच्या पार्श्वभूमीवर गाणी वाजवली जात आहेत. मात्र, प्रवाशांसाठी आवश्यक उद्घोषणांचा वेळ राखून उर्वरित वेळेतच ही गाणी वाजवली जात असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केल आहे. (Bhojpuri Songs at Mumbai Railway Stations)