दोनशे पन्नास वर्षांपूर्वी...

    13-Nov-2026

James Madison Constitution
 
२५० वर्षांपूर्वी एका तरुण राष्ट्रनिर्मात्याने आपल्या देशाच्या भवितव्याचा विचार करता, सक्षम शासनपद्धती देशाला तर दिलीच; पण त्याबरोबरच जनतेच्या आशा-आकांक्षांचे आणि अमेरिकन शब्द वापरायचा, तर ‘लिबर्टी’चे पूर्णपणे रक्षणही केले. ‘अतिशय समर्थ शासन’ आणि ‘मुक्त समाज’ म्हटल्या, तर या दोन विरुद्ध गोष्टी आहेत, त्याचा उत्तम समन्वय जेम्स मेडिसन यांच्या संविधानाने साधला. हे त्यांचे यश कालातीत आहे.
 
दोनशे पन्नास वर्षांपूर्वी... म्हणजे १७७६ साली अमेरिका नावाचा देश अस्तित्वात आला. हा देश तेव्हाच्या १३ राज्यांचा मिळून देश तयार झाला, त्याला ‘संघराज्य’ म्हणतात. या देशाने, १७८७ साली जगातील पहिले लिखित संविधान तयार केले. देशाचे नाव निश्चित झाले, ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’. आजची अमेरिका ही ५० राज्यांचा संघ असून आर्थिक, लष्करी आणि ज्ञानाची महासत्ता आहे. अमेरिकेला महासत्ता बनवण्याचे श्रेय अमेरिकेच्या संविधानाला देण्यात येते. हे संविधान केवळ सात कलमांचे आहे. प्रत्येक कलमांची उपकलमे आहेत. एकूण शब्दसंख्या ४ हजार ५४३ इतकी आणि या संविधानात आतापर्यंत फक्त २७ सुधारणा झालेल्या आहेत.
 
२५० वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या संविधानाच्या निर्मितीचे श्रेय जेम्स मेडिसन यांना देण्यात येते. त्यांचे वय तेव्हा ३७ होते. संविधान निर्माण करण्यासाठी फिलाडेल्फिया येथे १३ राज्यांचे ५५ प्रतिनिधी यावेत, असे ठरले. सर्वजण एकाच वेळी उपस्थित राहू शकले नाहीत. जास्तीत जास्त संख्या ३० ते ३५ पर्यंत राहिली. जेम्स मेडिसन यांनी चर्चेसाठी एक मसुदा तयार केला, त्याला ‘व्हजेनिर्र्या प्लॅन’ असे म्हणतात. मे ते सप्टेंबर असे संविधान सभेचे कामकाज चालले. मंजूर झालेल्या मसुद्यावर फक्त ३९ जणांनी स्वाक्षर्‍या केल्या. नंतर हा मसुदा १३ राज्यांच्या लोकमान्यतेसाठी खुला ठेवण्यात आला. लोकांनी त्याला मान्यता द्यावी, म्हणून जेम्स मेडिसन, अलेझांंडर हॅमिल्टन, जॉन जे यांनी टोपण नावाने वर्तमानपत्रात लेख लिहिले. त्याचे पुढे ‘फेडरॅलिस्ट पेपर्स’ या शीर्षकाचे पुस्तकही प्रकाशित झाले. संविधानाची मूलतत्त्वे समजून घेण्यासाठी या पुस्तकाचे वाचन अनिवार्य आहे.
 
या पुस्तकातील ‘लेख क्रमांक १०’ आणि ‘लेख क्रमांक ५१’ अतिशय महत्त्वाचे समजले जातात. जेम्स मेडिसन त्याचे लेखक आहेत. आपल्या देशात ‘संविधान’ या विषयावर राजकीय चर्चा चालू असते. त्या चर्चेचा उल्लेख यापूर्वीच्या अनेक लेखांतून केलेला आहे. त्याची पुनरावृत्ती येथे करीत नाही. तर जेम्स मेडिसन यांनी या दोन लेखांत संविधानाचा मूलभूत विचार कसा करायचा असतो, हे थोडयात मांडले आहे. त्यांनी जे चिंतन मांडले आहे, ते आपल्या देशाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्वाचे असल्यामुळे त्याचा सारांश रूपाने इथे विचार करूया. प्रथम ‘फेडरॅलिस्ट क्रमांक ५१’ यात जेम्स मेडिसन काय म्हणतात ते बघू. त्यांचे हे विचार २५० वर्षांपूर्वीचे आहेत, तेव्हा आपल्या देशात काय चालू होते, याचा विचार वाचकांनी करावा.
 
