कोकणच्या लोककलेचा जागर

    13-Nov-2026

Konkan Folk Dance Tipri
 
वायूवेगाने धावणार्‍या मुंबईत कोकणची लोककला अर्थात ‘टिपरी’ कलेने कोकणवासीयांची मने जिंकणार्‍या नीलम गुरव यांच्या कलाप्रवासाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
'टीपरी’ हातात घेऊन पारंपरिक वेशात नटूनथटून अस्खलित फेरा धरणार्‍या नवतरुणी... ढोलकी, मृदंग, झांज वाद्यांची ठेका वाढवणारी साथसंगत... त्याला शाहीर नीलम गुरव यांच्या टिपेला पोहोचणार्‍या आवाजाची जोड मिळाली की, गाण्यांतून पौराणिक कथा हळूहळू उलगडू लागते आणि मग मुंबईतील कोकणी रसिकांच्या बैठकीतून टाळ्यांचा कडकडाट झालाच म्हणून समजा! मुंबईसारख्या शहरात रोजीरोटीसाठी धावून थकलेल्या कोकणी मनाला कलात्मक आनंद देण्याचे काम नीलम गुरव आपल्या ‘टिपरी’ गीतनृत्यातून करत आहेत. रसिक श्रोतेही शिट्ट्या अन् इनाम देत, त्यांच्या या कलेला अगदी भरभरून दाद देतात.
 
कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी घरातील कर्ता पुरुष तब्बल ३५० ते ४०० किलोमीटरचे अंतर पार करत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून मुंबईत स्थलांतरित झाला. त्यातून भांडुप, घाटकोपर, चेंबूर या उपनगरांत कोकणवासीयांच्या वस्त्याच्या वस्त्या उभ्या राहिल्या. असे असले, तरी कोकणच्या लोककला मात्र वेशीवरच थांबल्या. जेव्हा जेव्हा या चाकरमान्यांची पाऊले गणपती, शिमग्यानिमित्त सणासुदीला आपल्या मूळ गावी पडतात, तेव्हा त्याच्या मनात कोकणच्या लोककलेची ओढ कायम असते. कोकणी मनामनांतील हीच कलासक्ती हेरत नीलम गुरव यांनी मुंबईत ‘टिपरी’ सादर करायला सुरुवात केली. त्यांच्या पुढाकाराने चेंबूरच्या घाटले गावात ‘रिया टिपरी नृत्य कलामंच’ची सुरुवात झाली. दोनएक वर्षांच्या छोट्याशा प्रवासात नीलम यांनी मुंबईतील कोकणी वस्त्यांत आपल्या कलाकौशल्याची छाप सोडली.
 
बालपणापासून नीलम यांना ‘टिपरी’ची ओढ! लग्नानंतर अधूनमधून सणासुदीला सासरी लांजा तालुक्यातील खावडी गावात त्या टिपरी खेळत असत. मुंबईतील चेंबूर घाटले गावात स्थलांतरित झाल्यावर संसाराचा गाडा हाकताना त्यांना सवड मिळत नव्हती. पण, दुसरीकडे मनातील आवड स्वस्थही बसू देत नव्हती. यातूनच मग ‘रिया टिपरी नृत्य कलामंच’ आकाराला आला. घाटले गावात कोकणवासीयांची घरे मोठ्या संख्येने असली, तरी कलामंचच्या निर्मितीतील आव्हानेही तितकीच मोठी होती. सुरुवातीला मुलींच्या पालकांना विश्वासात घेणे, वादक शोधणे, त्यांना आपल्या कलामंचशी जोडून घेणे, एकत्र सरावासाठी वेळ काढणे, सोबतच सरावात सातत्य राखणे, अशी त्यांची कसोटी लागत असे. पण, सर्व सहकलाकारांनी साथ दिल्यामुळे आपण हे धनुष्य पेलू शकलो, असे नीलम अगदी अभिमानाने सांगतात.
 