जेम्स मेडिसन यांच्या पुढे कोणते आव्हान उभे होते? त्यांना राज्य व्यवस्थित चालविण्याचा मूलभूत कायदा तयार करायचा होता. त्यावेळी जगात राज्य चालविण्याचे काही प्रकार होते ः १) राजेशाही २) सरंजामशाही ३) साम्राज्यशाही. यांपैकी कोणताही प्रकार अमेरिकेला नको होता. सर्वस्वी नवीन प्रकारची राजवट उभी करायची होती. राजवटीचा विचार करताना मनुष्य समाज, शासनकर्ते यांचा विचार जेम्स मेडिसन यांनी अतिशय खोलवर केला आहे. ते म्हणतात, "शासन व्यवस्था म्हणजे तरी काय? ती मानवी स्वभावातील उणिवांचेच सर्वांत मोठे प्रतिबिंब नाही काय? जर माणसे देवदूत असती, तर शासनाची कोणतीही आवश्यकता भासली नसती आणि जर देवदूतच माणसांवर राज्य करणार असते, तर शासनावर बाह्य किंवा अंतर्गत नियंत्रण ठेवण्याचीही आवश्यकता (संविधानाची) राहिली नसती.”
 
माणसांनीच माणसांवर राज्य करण्याची असलेली शासन व्यवस्था तयार करताना सर्वांत मोठी अडचण अशी आहे की, प्रथम शासनाला जनतेवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम बनवावे लागते आणि त्यानंतर त्याच शासनाला स्वत:वर नियंत्रण ठेवण्यास भाग पाडावे लागते. शासनाने स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा उपाय कोणता? जेम्स मेडिसन यांनी उपाय सुचविला आहे. हा उपाय म्हणजे, सत्तेचे केंद्रीकरण होता कामा नये. कायदा करण्याची सत्ता वेगळी असली पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी करणारी सत्ता वेगळी असली पाहिजे आणि न्यायदान करणारी सत्ता वेगळी असली पाहिजे. याला ‘सत्तेचे त्रिभाजन’ म्हणतात. हे सत्तेचे त्रिभाजन कसे असावे? प्रत्येक केंद्राने आपल्या मर्यादेत काम केले पाहिजे, दुसर्‍याच्या क्षेत्रात हस्तक्षेप करता कामा नये. इतर विभागांच्या अधिकारांवरील अतिक्रमणांना विरोध करणे, अतिक्रमणांना विरोध करता यावा, यासाठी आवश्यक घटनात्मक उपाय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे मेडिसन यांचे म्हणणे आहे.
 
प्रत्येक विभागात महत्त्वाकांक्षी माणसे असतात. त्यांच्या महत्त्वाकांक्षांवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. मेडिसन एक उपाय सुचवितात तो म्हणजे, महत्त्वाकांक्षेनेच दुसर्‍या महत्त्वाकांक्षेवर नियंत्रण ठेवता येते. कायदेमंडळाचे अधिकार खूप मोठे आहेत. कायदेमंडळाच्या अधिकारावर कार्यकारी मंडळाचा नकाराधिकार हा एक उपाय आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेने कार्यकारी मंडळाचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष यांना हा अधिकार दिलेला आहे. त्याला ‘व्हिटो पॉवर’ म्हणतात. तसेच कार्यकारी मंडळाच्या अधिकारावर कायदेमंडळाचे नियंत्रण ठेवण्यासाठी युद्धघोषणा, विदेशाशी करार, कायदेमंडळाने संमत केल्याशिवाय अमलात येऊ शकत नाहीत. साध्या भाषेत सांगायचे, तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष मनात येईल तेव्हा दुसर्‍या देशाशी युद्ध करू शकत नाही. दुसर्‍या देशाशी युद्धजन्य करार करू शकत नाही. त्याला संसदेची मान्यता अनिवार्य आहे. जेम्स मेडिसन यांनी सुचविलेल्या या उपाययोजना आहेत. जनता सत्ता देते, ही सत्ता शासनाच्या वेगवेगळ्या अंगात विभाजित केली पाहिजे आणि प्रत्येक अंगाला दुसर्‍यावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे.
 
आज हे सिद्धान्त जगातील सर्व लोकशाही देशांतील राज्यघटनांनी जसेच्या तसे स्वीकारले आहेत. त्याचे जनक जेम्स मेडिसन आहेत. भारतीय राज्यघटनेने हे सिद्धान्त अंगीकारलेले आहेत. यानंतर आपण जेम्स मेडिसन यांच्या ‘फेडरॅलिस्ट क्रमांक १०’कडे येऊया. मेडिसन यांनी मानवी स्वभावाचे विश्लेषण अतिशय सखोल केले आहे.
 
लोकशाही शासन चालवत असताना गटबाजी आणि हिंसक प्रवृत्ती यांच्यावर नियंत्रण ठेवावे लागते. जेम्स मेडिसन यांचे म्हणणे असे, "लोकशाही शासनपद्धतीचा समर्थक जेव्हा या धोकादायक दोषाकडे आणि त्याच्या परिणामांकडे पाहतो, तेव्हा त्याला लोकशाहीचे स्वरूप आणि भवितव्य याबाबत सर्वाधिक चिंता असते.” मेडिसन पुढे म्हणतात, "प्रतिस्पर्धी पक्षांमधील संघर्षात सार्वजनिक हिताकडे दुर्लक्ष केले जाते आणि निर्णय अनेकदा न्यायाच्या तत्त्वांनुसार, तसेच अल्पमतातील गटाच्या अधिकारांनुसार न घेता, स्वार्थी आणि वर्चस्व गाजवणार्‍या बहुमताच्या ताकदीच्या आधारे घेतले जातात.”
 
यानंतर मेडिसन यांनी जे विचार मांडलेले आहेत, त्याचे महत्त्व कालातीत आहे. ते थोडयात असे- मेडिसन यांनी गटबाजीच्या समस्येवर उपाय करण्याचे दोन मार्ग सांगितले आहेत ः गटबाजीची कारणे नष्ट करणे किंवा तिच्या परिणामांवर नियंत्रण ठेवणे.
गटबाजीची कारणे नष्ट करणे अशय आहे, असे मेडिसन यांनी स्पष्ट केले.
 
स्वातंत्र्य नष्ट करून गटबाजी संपवता येईल; परंतु मेडिसन यांच्या मते, जसे अग्नीसाठी हवा आवश्यक असते, तसेच गटबाजीसाठी स्वातंत्र्य आवश्यक असते. त्यामुळे स्वातंत्र्य नष्ट केले, तर गटबाजीही नष्ट होईल. मात्र, त्याचबरोबर स्वातंत्र्याचाही नाश होईल.
सर्व लोकांचे विचार एकसारखे करूनही गटबाजी संपवता येईल; परंतु जोपर्यंत मानवाला विचार करण्याची आणि तर्क करण्याची क्षमता आहे, तोपर्यंत त्यांच्यात वेगवेगळी मते निर्माण होत राहतील. त्यामुळे सर्वांचे विचार एकसारखे करणे शय नाही.
 
पुढे मेडिसन म्हणतात, "गटबाजीची सुप्त कारणे मानवी स्वभावातच रुजलेली आहेत. त्यामुळे माणसे एकमेकांना त्रास देण्यास आणि एकमेकांवर अत्याचार करण्यास, सामूहिक हितासाठी सहकार्य करण्यापेक्षा अधिक प्रवृत्त होतात. माणसांमध्ये परस्पर द्वेष निर्माण होण्याची ही प्रवृत्ती इतकी प्रबळ आहे की, कोणतेही ठोस कारण नसतानाही अगदी क्षुल्लक आणि काल्पनिक भेदसुद्धा त्यांच्या मनात वैरभाव निर्माण करण्यास आणि तीव्र संघर्ष पेटवण्यास पुरेसे ठरतात.” हा परिच्छेद वाचल्यानंतर अनेक वाचकांना असे वाटेल की, जेम्स मेडिसन आजच्या भारताच्या स्थितीचे वर्णन करीत आहेत का? कारण, मनुष्य प्रवृत्तीचे हे वर्णन अतिशय मार्मिक आहे. सहजपणे आपल्यास देशात असंतुष्ट गट विविध माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारचा गोंधळ का करतात, याचे उत्तर यात आहे. या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनकर्त्यांना खूप सावध असावे लागते आणि माणसांच्या प्रवृत्ती लक्षात घेऊन उपाययोजना कराव्या लागतात. आंदोलन करणार्‍यांना पकड आणि टाक तुरुंगात, हा त्यावरील उपाय नाही. असे उपाय क्षणभराचे असतात. दीर्घकालीन उपायासाठी समाजातील विविध गट आणि त्या विविध गटांचे परस्परांतील संबंध त्यांचे योग्य प्रकारे संतुलन साधणे, कोणत्याही एका गटाला दुसर्‍यावर कुरघोडी करण्याइतके समर्थ होऊ न देणे आवश्यक असते.
२५० वर्षांपूर्वी एका तरुण राष्ट्रनिर्मात्याने आपल्या देशाच्या भवितव्याचा विचार करता, सक्षम शासनपद्धती देशाला तर दिलीच; पण त्याबरोबरच जनतेच्या आशा-आकांक्षांचे आणि अमेरिकन शब्द वापरायचा, तर ‘लिबर्टी’चे पूर्णपणे रक्षणही केले. ‘अतिशय समर्थ शासन’ आणि ‘मुक्त समाज’ म्हटल्या, तर या दोन विरुद्ध गोष्टी आहेत, त्याचा उत्तम समन्वय जेम्स मेडिसन यांच्या संविधानाने साधला. हे त्यांचे यश कालातीत आहे आणि आपल्याला राज्यघटना राबविताना, शासन करताना, आंदोलने करताना प्रचंड शिकविणारे आहे. अर्थात, शिकायचे ठरविले तर...!
 
लेखक- रमेश पतंगे
 ९८६९२०६१०१




संबंधित मजकूर