घराच्या चार भिंतींत सुरू झालेल्या कलाप्रवासाने आज रसिकश्रोत्यांच्या मनात घर केले आहे. नीलम यांची १३ वर्षांची मुलगीही नर्तिका आहे. मुलीची आधुनिक नृत्यशैली आणि नीलम यांनी डोळ्यांत साठवून ठेवलेल्या पारंपरिक नृत्याचा संगम साधून सादर होणारी ‘टिपरी’ हे अन्य टिपर्‍यांमध्ये त्यांचे वेगळेपण अधोरेखित करते.
 
‘माझ्या गौराई मातेला गणाचं घुंगरू’ हा त्यांचा एक अतिशय लोकप्रिय आणि सुपरहिट ‘गण’. या गणानेच कार्यक्रमाची सुरुवात होते. त्यानंतर मग ‘टिपरी’ आणि ढोलकीच्या तालावर पौराणिक कथांचे सादरीकरण होते, जे रसिकांना अक्षरश: खिळवून ठेवते.
श्रावणबाळाची पितृभक्ती, सीतेचे स्वयंवर, द्रौपदीची भक्ती आणि पांडवांचे प्रसंग यांसारख्या कथांतून सत्य, निष्ठा आणि कर्तव्यपालनाचा संदेश दिला जातो. कधी राधा-कृष्णाचे गोड संवाद, गोकुळातील गवळणी आणि बासरीचे वर्णन यांतून निर्मळ प्रेम व आनंदाचा आशय मांडला जातो. कधी श्रावणबाळाच्या पितृभक्तीची कथा काव्यबोलातून उभी केली जाते. कधी गणपती आणि शंकराची स्तुतिगीते, ‘रामायण’, ‘महाभारता’तील संवाद, असे नानाविध प्रसंग मुंबईच्या गल्लीबोळात सादर होतात, तेव्हा प्रेक्षक म्हणून दाद देणार्‍या कोकणी माणसाच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव उमटलेले दिसतात. आशयघन पौराणिक कथांतून प्रेक्षकांचे जणू काही प्रबोधन केले जाते.
 
मुंबईतील मल्टिप्लेक्स सिनेमागृहे, अद्ययावत नाट्यगृहे या झगमगाटातही अस्सल कोकणी पट्ट्यात ‘टिपरी’ नृत्याला जो मान मिळतो ना, तो पुढे आणखी जोमाने काम करण्याचे बळ देत असल्याचे नीलम सांगतात.
 
कोकणी तडका असलेला काळजाला भिडणारा आवाज, त्याच्या जोडीला झांजेच्या चकत्यांतून निघणारी वाद्यांची लय, त्यावर पारंपरिक नृत्याचा ठेका, याची सांगड कोकणापासून कोसो दूर असणार्‍या कोकणी माणसाच्या मनामनांचा ठाव घेणारी आद्य लोककला आहे. ‘कॉस्मोपॉलिटन’ होत असलेल्या मुंबापुरीत ती कोकणी माणसाला आपल्या संस्कृतीशी घट्ट जोडून ठेवत आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या मागे पळणार्‍या मुंबईतील आजच्या युवापिढीसमोर ती सादर होताना आपली परंपरा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. उद्या कदाचित, काळाच्या ओघात ही लोककला अखेरच्या घटका मोजत असेल, तेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला तिचे सौंदर्य कसे दाखवणार? त्यामुळेच मुंबईसारख्या शहरात कोकणच्या या लोककलेचा जागर सुरू राहणे, कलात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट्या गरजेचे आहे. त्यासाठीच नीलम यांचे प्रयत्न विशेष ठरतात. दिवसागणिक त्यांची कलाकृती अधिक बहरत जावी आणि ‘ए गजानना...गणराया’ म्हणत, मुंबईतील कोकणी वस्त्या कोकणच्या या लोककलेने दुमदुमून जाव्यात, याच सदिच्छा!
 
लेखक- रोहित गुरव
 




संबंधित मजकूर